Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

‘महेंद्र कपूर यांना रंगमंचावरून मराठी गाणे सादर करायचे होते..’
मुंबई, ९ जानेवारी / प्रतिनिधी

 
महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारा’ने महेंद्र कपूर यांना सन्मानित करणार असल्याचे समजले तेव्हाच रंगमंचावरून मराठी गाणे गाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत पण राज्यशासनाचा हा पुरस्कार स्वीकारताना मला फार आनंद होत आहे, असे उद्गार महेंद्र कपूर यांचे पुत्र रुहान कपूर यांनी काढले त्यावेळेस उपस्थितांचाही कंठ दाटून आला होता. महेंद्र कपूर यांच्या जयंतीदिनी आज यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते महेंद्र कपूर यांच्या पत्नी प्रवीणलता आणि मुलगा रुहान कपूर यांनी ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले.
मुख्यमंत्री म्हणाले की, आज हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी महेंद्र कपूर असते तर त्यांच्या आवाजातून आपल्याला सर्व गाणी ऐकता आली असती. आजच्या कार्यक्रमात त्यांची कमी जाणवत आहे. पण ही कमतरता त्यांच्या मुलाने गाणी गायल्यामुळे थोडीफार भरून निघाली आहे. महेंद्र कपूर यांचे कलाक्षेत्रात बहुमूल्य योगदान आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी महेंद्र कपूर यांचे नाव एकमताने मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र शासनातर्फे नेहमीच कलाकारांचा गौरव करण्यात आला आहे. केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर जगभरातील हिंदी-मराठी गाण्यांचे चाहते महेंद्र कपूर यांना कधीही विसरणार नाही, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी काढले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, महेंद्र कपूर यांना हा पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढली आहे. येत्या १ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सांस्कृतिक खात्यातर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी मुस्कान बामनी या लहानगीने ‘दुल्हन चली’ या गाण्यावर नृत्य सादर करत आजच्या कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर सुरेश वाडकर यांनी ‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘दिल लगा कर’ ही गाणी सादर केली. प्रत्येक गाण्याला खच्चून भरलेल्या यशवंतराव चव्हाण केंद्रातील श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. जगजीतसिंग, रवींद्र जैन, शान, जसविंदर नरूला, अलका याज्ञिक, उदित नारायण, दीपा नारायण, शब्बीर कुमार, मधुश्री यांनीही महेंद्र कपूर यांची गाणी गाऊन त्यांच्याविषयी असलेली आदराची भावना प्रकट केली. सूत्रसंचालन करणाऱ्या रुबी भाटियाने महेंद्र कपूर यांच्या आयुष्यातील काही किस्से सांगत कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढतवतच नेली.