Leading International Marathi News Daily                                 शनिवार, १० जानेवारी २००९

मुंबईकरांच्या गाडय़ा ‘रिझव्‍‌र्ह’वर
प्रतिनिधी

रात्री नऊच्या सुमारास मुलुंडच्या आर-मॉलजवळील पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी रिक्षांची किंवा वरळी नाक्यावर पेट्रोल अथवा सीएनजी भरण्यासाठी टॅक्सींची रांग दिसणे हे नेहमीचेच दृश्य. मात्र मालवाहतूकदार आणि तेल कंपन्यांच्या संपामुळे मुंबईतील परिस्थिती चिघळल्याचे दृश्य दिसत होते. मुंबईतील अनेक पेट्रोलपंपावर शुक्रवारी वाहनचालकांची लांबच लांब रांग लागलेली दिसत होती. मात्र काही पेट्रोलपंपांवर ‘पेट्रोल-डिझेल संपले’ अशा पाटय़ा लावण्यात आल्या होत्या. त्या पाहून वाहनचालक दुसऱ्या पेट्रोलपंपाच्या दिशेने धाव घेताना दिसत होते. पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. वाहनचालकांची पेट्रोल-डिझेल मिळविण्यासाठी धावपळ सुरू असतानाच अनेक मुंबईकर टॅक्सी, रिक्षा मिळविण्यासाठी वणवण फिरत होते. पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक टॅक्सी-रिक्षाचालकांनी आपल्या गाडय़ा रस्त्यावर न उतरवता सुटी घेतली. पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्यामुळे मुंबईतील अनेक पेट्रोलपंपांवर शुकशुकाट होता. या एकंदर परिस्थितीमुळे शुक्रवारी मुंबईकरांचे जनजीवन ‘रिझव्‍‌र्ह’वर आले होते.

पालिकेत सहायक सुरक्षा भरतीत अन्याय
प्रतिनिधी : महानगरपालिकेतील सहाय्यक सुरक्षा रक्षकांच्या भरतीत मराठी तरूणांवर अन्याय झाल्याची तक्रार या भरतीत डावलण्यात आलेल्या तरूणांनी केली आहे. अनेकदा पालिका आयुक्तांना निवदेन देऊन आणि लोकप्रतिनिधींना साकडे घालूनही या तरूणांना न्याय मिळालेला नाही. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पालिकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना शारीरिकदृष्टय़ा सक्षम आणि सर्व चाचण्या पास होणाऱ्या तरूणांना डावलण्यात येत असल्याने पालिका प्रशासन सुरक्षेबाबत खरेच गंभीर आहे का, असा सवाल विचारला जात आहे. पालिकेत सुरक्षा रक्षकांच्या भरतीसाठी २००४ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी १२२ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी २२ उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले. मात्र ही पात्रता प्रशासनाने रात्री नऊ वाजता ठरविली. पालिकेच्या सेवेत असलेले १० सुरक्षा रक्षक या चाचणीत उतरले होते. पूर्वीचा कामाचा अनुभव त्यांच्या पाठिशी होता. तसेच त्यांनी रस्सी चढणे, धावणे आणि इतर कसरतीची चाचणी पूर्ण केली. शारीरिक चाचणीत हे १० उमेदवार यशस्वी झाले आहेत. मात्र त्यांना डावलण्यात आले आहे.

