Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

सुरक्षा रक्षकाकडूनच साजिद नाडियादवालाच्या घरी ५० लाखांची चोरी
मुंबई, ९ जानेवारी / प्रतिनिधी

 
प्रसिद्ध चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला यांच्या खाजगी सुरक्षा रक्षकाने आज त्यांना व त्यांच्या पत्नीला बंदुकीचा धाक दाखवत घरातील सुमारे ५० लाख रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला.
प्रभात शिवपूजन त्रिपाठी (२३) असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील अलहाबाद येथील रहिवाशी असलेला प्रभात मुंबईला येण्यापूर्वी उत्तर प्रदेश पोलीस दलात कार्यरत होता. मात्र मायावतीच्या सरकारने नव्याने पोलीस दाखल झालेल्या पोलिसांची भरती रद्द केल्याने त्याची नोकरी गेली. त्यामुळे तो नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. येथे आल्यानंतर अभिनेता सलमान खान याचा अंगरक्षक शेरू याच्या मालकीच्या ‘टायगर सिक्युरिटी’साठी काम करू लागला. सहा महिन्यापूर्वीच शेरूने त्याची नाडियादवाला यांचा खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती केली होती. गुरूवारी रात्री नेहमीप्रमाणे तो नाडियादवाला यांना त्यांच्या वर्सोवा येथील आशियाना अपार्टमेंटमध्ये असलेल्या घरी सोडून परतला होता. मात्र मध्यरात्री तीनच्या सुमारास तो पुन्हा नाडियादवाला यांच्या घरी गेला. त्या वेळी नाडियादवाला आणि त्यांची पत्नी घरात होते. घरात शिरताच त्याने स्वत:कडील गावठी कट्टा नाडियादवाला यांच्या पत्नीच्या डोक्यावर ठेवला आणि नाडियादवाला यांना धमकावून कपाटातील सर्व मालमत्ता त्याच्या हवाली करण्यास सांगितले. घाबरलेल्या नाडियादवाला यांनी कपाटात असलेले १० लाख रुपये रोख आणि ४० लाख रुपये किंमतीचे दागिने त्याच्या हवाली केले. ते घेऊन प्रभातने तेथून पळ काढला. या घटनेनंतर नाडियादवाला यांना तात्काळ वर्सोवा पोलिसांना दूरध्वनी करून घडल्या प्रकाराची माहिती दिली. तसेच प्रभातविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, याप्रकरणी वर्सोवा पोलीस तपास करीत असून ‘टायगर सिक्युरीटी’चा मालक शेरू यालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते