Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

मुंबईसारखा हल्ला झाला असता तर अमेरिकेने कडवे उत्तर दिले असते - बाऊचर
मुंबई, ९ जानेवारी / प्रतिनिधी

 
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखा हल्ला अमेरिकेवर झाला असता तर अमेरिकेने त्याला कडवे उत्तर दिले असतेच. त्याचवेळी दहशतवादी हल्ले संपूर्णत: रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय प्रभावीपणे योजले असते, असे अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री रिचर्ड बाऊचर यांनी आज सांगितले. मुंबईत हल्ला घडवणाऱ्या दहशतवादी गटांचा कायमचा बंदोबस्त व्हावा, अशी अमेरिकेची इच्छा असल्याचेही बाऊचर यांनी स्पष्ट केले.
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांबाबत बाऊचर यांनी आज मरीन लाईन्स येथील अमेरिकन सेंटरमध्ये वार्ताहरांशी संवाद साधला. मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि अमेरिकेची भूमिका याभोवतीच प्रत्येक प्रश्न केंद्रित राहिला होता आणि त्यास उत्तर देताना बाऊचर यांनी थेट भाष्य करण्याचे टाळले. दहशतवादी हल्ले कुणी आणि कसे केले हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. दहशतवादी गटांचा पूर्णत: बीमोड झाला तरच आपण सर्वजण सुरक्षित राहणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
दहशतवादाचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसला आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, मात्र याच ठिकाणांचा वापर करून दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. या दहशतवादी गटांपासून पाकिस्तानने सुटका करून घ्यायला हवी. एक गट काश्मीरमध्ये व दुसरा मुंबईत असता कामा नये. हे सर्व गट कायदेशीररीत्या संपविणे हेच आपले ध्येय असले पाहिजे, असेही बाऊचर यांनी सांगितले. सीमेपलीकडे असलेल्या दहशवादी गटांच्या तळांवर भारताने थेट हल्ला चढविला पाहिजे का, असे विचारले असता, दहशतवाद्यांचा हैदोस जोपर्यंत आपण सहन करीत आहोत तोपर्यंत पाकिस्तान, अमेरिकेसह भारत दहशतवादी कारवायांपासून मुक्त राहणार नाही, असे उत्तर दिले.
पाकिस्तानला भेट दिल्यानंतर भारतात आल्याचे बाऊचर यांच्या निदर्शनास आणून देता ते म्हणाले की, पाकिस्तानने अनेक दहशतवाद्यांना अटक केली आहे तसेच दहशतवादी गटाांविरुद्ध कारवाई सुरू आश्वासक प्रारंभ केला आहे. मात्र त्यापेक्षा अधिक त्यांनी केले पाहिजे. २६ नोव्हेंबरसारखा हल्ला पुन्हा होता कामा नये याची आम्ही सर्वांनीच खात्री करून घेतली पाहिजे, असेही बाऊचर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
मुंबईवर केलेल्या हल्ल्याबाबत भारताने ज्या पद्धतीने तात्काळ तपास आणि चौकशी सुरु केली त्याला अमेरिकेकडून संपूर्ण मदत केली जाईल आणि आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असे स्पष्ट करताना बाऊचर यांना, कसाब हा पाकिस्तानी आहे का, असे विचारले असता, आपल्याला त्याबाबत नीट कल्पना नाही, असे राजनैतिक उत्तर त्यांनी दिले. हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानी असल्याबाबतचे पुरावे भारताने तसेच अमेरिकेनेही पाकला दिले, याकडे लक्ष वेधल्यानंतरही त्यावर त्यांनी थेट बोलण्याचे टाळले. पाकिस्तानच्या अण्वस्त्र क्षमतेबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बाऊचर यांनी तो प्रश्न सध्या तरी आपल्याला महत्त्वाचा वाटत नसल्याचे सांगितले.