Leading International Marathi News Daily                                 शनिवार, १० जानेवारी २००९
प्रादेशिक

रेल्वेत मराठी तरुणांना नोकरी हवीच - मुख्यमंत्री
ठाणे-पनवेल लोकलसेवेचे उद्घाटन

ठाणे, ९ जानेवारी/प्रतिनिधी

राज्यातील मराठी आणि गैरमराठी हा सुरू झालेला वाद थंडावत असताना कोणताही भेदभाव न करता महाराष्ट्रीय तरुणांना रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे, अशी ठोस भूमिका मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज रेल्वे राज्यमंत्र्यांसमक्ष मांडली. ठाणे-तुर्भे-नेरुळ या मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि रेल्वे राज्यमंत्री नारणभाई राठवा यांच्या हस्ते ठाण्यात झाले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले, ठाणे-तुर्भे -पनवेल या रेल्वेसाठी सिडकोने ६७ टक्क्यांच्या भागीदारीत एक हजार ४५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

मंदीला फटकारून गझनीचा दोन आठवडय़ात २०० कोटींचा गल्ला!
हॉलीवूडची टीम येणार मुंबईत

समर खडस
मुंबई, ९ जानेवारी

जागतिक मंदी, सत्यम कॉम्प्युटर्सचा घोटाळा, शेअर बाजाराचे वाजलेले बारा या सगळ्या नन्नाच्या पाढयाला झिडकारून गझनी या अल्लू अरविंद आणि मधू मंतेनाच्या ‘गझनी’ने आज दुसरा आठवडा संपताना चक्क २०० कोटींवर झेप घेतली आहे. मधू मंतेना (वर्मा) आणि अल्लू अरविंद यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार ‘गझनी’च्या या यशाने भारावून जाऊन हॉलिवूडमधील काही तज्ज्ञदेखील बॉलिवूम्ड प्रेक्षकांच्या या तुफान प्रतिसादाचा अभ्यास करण्यासाठी येत्या काही दिवसांत मुंबईत येणार आहेत. यात मल्टिप्लेक्सचे मालक, व्यवस्थापक आणि साध्या चित्रपटगृहांमध्ये स्टॉलमध्ये शिट्टय़ा आणि टाळ्यांच्या गजरात चित्रपटाचा आस्वाद घेणारे प्रेक्षक यांच्या भेटीगाठी हॉलिवूडची ही टीम घेणार आहे.

निवडणुका जिंकण्यासाठी भले सरकारची तिजोरी रिती करण्याची राज्यकर्त्यांची तयारी!
मुंबई, ९ जानेवारी / खास प्रतिनिधी

मोफत वीज तसेच विविध सवलतींचा २००४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला फायदा झाल्यानंत्ांर पुन्हा निवडणुकाजिंकण्याच्या उद्देशाने सत्ताधाऱ्यांनी शेतकरी वर्गापाठोपाठ विविध घटकांवर सवलतींचा वर्षांव करण्याचे सूचित केले आहे. समाजातील सर्व वर्गांना खूश करण्याकरिता भले सरकारची तिजोरी रिती करण्याची भाषा राज्यकर्त्यांनी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी तसे विधानच केले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने श्रेय लाटण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोफत विजेची घोषणा केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून लोकशाही आघाडी सरकारने हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांची मते मिळविली.

भाषा जिवंत ठेवायची असेल तर ती संगणकावर पोहोचली पाहिजे-डॉ. विजय भटकर
मुंबई, ९ जानेवारी / प्रतिनिधी

भारतीय भाषांसाठी एकच युनिकोड असावा यासाठी सीडॅकतर्फे करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आल्याने आता भारतात संगणकाचा प्रसार अधिक वेगाने होईल असा विश्वास सुपर कॉम्पुटर 'परम संगणक'चे प्रणेते डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला. मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील संकुलात कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा व साहित्यभवन येथे आयोजित चौथ्या आंतरभारती साहित्य संवाद संमेलनात भटकर बोलत होते. साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक संस्था व गुरूदेव टागोर तौलनिक साहित्याध्यासन यांच्यावतीने दोन दिवसाचे आंतरभारती साहित्य संमेलन भरवण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय खोले, संमेलनाचे अध्यक्ष अर्जुन डांगळे, साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक संस्थेचे अध्यक्ष सुधीर देसाई, रामदास भटकळ, हरिश्चंद्र थोरात, कवयित्री नीरजा, सुरेश कसले, प्रमुख पाहुणे डॉ. अशोक वाजपेयी आदी व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्र माचे सूत्रसंचालन शैलेश आवटी यांनी केले. विजय भटकर यांनी त्यांच्या विशेष भाषणात भारताच्या संगणकीय प्रगतीचा आढावा घेतला.

