Leading International Marathi News Daily                                 शनिवार, १० जानेवारी २००९
नवनीत

जी व न द र्श न
सर्व संस्कार व्ययधर्मी

आपण आपल्या जगण्याचे प्रयोजन, जगणे अर्थपूर्ण करणे आणि ते सुंदर करणे, नटविणे किंवा सजविणे मानले तरच अमंगल आणि दुष्ट प्रवृत्तींविरुद्ध आपल्याला ताठ मानेने उभे राहता येईल. इतकेच नव्हे तर जगण्यातील सार्थकता आणि सौंदर्य आपल्याला मृत्यूच्या भीतीपासूनही भयमुक्त करील. मृत्यूच्या स्वागताचे बळ, त्याचा आनंदसोहळा साजरा करण्याचे सामथ्र्य आपल्याला कमावता येईल. तेच बळ, तेच सामथ्र्य सिद्धार्थ गौतमाने कमाविले आणि ते बुद्ध बनले. तेच सामथ्र्य त्यांच्या अनेक शिष्य आणि शिष्यिगणींनी कमावले आणि त्या निर्वाणाला उपलब्ध झाल्या. तेच सामथ्र्य चोखोबा आणि तुकोबांच्या अनेक अभंगांतून प्रकट झाले आहे. आपला मृत्यू दु:खद नव्हे तर आनंदसोहळा बनावा यापेक्षा अधिक भाग्य कोणते असू शकते? तीच तर खरी जगण्याची सार्थकता आहे. या सार्थकतेला स्पष्ट करणारे अनेक संदर्भ बौद्धांच्या पाली वाङ्मयात आहेत. आजचा माणूस दिवसागणिक त्याच्या माणूसपणापासून दूर चालला आहे. राजकारणी मंडळी तर नवनव्या

 

मुखवटय़ाशिवाय जगूच शकत नाहीत, अशी स्थिती आहे. सामान्य माणसाला आपण खोटय़ा माणसांच्या गर्दीत वेढलो गेल्याची अगतिकता तीव्र होऊ लागली आहे. या गर्दीतही प्रेम देणारी, आधार वाटावा, अशी कॉ. गोविंदराव पानसरे यांच्यासारखी तुरळक माणसे भेटणे हे आपले भाग्य आहे. जीवनात प्रेम आणि करुणा या जगण्याचे ऊर्जास्रोत आहेत. त्यांच्या आधारानेच जगणे सार्थ आणि सुंदर बनविता येते. ज्यांचे जगणे सार्थ आणि सुंदर होते तेच मृत्यूपासून भयमुक्त होतात. भगवान बुद्धाप्रमाणे मृत्यूच्या स्वागताच्या तयारीला लागतात. संत तुकारामाप्रमाणे मृत्यूचा आनंदसोहळा अनुभवतात. त्या शेवटच्या निरोपाच्या वेळी बुद्धाचे शेवटचे शब्द असतात, ‘‘भिख्खूंनो, असा सावधान! कारण सर्व संस्कार व्ययधर्मी असतात.’’ बुद्धांची शेवटची कृती असते ध्यानाची, अमृतानुभवाच्या लाभाची आणि त्यांची शेवटची इच्छा असते चक्रवर्ती राजाच्या मृतदेहाप्रमाणे सर्व प्रकारच्या सुगंधी लाकडावर, त्यांच्या चितेवर, स्वत:चा मृतदेह भस्म करण्याची आणि शेवटची आज्ञा असते; लोकांनी प्रसन्न चित्ताने फुलांचा वर्षांव करून सुगंधी चूर्ण उधळण्याची. म्हणूनच भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण हा मृत्यूच्या स्वागताचा आनंदसोहळा बनला होता.
डॉ. रावसाहेब कसबे

