Leading International Marathi News Daily                                 शनिवार, १० जानेवारी २००९

सुहास खामकर नवी मुंबई महापौर श्री
बेलापूर/वार्ताहर : नवी मुंबई महापालिकेतर्फे आयोजित राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या सुहास खामकर या शरीरसौष्ठवपटूने २००९ सालचा ‘नवी मुंबई महापौर श्री’ पुरस्कार पटकाविला. ५१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचबरोबर नवी मुंबई महापालिका क्षेत्र मर्यादित ‘नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री’चा पुरस्कार नेरुळच्या स्वप्नांजल पराडकर यांनी पटकाविला. १५ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या स्पर्धेतील बेस्ट पोझर म्हणून पुण्याच्या विवेक शिर्के याने बाजी मारली, तर मुंबईच्या समीर वरळीकर याने उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू म्हणून सन्मान मिळविला.

‘देर से आए दुरुस्त आए!’
पनवेल/प्रतिनिधी : ठाणे- पनवेल शुभारंभाची पहिली लोकल पनवेल स्थानकामध्ये आज नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा म्हणजे दोन वाजून ५० मिनिटांनी दाखल होऊनही प्रवाशांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले. या लोकलची मागणी आम्ही पाच वर्षांंपासून करीत होतो. त्यामुळे एक तासांचा हा विलंब नगण्य आहे. ‘देरसे आए दुरस्त आए’ अशी बोलकी प्रतिक्रिया पनवेल प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तीकुमार दवे, सचिव श्रीकांत बापट व अन्य पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ठाण्याहून निघालेल्या या गाडीचे गार्ड व ठाण्याला जातानाचे मोटरमन अशोक पांडे तसेच या गाडीने ठाण्याला जाण्यासाठी आवर्जून आलेल्या प्रवाशांना प्रवासी संघातर्फे गुलाबाची फुले देण्यात आली. यावेळी पनवेलचे स्टेशन मास्तर दिनेश गुप्ता, विभागीय व्यवस्थापक एस. के. मिश्रा, सिडकोचे अधिकारी तसेच असंख्य प्रवासी उपस्थित होते. ठाणे- पनवेल हा ३५ किलोमीटरचा मार्ग असून त्यासाठी ५५ मिनिटे लागतील. या गाडीच्या दुसऱ्या दर्जाचे तिकीट १३ रुपये तर प्रथम वर्गाचे तिकीट ११० रुपये आहे, अशी माहिती गुप्ता यांनी दिली. लवकरच या गाडीच्या एकूण २० फेऱ्या करण्यात येतील, असेही ते म्हणाले. आम्ही अनेक वर्षे दिवामार्गे ठाण्याला जात होतो, परंतु या थेट लोकलमुळे वेळेची व पैशाची खूपच बचत होणार आहे, अशी प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.

अतिक्रमणे हटवतानाही मराठी-अमराठी भेद
पनवेल/प्रतिनिधी : पनवेलमधील फेरीवाले आणि फिरत्या हातगाडीवर व्यवसाय करणारे विक्रेते यांच्याकडून होणाऱ्या अतिक्रमणात नगरपालिका प्रशासनाकडून मराठी-अमराठी असा भेद केला जात असून, परप्रांतीय फेरीवाल्यांना झुकते माप मिळत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेचे शहर चिटणीस विशाल सावंत यांनी नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर यांना याबाबत निवेदन दिले असून, हा दुजाभाव थांबवण्याची मागणी केली आहे. पालिकेतर्फे वरचेवर अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात येते. मात्र या मोहिमेचा फटका केवळ बाजारपेठेतील भाजीपाला व फळविक्रेत्यांना बसतो. उदरनिर्वाहासाठी आपल्या मळ्यातील भाजीपाला पनवेलमध्ये आणणारे हे विक्रेते बव्हंशी मराठी आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा व रोटरी सर्कलच्या परिसरात भेळपुरीच्या अनेक गाडय़ा अनेक वर्षांपासून बस्तान बसवून आहेत. या सर्व गाडय़ांचे मालक परप्रांतीय असून, या व्यवसायात पनवेलमध्येही त्यांनी मक्तेदारी निर्माण केली आहे. फिरत्या गाडीचा परवाना असूनही वर्षांनुवर्षे एकाच जागी दिवसभर व्यवसाय करणाऱ्या या अमराठी मंडळींना मात्र पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कायमचे अभय लाभले आहे, याकडे सावंत यांनी लक्ष वेधले आहे. निकृष्ट कच्चा माल आणि पिण्यायोग्य नसलेल्या पाण्याने तयार केले जाणारे हे पदार्थ अस्वच्छता आणि अनारोग्यास आमंत्रणच देतात. तरीही पालिकेचा संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करतो, असे सावंत यांनी म्हटले आहे. यातील एकाही गाडीवाल्यावर पालिकेने अद्याप कारवाई केलेली नाही. उलटपक्षी अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचारी या गाडीवाल्यांकडून ‘वसुली’ करतात, असे निदर्शनास आल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. अतिक्रमणविरोधी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी गणवेष घालणे बंधनकारक असूनही काही कर्मचारी हा नियम पाळत नाहीत. याचा लाभ काही मंडळी घेतात व आपण अतिक्रमणविरोधी विभागातील आहोत, असे भासवून अनेक विक्रेत्यांना फसवतात, असे या निवेदनात म्हटले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पालिकेने या विक्रेत्यांमध्ये मराठी-अमराठी भेद करू नये, अशी मागणी सावंत यांनी नगराध्यक्षांकडे केली. यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष शीतल सिलकर, दीपक शहा, इस्माईल तांबोळी, गजेंद्र म्हात्रे, आशीष मोहोकर आदी उपस्थित होते.