कृषी उत्पन्न बाजार समितीतील मालवाहतूकदारही संपात सामिल?
नवी मुंबई, ९ जानेवारी/प्रतिनिधी

तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकर आधीच ‘गॅस’वर असताना आज सायंकाळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या वाशी बाजारातील सुमारे ५०० हून अधिक वाहतूकदारांनी वाहतूकदारांच्या संपात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केल्याने मुंबईसह आसपासच्या नगरांमध्ये आता जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. वाशी बाजारातून दररोज सुमारे पाच हजाराहून अधिक वाहने मुंबईत भाजीपाला, कांदा-बटाटा, अन्न-धान्य पोहचवीत असतात. आता या बाजारांमधील वाहतूकदार मध्यरात्रीपासून संपात सहभागी होत असल्याने मुंबईत या वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

असुरक्षित वाय-फाय नेटवर्क शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची मोहीम
मुंबई, ९ जानेवारी / प्रतिनिधी

दहशतवाद्यांनी पाठविलेल्या धमकीच्या इ-मेलनंतर मुंबईतील असुरक्षित वाय-फाय नेटवर्कचा मुद्दा प्रकाशात आला होता. त्याच पाश्र्वभूमीवर येत्या १२ जानेवारीपासून मुंबईतील असुरक्षित वाय-फाय नेटवर्क शोधून ते सुरक्षित करण्याची मोहीम मुंबई पोलिसांतर्फे राबविण्यात येणार असून ८२ पोलीस अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी मोबाईल आणि लॅपटॉपसह असुक्षित वाय-फाय इ-मेल शोधताना दिसेल. या मोहिमे अंतर्गत सूचना देऊनही एखाद्याने असुरक्षित वाय-फाय नेटवर्क सुरक्षित केले नाही आणि त्याच्या वाय-फाय नेटवर्कचा गैरवापर केला गेला तर त्या व्यक्तीलाही दोषी ठरवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
हल्ल्यांपूर्वी दहशतवाद्यांनी धमकीचे इ-मेल पाठविले होते. असुरक्षित वाय-फाय नेटवर्कचा फायदा घेऊन तसेच इ-मेल हॅक करून दहशतवाद्यांनी हे धमकीचे इ-मेल पाठविण्यात आले होते.

एकीचे बळ नसल्याने एस. टी. कर्मचारी घाटय़ात!
प्रशांत मोरे
ठाणे, ९ जानेवारी

सार्वजनिक सेवा देणारी इतर महामंडळे आणि निमसरकारी आस्थापनांच्या तुलनेत कितीतरी अधिक उत्पन्न मिळवूनही केवळ एकीचे बळ नसल्याने एस. टी. कर्मचाऱ्यांवर कायम घाटय़ात राहण्याची आफत ओढवली असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. महाराष्ट्रात रेल्वेव्यतिरिक्त दररोज सरासरी एक कोटी ६० लाख प्रवासी विविध वाहनांमधून प्रवास करतात. उपलब्ध यंत्रणेद्वारे एस. टी.ने कमाल एक कोटी प्रवाशांची वाहतूक शक्य आहे. मात्र देखभाल दुरुस्ती आणि विस्तारीकरणाबाबत उदासीनता असल्याने सरासरी ६३ लाख प्रवाशांचीच वाहतूक एस. टी. द्वारे होते.

संपेना संप : जीव टांगणीला
मुंबई, ९ जानेवारी / प्रतिनिधी
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा संप संध्याकाळनंतर मिटल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वा:स सोडला. मात्र वाहतूकदारांचा संप अद्यापही सुरूच असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवडय़ामुळे महागाई भडकण्याच्या भीतीने मुंबईकरांचा जीव टांगणीला आहे.ओएनजीसीने सकाळपासून महानगर गॅसला (एमजीएल) सुरू केलेल्या अतिरिक्त गॅसपुरवठय़ामुळे मुंबईतील लाखो घरांमधील गॅस विझण्याची नामुष्की आज टळली. दुपारी बारा वाजल्यापासून बेस्टच्या आठ आणि एमजीएलच्या तीन सीएनजी फिलिंग स्टेशनवर गॅस उपलब्ध झाला. संध्याकाळी सहानंतर शहरातील ५३ फिलिंग स्टेशन सुरू करण्यात आले होते व शनिवार सकाळपर्यंत शहरातील सर्व १३४ फिलिंग स्टेशन नेहमीप्रमाणे कार्यरत होतील, असे एमजीएलच्या प्रवक्त्याने सांगितले.