कु तू ह ल
ताऱ्यांचे रंग

आपल्याभोवती दिसणारे तारे हे वेगवेगळय़ा रंगांचे असतात. ताऱ्यांचे हे वेगवेगळे रंग काय दर्शवितात?
अमावास्येच्या रात्री किंवा आकाशात चंद्र नसताना मिट्ट काळोख असलेल्या ठिकाणाहून आकाशात सहज नजर फिरवली तर सर्व तारे निळसर पांढऱ्या रंगाचे दिसतात. मात्र त्यातल्या काही ताऱ्यांकडे निरखून पाहिले तर त्या ताऱ्यांचा रंग लालसर तांबूस, हिरवट किंवा पिवळसर दिसतो. हे ताऱ्यांचे रंग खरे किंवा फसवेही असू शकतात. एखादा तेजस्वी तारा क्षितिजाजवळ असताना जास्त लुकलुकताना दिसतो. असा तारा वातावरणाच्या जास्त थरातून येताना होणाऱ्या प्रकाशाच्या विकिरणामुळे अनेक रंगांमध्ये चमकताना दिसतो. ताऱ्याचे हे रंग फसवे असतात, पण तारा जर आकाशात, क्षितिजापासून उंच असेल व हवा स्थिर असेल तर ताऱ्याचा दिसणारा रंग खरा असू शकतो. तारे वायुरूप व तप्त असतात. ताऱ्यांच्या अंतर्भागातील तापमान काही कोटी अंश सेल्सिअस असले तरी त्यांच्या पृष्ठभागावरील तापमान काही हजार अंश सेल्सिअस इतके असते. या तापमानानुसारच ताऱ्यांना रंग प्राप्त होतो. सर्वसाधारण समजूत अशी असते, की अतितप्त म्हणजे लालबुंद. खरेतर हा समज चुकीचा आहे. त्यात रंग हा तुलनेने कमी तापमान दर्शवतो, तर निळा रंग सर्वात जास्त तापमान दर्शवितो. तापमान व रंग याचा असा थेट संबंध आहे. ताऱ्याच्या पृष्ठभागावरील तापमान जर ३००० ते ३५०० अंश सेल्सिअस असेल तर त्याचा रंग लाल असतो. मृग तारकासमूहातील काक्षी हा तारा लाल रंगाचा दिसतो. ४५०० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान असलेले तारे नारंगी रंगाचे दिसतात. स्वाती नक्षत्राचा तारा नारंगी रंगाचा आहे. ६००० अंश सेल्सिअसच्या जवळपास ताऱ्यांना पिवळसर रंग प्राप्त होतो. आपला सूर्य पिवळय़ा रंगाचा तारा आहे. १० हजार अंश सेल्सिअस तापमानाचा तारा पांढऱ्या रंगाचा, तर २५,००० अंश सेल्सिअस तापमानाचा तारा निळय़ा रंगाचा दिसतो. व्याध हा निळसर रंगाचा तारा आहे.
प्रदीप नायक
pradeepnayak@gmail.com

दि न वि शे ष
राष्ट्रसंघ

आपापसात लढत राहिल्यास उद्या सारी मानवजात नष्ट होईल हे लक्षात आल्यावर जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी पहिल्या महायुद्धाच्याच काळात जे प्रयत्न सुरू झाले, त्यातून १० जानेवारी १९२० ला जन्माला आला ‘राष्ट्रसंघ’. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष व्रिडो विल्सन यांनी विचारवंतांच्या परिषदेत ही संकल्पना मांडली खरी, पण अमेरिका स्वत:च राष्टसंघाची सदस्य न बनल्याने राष्ट्रसंघ स्थापनेपासूनच दुबळा राहिला. जिनेव्हा येथे मुख्यालय असलेल्या राष्ट्रसंघाच्या कामकाजासाठी परिषद, समिती, सचिवालय, आंतरराष्ट्रीय न्यायालय अशा तरतुदी होत्या. पण पराभूत राष्ट्रांना सदस्यत्व मिळाल्यानंतर जर्मनी, जपान, इटली, रशिया बाहेर पडले आणि राष्ट्रसंघ कागदोपत्री राहिला. दुसरे महायुद्धही तो रोखू शकला नाही. १९४६ साली राष्ट्रसंघ बरखास्त करण्यात आला.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
दोघे भाऊ आणि दप्तर