दिपालीच्या इच्छाशक्तीला अनोखा सलाम!
सुभाष हरड

आई धुणीभांडी करणारी व वडील अपंगत्व विसरून फाटक्या चपला शिवून शे-पन्नास रुपये कमविणाऱ्या घरातील आई-वडिलांची एकुलती एक हुशार असलेली दिपाली तिचे इंजिनीअरिंगचे स्वप्न आकारण्यासाठी करीत असलेल्या धडपडीचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले. अन् अनेकांनी उदार अंत:करणाने ‘लोकसत्ता’ कार्यालयात, मदतीसाठी धनादेश दिले तर काहींनी तिचे शहापूरमधील शेणवा येथील घर गाठून धीर देऊन पालकत्व घेऊन दिपालीच्या इच्छाशक्तीला अनोखा सलामच केला आहे. दहावीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण मिळविणारी दिपाली भोईर ही शहापूरपासून १४ कि. मी. अंतरावर असलेल्या शेणवा गावातील चर्मकार असलेल्या दत्तात्रय भोईर व विमल भोईर यांची एकुलती एक मुलगी. उदरनिर्वाहासाठी धडपडणारे व भूमिहीन असलेले हे दांपत्य शिक्षणापासून कोसो मैल दूर. आई-वडिलांकडे शिक्षणाचा वारसा नसतानाही दिपालीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत दहावीत ८५ टक्के गुण मिळविले. मुंब्रा-ठाणे येथील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये संगणकाचा डिप्लोमा करीत असलेली दिपाली भोईर परिस्थितीचे इंजिनीअरिंग कसे करणार, अशी चिंता तिच्या आ-वडिलांना सतावत होती.

श्रावणीवरील शस्त्रक्रियेसाठी ५५ हजारांचा धनादेश सुपूर्द
प्रतिनिधी : 'तीन महिने वयाच्या श्रावणी गुरवला हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी हवीय मदत' या शीर्षकाची बातमी लोकसत्ताच्या रविवार वृत्तान्तमधून प्रसिद्ध झाल्यानंतर दानशूर वाचकांनी जे धनादेश भारत विकास परिषदेच्या डोंबिवली शाखेकडे व के. ई. एम. रुग्णालयाकडे पाठवले, त्यामुळे १६ जानेवारीला श्रावणीवरील शस्त्रक्रिया शक्य झाली आहे, अशी प्रतिक्रिया श्रावणीचे वडील यशवंत गुरव यांनी लोकसत्ताकडे व्यक्त केली आहे. भारत विकास परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या वतीने आज झालेल्या एका छोटेखानी समारंभात के. ई. एम. रुग्णालयाच्या नावे काढलेले ५५ हजार रुपयांचे धनादेश लोकसत्ताचे निवासी संपादक सुधीर जोगळेकर यांचे हस्ते गुरव यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. परिषदेचे पदाधिकारी प्रवीण दुधे, सुधीर भागवत, विनोद करंदीकर, दीपक नामजोशी, जयंत कुळकर्णी, सुरेश फाटक, सुरेखा जोशी तसेच श्रावणीच्या आई व मावशी याप्रसंगी उपस्थित होते.

आता ‘इंडियन आयडॉल’मधून कोण जाणार?
प्रतिनिधी : कुलदीप सिंग चौहान ‘इंडियन आयडॉल’मधून बाहेर गेला. यावेळी कोणी मुलगी एलिमिनेट झाली नाही याबद्दल परीक्षकांनी समाधान व्यक्त केले. प्रेक्षक योग्य मतदान करीत आहेत असे वाटत असतानाच कुलदीपसारख्या हुशार गायकाला कमी मते मिळाल्याने परीक्षक आश्चर्यचकीत झाले आहेत. अजूनही नि:पक्षपातीपणे मतदान होत नसल्याची भावना परीक्षकांमध्ये आहे. आपल्या प्रदेशातील स्पर्धकांनी मते देण्याची प्रेक्षकांची मानसिकता अजूनही बदललेली नाही, असे मत परीक्षकांकडून व्यक्त करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमात गाण्याइतकेच स्पर्धकांच्या अदाकारीला महत्त्व आहे. त्यामुळे ज्या स्पर्धकाची अदाकारी लोकांना आवडते त्यानुसार त्यांना मते मिळतात. त्यामुळे आता कुलदीपनंतर कोण जाणार? याबद्दल परीक्षकांच्या मनात धाकधूक आहे. भाव्या ही अतिशय चांगली गायक आहे व अदाकारीच्या दृष्टीने परीक्षक तिच्यावर खूश आहेत. प्रसनजीतसुद्धा चांगले गातो व दर आठवडय़ाला त्याच्यात सुधारणा होत आहे. सुरभी ही सर्वार्थाने ‘इंडियन आयडॉल’ बनण्यास योग्य असल्याचे परीक्षक वेळोवेळी सांगत असतात. तोर्षांने आपल्या गाण्यात कायम एक सातत्य राखले आहे. मोहित हा चांगला गायक आहे. राजदीपही अतिशय उत्तम गातो. आता या शनिवारी ‘इंडियन आयडॉल’च्या सेटवर काय घडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ‘इंडियन आयडॉल’चा हा भाग शनिवारी रात्री ९.०० वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हीजनवर बघता येईल.

राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत वरळीची लावणी उत्कृष्ट
प्रतिनिधी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दुसरी राज्यस्तरीय स्पर्धा अलीकडेच अमरावती येथे पार पडली. वरळी येथील संस्थेने सादर केलेल्या लावणीला या स्पर्धेतील सवरेत्कृष्ट लावणीचे पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट मुख्य नर्तकीचे तीन पुरस्कार मेघा चव्हाण (मुंबई), रुपाली पाटील (लातूर) व मोनाली कुळसंगे (अमरावती) यांना मिळाले. मुंबईच्या मेघा चव्हाणला ‘पोवळा पुरस्कार’ देण्यात आला. विजेत्यांना अमरावतीचे पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावतीचे महापौर अशोक डोंगरे होते. या वेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त मोहन धोत्रे, उपकल्याण आयुक्त सतीश वाभाडे उपस्थित होते.

प्रभात चित्र मंडळातर्फे उद्या ‘बाई माणूस’चा विशेष खेळ
प्रतिनिधी : प्रभात चित्र मंडळातर्फे उद्या, शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता अरुण नलावडे दिग्दर्शित ‘बाई माणूस’ या नव्या चित्रपटाचा विशेष खेळ ‘रंगस्वर’ चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. या चित्रपटाची पटकथा ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आणि प्रभात चित्र मंडळाचे माजी सचिव अशोक राणे यांनी लिहिली आहे. या विशेष खेळाला चित्रपटातील प्रमुख कलावंत व तंत्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. प्रभाततर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारी ‘लघुपटांसमवेत एक सायंकाळ’ १२ जानेवारी रोजी ‘रंगस्वर’ चव्हाण सेंटर येथे सायंकाळी ५.३० वाजता साजरी होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम ‘प्रभात’च्या सदस्यांसाठी खुले असून अन्य रसिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहायचे असल्यास प्रभात चित्र मंडळाच्या कार्यालयात २४१३१९१८ वर दुपारी १ ते सायं. ७ या वेळेत संपर्क साधावा.

सी-डॅकची प्रवेश परीक्षा
प्रतिनिधी : बीई, बीएस्सी आयटी, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स आणि बीसीएची पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सी-डॅक या संस्थेतर्फे एम-पॉवर या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात येते. या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा १७ जानेवारी रोजी असून हा अभ्यासक्रम ९ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी २६७०५४९८, २६२५५६२९ किंवा ९९८७०६२४१६ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

बीएमएनचा टेकझोन महोत्सव
प्रतिनिधी : माटुंगा येथील एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या डॉ बी.एम.एन. महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागाच्या वतीने ‘टेकझोन’ या माहिती तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ९ व १० जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात माहिती तंत्रज्ञानावर प्रश्नमंजुषा, प्रोग्रॅमिंग, डॉक्युमेंटरी, गेम्स, डिबेट, प्रेझेंटेशन, वेब डिझायनिंग, ट्रेझर हंट या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यंदा टेक्नो साँग व टेक्नो डान्स हे दोन उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी २४०३५२९६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

साठय़े महाविद्यालयात वनौषधी प्रदर्शन
प्रतिनिधी : विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालय मंडळाच्या साठय़े महाविद्यालयाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, त्यानिमित्त विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आयुर्वेदिक वनौषधींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सुमारे २०० रोपटय़ांचा समावेश असलेले हे प्रदर्शन सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व नागरिकांसाठी खुले आहे. अमूल्य वनौषधींच्या महत्त्वाचा प्रसार करून सर्वसामान्यांपर्यंत आयुर्वेद नेण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख एस.एस. सारंगधर यांनी केले आहे.