राज्यात तीन नवीन एस.ई.झेड. स्थापन होणार
मुंबई, ९ जानेवारी / खास प्रतिनिधी

देशात सर्वाधिक विशेष आर्थिक क्षेत्रे मंजूर झालेल्या महाराष्ट्रात आणखी तीन एस.ई.झेड. स्थापन करण्यात येणार आहेत. यापैकी दोन एस.ई.झेड. कोकणातील आहेत.केंद्र सरकारच्या समितीसमोर राज्यातील तीन प्रस्ताव पुढील आठवडय़ात मंजुरीसाठी येणार आहेत. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. तीनपैकी दोन एस.ई.झेड. हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहेत. हे दोन्ही प्रस्ताव कोकणातील आहेत. नाशिकमध्ये सव्‍‌र्हिस क्षेत्राशी संबंधित एस.ई.झेड. उभारला जाणार आहे. या तीन एस.ई.झेम्डमुळे राज्याच्या औद्योगिक उत्पादन क्षमतेत वाढ होणार आहे.

‘आयडियल’मध्ये अनुवादित साहित्याचे अनोखे प्रदर्शन
मुंबई, ९ जानेवारी/प्रतिनिधी

मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या अनुवादित पुस्तकांचे अनोखे प्रदर्शन दादरच्या ‘आयडियल पुस्तक त्रिवेणी’च्या वतीने आयोजिण्यात आले आहे. १५ ते २५ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या प्रदर्शनात भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेली जगातील विविध भाषांतून मराठीत अनुवादित झालेली पुस्तके मांडण्यात येणार आहेत. आयडियलचे मंदार नेरुरकर यांनी सांगितले की, या प्रदर्शनात किरण बेदी यांचे आय डेअर, सुधा मूर्ती यांचे गोष्टी माणसांच्या, जे. के. रोलिंग यांचे हॅरी पॉटर, बम्र्यूडा ट्रँगल, प्रज्वलित मने, नॉट विदआऊट माय डॉटर, अग्निपंख, फाळणीचे हत्याकांड आदी वाचकप्रिय पुस्तकांसह असंख्य पुस्तके असतील. वाचकांना या प्रदर्शनात पुस्तकखरेदीवर १० ते २५ टक्के सवलतही देण्यात येईल, असे नेरुरकर यांनी सांगितले. हे प्रदर्शन सोमवारीही सुरु राहणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये एलसीडी स्क्रीन
मुंबई, ९ जानेवारी / प्रतिनिधी

बेस्ट बसेसप्रमाणेच पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्येही एलसीडी स्क्रीन बसविण्यात येणार आहे. या एलसीडींच्या माध्यमातून मनोरंजन आणि जाहिराती प्रसारित केल्या जाणार असून, एलसीडी स्क्रीन बसविलेली पहिली लोकल उद्यापासून रुळांवर येईल.
प्रायोगिक तत्वावर पश्चिम रेल्वेकडून प्रथम बारा डब्यांच्या पाच लोकलमध्ये या एलसीडी बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक लोकलच्या डब्यात सहा एलसीडी असतील. पुरेशा उंचावर त्या बसविण्यात येणार असून, त्यांची चोरी रोखण्यासाठी अत्याधुनिक अलार्म सिस्टिम कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे कोणीही त्या चोरण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांना तात्काळ एसएमएसद्वारे त्याबाबतची माहिती मिळेल, असे ‘इंटिग्राकॉम’चे व्यवस्थापकीय संचालक एल. विजभूयषण रेड्डी यांनी सांगितले.
‘इंटिग्राकॉम’कडून बसविण्यात येणाऱ्या या एलसीडी स्क्रीनचा उद्घाटन समारंभ आज रेल्वे राज्यमंत्री नारणभाई राठवा यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये पार पडला. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना रेड्डी यांनी ही माहिती दिली.

रंगवल्लीतर्फे अनिल मोहिले यांचे संगीत शिबिर
मुंबई, ९ जानेवारी / प्रतिनिधी

प्रसिद्ध रंगवल्ली परिवारातर्फे संगीतकार अनिल मोहिले संचालित सुगम संगीत शिबिराचे त्याचप्रमाणे वारली पेंटिंग शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर अंधेरी (पश्चिम) येथे तिन्ही रविवार ११, १८ आणि २५ जानेवारी रोजी होणार आहे. तर वारली पेंटिंग शिबिर एकाच दिवसाचे असून, ते ११ जानेवारी रोजी होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क अजित दिघे- ९३२२२६०१५८ / २६३१७९७१

रेल्वेकडून बैदुर स्थानकात तीन गाडय़ांना हंगामी थांबा
मुंबई, ९ जानेवारी / प्रतिनिधी

मुकांबिका मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाने कोकण रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या वेरावळ-त्रिवेंद्रम एक्स्प्रेस, गांधीधाम-नागरकोईल एक्स्प्रेस, ओखा-एर्नाकुलम एक्स्प्रेस या गाडय़ांना हंगामी थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ११ जानेवारी ते १० जुलै या कालावधीकरिता हा थांबा देण्यात आला आहे. दोन्ही दिशांच्या प्रवासात या गाडय़ा बैंदुर स्थानकात थांबणार असून, प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन सहा महिन्यांनंतर हा थांबा कायम करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे कोकण रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.