‘शशांक, अरे हे बघ, काय गंमत आणलीय तुझ्यासाठी.’ आईची हाक आली तशी चित्रे काढत बसलेल्या शशांकने दार उघडले. आई टूरवरून आली होती. तिच्या हातात एक रंगबिरंगी दप्तर होते. ‘अरे, आजच्या कॉन्फरन्समध्ये भेट मिळाली ही बॅग. किती छान आहे नाही!’ चपला काढून आई आत आली आणि तिने शशांकला दप्तर दिले. खरंच फार छान होतं ते! पुस्तके, वहय़ा, पेन्सिली ठेवायला वेगवेगळे कप्पे होते, डबा आणि पाण्याची बाटलीही त्यात बसत होती. सारे भगवे, निळे अन् गुलाबी रंगसंगतीचे! आई चहा करायला स्वयंपाकघरात गेली आणि शशांक दप्तर उघडून कुठे काय ठेवायचे ठरवू लागला. चक्क एक पॉकेटमनीचे पाकीटही होते त्यात! मस्त. अर्धवट राहिलेले चित्र सोडून नवं दप्तर भरण्यात तो दंग झाला. उद्या ऐटीत शाळेत जाऊया म्हणताना कप्प्यातून धप्पकन दुसरे दप्तर खाली पडले. मेघांकचे दप्तर नेहमीच गच्च आणि धबडगे असायचे. आई म्हणायची, ‘अरे शशांक धाकटा असून बघ किती व्यवस्थित आहे. तू कसा असा गबाळा!’ शशांक ते दप्तर उचलायला गेला, पाहतो तो खालून शिवण उसवली होती. कोपरे झिजून फाटले होते. अडकवायच्या पट्टय़ाचीही दोरी झाली होती.
शशांकने मेघांकचे दप्तर उचलून कपाटात ठेवले आणि स्वत:चे नवे दप्तर भरायला सुरुवात केली, पण मनात विचार चालू झाले- मेघांकचे दप्तर माझ्या दप्तरापेक्षा खूप खराब झालेय. मी छोटा म्हणून आईने मला नवे दप्तर दिले. खाऊ आणला तर मला आधी देते. बाबासुद्धा असेच करतात. मेघांकचा शर्ट मला आवडला म्हणून घातला. थोडा ढगळच होता. तर मेघांक म्हणाला, ‘घेऊन टाक रे तुलाच. मस्त दिसतोय.’ आपण नवे दप्तर घेऊन आपले दप्तर मेघांकला देऊया.
‘शशांक, आईने पोहे केलेत. ये खायला.’ बाबांची हाक आली. पोहे खाताना आई बाबांना म्हणाली, ‘आज आमच्या संस्थेला मदत म्हणून एका बाईंनी मुलींचे कपडे व इतर वस्तूंनी भरलेली बॅग दिली. मुली खूष झाल्या. बॅगा उघडल्या आणि धक्का बसला. तुटक्या चपला, फाटके कपडे, थोडय़ा वस्तूच वापरण्याजोग्या होत्या.’ ते ऐकून शशांक अस्वस्थ झाला आणि उठून गेला. निरुपयोगी वस्तू देऊन मदतीचा आव आणणाऱ्या बाईमध्ये आणि माझ्यात काय फरक. मी मेघांकला माझे जुने दप्तर देऊन नवे घेणे चूक आहे. त्याने मेघांकची पुस्तके, वहय़ा सारे नव्या दप्तरात भरले आणि त्याचे खराब दप्तर माळय़ावर टाकून दिले.
आपल्यापेक्षा इतरांचा विचार अधिक करणारा समाधानी होतो. जे मिळेल त्यात आनंद मानणारा आनंदी होतो.
आजचा संकल्प- आपल्या भावंडांशी, मित्रमैत्रिणींशी स्वत:पेक्षा त्यांचा विचार अधिक करून आज वागून पाहा.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com