ओएनजीसी अधिकाऱ्यांच्या संपाला कर्मचाऱ्यांचा पाठिंबा; कामकाज ठप्प
उरण/वार्ताहर : तेल कंपन्याच्या अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा देत असहकार पुकारल्याने उरण येथील ओएनजीसी प्रकल्पाचे काम बंद पडले आहे. यामुळे ओएनजीसीला शेकडो कोटींचे नुकसान सोसण्याची पाळी येऊन ठेपली आहे. उरण येथील ओएनजीसीच्या प्रकल्पातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कामगारांनी संपावर गेलेल्या अधिकाऱ्यांना पाठिंबा देत कामकाज बंद केले. पीयूई व बीओपी या दोन्ही कामगार संघटनांचे कामगार अधिकाऱ्यांना ‘मोरल सपोर्ट’ देण्यास सरसावल्याने ओएनजीसीच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. तेल कंपन्याच्या अधिकाऱ्यांना पाठिंबा दिल्याने ओएनजीसीचे शेकडो कोटींचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा पीईयू संघटनेचे सरचिटणीस नंदू खानविलकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. मात्र महानगरसाठी लागणारा गॅस व ऑईलचा आवश्यकतेप्रमाणे पुरवठा होत असल्याची माहिती ओएनजीसीच्या अधिकृत सूत्रांनी दिली. कामगारांनी अथवा कामगार संघटनांनी अद्याप तरी अधिकाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिल्याचे अधिकृत पत्र ओएनजीसीला दिले नसल्याचेही अधिकृत सूत्रांनी माहिती देताना सांगितले. दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू असून, या संपाबाबत लवकरच तोडगा निघेल, असा दावाही ओएनजीसी सूत्रांनी केला. दरम्यान ओएनजीसीकडून येथील ८५२ मेगाव्ॉट वीज निर्मितीच्या केंद्राला गॅसचा पुरवठा केला जातो. ओएनजीसीकडून दररोज उरणच्या वायु विद्युत केंद्राला होणारा ३.५ एमएमसीएमडी इतका होणारा वायू पुरवठा बुधवारपासून बंद झाला आहे. यामुळे गुरुवारपासूनच या प्रकल्पाची वीज निर्मितीची क्षमता शून्यावर येऊन ठेपली आहे. यामुळे खाजगी गॅस कंपन्याकडून गॅस घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आल्याची माहिती प्रकल्प मुख्याधिकारी अधिकारी व्ही. एन. खोकले यांनी दिली. ओएनजीसी प्रकल्पातून होणाऱ्या गॅस पुरवठय़ावर भेंडखळ येथील बीपीसीएमचा गॅस रिफिलिंग प्लांटवरही विपरीत परिणाम झाला आहे. सध्या या प्रकल्पात गॅस आहे. मात्र वाहतूकदारांच्या संपामुळे गॅसची वाहतूक बंद पडली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. वाहतूकदारांच्या संपामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे येथील बहुतांश पेट्रोल पंप बंद पडले आहेत. वाहतूकदाराचा संप व पेट्रोल, डिझेल मिळणे बंद झाल्याने उरणच्या जेएनपीटी परिसरात हजारो ट्रेलर, टँकर्स, ट्रक व इतर वाहने ठिकठिकाणी उभी आहेत.

पनवेलमध्येही पेट्रोलपंप बंद
पनवेल/प्रतिनिधी : तेल अधिकारी व वाहतूकदारांच्या संपाचा फटका पनवेलमधील पेट्रोलपंपांना बसला आहे. पनवेल परिसरात एकूण सहा पेट्रोलपंप असून त्यातील एकही पंपावर इंधन उपलब्ध नाही. या पाश्र्वभूमीवर खासगी वाहनचालक व रिक्षाचालकांच्या तोंडचे पाणी पळाले असून संप न मिटल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. फळे- भाजीपाला आदींची आवक न झाल्यास हॉटेल्सही बंद ठेवावी लागण्याची चिन्हे आहेत.

हिंदू धर्मजागृती फेरीचे उद्या आयोजन
बेलापूर/वार्ताहर : हिंदू जनजागृती समितीतर्फे नेरुळ येथे उद्या ११ जानेवारी रोजी भव्य धर्मजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीचे जतन, संवर्धन व प्रसार करणे, हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्माचरणाचे महत्त्व पटवून देणे यांसाठी ही फेरी काढण्यात आल्याचे समितीचे निमंत्रक रमेश सनील यांनी सांगितले. पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण, धर्मांतरण, देवी-देवतांचे बिडंबन आदींबाबत जनजागृती या फेरीतून करण्यात येणार आहे. रविवारी, ११ जानेवारी रोजी नेरुळ (प.) गावदेवी मंदिर येथून सायंकाळी ४.३० वाजता ही धर्मफेरी काढण्यात येणार असून, यात जास्तीत जास्त धर्माभिमानी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.