Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

एकीचे बळ नसल्याने एस. टी. कर्मचारी घाटय़ात!
प्रशांत मोरे
ठाणे, ९ जानेवारी

 
सार्वजनिक सेवा देणारी इतर महामंडळे आणि निमसरकारी आस्थापनांच्या तुलनेत कितीतरी अधिक उत्पन्न मिळवूनही केवळ एकीचे बळ नसल्याने एस. टी. कर्मचाऱ्यांवर कायम घाटय़ात राहण्याची आफत ओढवली असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
महाराष्ट्रात रेल्वेव्यतिरिक्त दररोज सरासरी एक कोटी ६० लाख प्रवासी विविध वाहनांमधून प्रवास करतात. उपलब्ध यंत्रणेद्वारे एस. टी.ने कमाल एक कोटी प्रवाशांची वाहतूक शक्य आहे. मात्र देखभाल दुरुस्ती आणि विस्तारीकरणाबाबत उदासीनता असल्याने सरासरी ६३ लाख प्रवाशांचीच वाहतूक एस. टी. द्वारे होते. सध्या अनेक मार्गांवर प्रवाशांच्या तुलनेत गाडय़ा अपुऱ्या आहेत. वाढत्या प्रवासी संख्येमुळे गाडय़ांच्या फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. मात्र नव्या गाडय़ा नसल्याने ते शक्य होत नाही. कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा ताणही उपलब्ध कर्मचाऱ्यांवर पडतो. अनेकांना ओव्हरटाइम करावा लागतो. त्यातही अनेक आगारप्रमुख आपापल्या विभागाच्या खर्चाचा ताळेबंद कमी व्हावा यासाठी केवळ कनिष्ठ वेतनश्रेणीवर नेमलेल्या कर्मचाऱ्यांना अथवा तुलनेने कमी सेवा बजावलेल्या कायम कर्मचाऱ्यांनाच ओव्हरटाईम देतात. अनुभवाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात यातून आपल्यावर अ़न्याय होत असल्याची भावना बळावली आहे. १९८९ मध्ये एस. टी. महामंडळात १ लाख १२ हजार कर्मचारी होते. सध्या ९८ हजार ४१९ कर्मचारी आहेत. गरजेच्या तुलनेत एस.टी.त सध्या किमान दहा हजार कर्मचारी अपुरे आहेत.
आता ठिकठिकाणी सहाआसनी- दहा आसनी गाडय़ांची अनधिकृत प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध असली तरीही ग्रामीण भागातील प्रवासी प्राधान्याने एस.टी.नेच प्रवास करणे पसंत करतात. गेल्या वित्तीय वर्षांतील अहवालानुसार एस. टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या तीन टक्क्यांनी वाढली. याच काळात डिझेलचे दरही कमी झाले. परिणामी नफ्याचे प्रमाणही वाढले. वक्तशीरपणातही एस. टी. अव्वल असून त्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. एस. टी.ची यंत्रणा अधिक सक्षम केली तर प्रवासी संख्येत वाढ होऊन नफ्याचे प्रमाणही वाढणार आहे. दररोज लाखो प्रवाशांची सुरक्षितपणे वाहतूक करणाऱ्या या कर्मचाऱ्यांबद्दल शासन कायम उदासीन राहिल्याचे दिसते. एस. टी. कर्मचाऱ्यांना सेकंड शिफ्टसाठी सात रुपये, तर नाईट शिफ्टसाठी १५ रुपये भत्ता मिळतो. तेवढय़ा पैशात सध्या फक्त चहाच मिळू शकतो. डय़ुटी दरम्यान चालक- वाहकांना अनेक परगावी मुक्काम करावा लागतो. तेव्हा किमान एकवेळचे जेवण घेता येईल, एवढा भत्ता मिळावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
शासनाच्याच एका सव्‍‌र्हेक्षणानुसार महाराष्ट्रात दररोज रेल्वेव्यतिरिक्त एक कोटी ६० लाख नागरिक प्रवास करतात. त्यातील जेमतेम ४० टक्के प्रवासी एस. टी.ने प्रवास करतात. अधिक आणि आरामदायी सुविधा दिल्यास हे प्रमाण वाढू शकेल. संघटनांमध्ये काम विभागले असल्याने त्यांचे प्रश्न एकत्रितपणे शासन दरबारी मांडले जात नाहीत. एकीकडे कोणतेही कर न भरता अनधिकृतपणे खासगी वाहतूकदार प्रवासी वाहतूक करीत असताना दुसरीकडे एस. टी. महामंडळाकडून मात्र शासनाने टोल आणि प्रवासी करापोटी गेल्या वर्षी ५०० कोटी रुपये वसूल केले. हा कर अन्यायकारक आहे. तो माफ केला तर त्यातून एस. टी. महामंडळास प्रवाशांना अधिक सुविधा देता येतील, असेही जाणकारांचे म्हणणे आहे. राजकीय हेतूंनी प्रेरित विविध कामगार संघटना आपल्या स्वार्थापलीकडे पाहू शकत नसल्याने वर्षांनुवर्षे जोखमीची सेवा व्यवस्थित बजावूनही एस. टी. कर्मचाऱ्यांना अल्प वेतनावर समाधान मानावे लागत आहे.