Leading International Marathi News Daily                                 शनिवार, १० जानेवारी २००९

अभूतपूर्व इंधनटंचाई
नाशिक / प्रतिनिधी

मालवाहतूकदारांचा सुरू असलेला संप व त्यातच पेट्रोलियम कंपन्यांतील अधिकाऱ्यांनी पुकारलेला असहकार यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अभूतपूर्व इंधनटंचाई निर्माण झाली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस आदि सगळ्याच इंधनाचा ठणठणाट जाणवत असल्याने याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, अशी सर्वाची अपेक्षा आहे. टंचाईमुळे परिसरातील जवळपास सगळेच पेट्रोलपंप बंद ठेवावे लागत असून ज्या काही थोडय़ा पंपांवर इंधन शिल्लक आहे, तेथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, एकंदरीतच वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला.
गेल्या पाच दिवसापासून सुरु असलेल्या माल वाहतूकदारांचा संप व तेलकंपन्यांचे अधिकारीही संपावर गेल्याने पेट्रोल व डिझेलची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गुरुवारी रात्रीपासून शहरातील केवळ हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या मोजक्या पंपांवर इंधन शिल्लक होते. पण, शुक्रवारी सकाळी तेदेखील संपल्याने सर्वत्र खडखडाट झाला. इंडियन ऑइल व भारत पेट्रोलियम कंपन्यांनी आपला साठा संपल्याचे जाहीर केले आहे.

वऱ्हाड इंदूरहून परत!
औद्योगिक क्षेत्रातील मंदीचा नाशिक महापालिकेला जकातीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. मंदीचे संकट आणि विकासकामे यांची कशी सांगड घालायची याची चिंता मुंबईसह प्रत्येक महापालिकेला सतावत असताना नाशिक महापालिकेने त्यावर बहुदा कधीच उपाय शोधून काढलेला असावा. त्यामुळेच तर शहरातील कोणकोणते नवीन उपक्रम आखणे शक्य आहे, हे अभ्यासण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासकीय अधिकारी दूर देशी फेरफटका मारण्यासाठी जात असतात. काँग्रेससह महापालिकेतील सर्वच विरोधी पक्षही खूपच समंजस. असा अभ्यास दौरा करण्याची जेव्हा गरज भासते, तेव्हा त्यांची सत्ताधाऱ्यांना साथच असते. सत्ताधाऱ्यांना अशा प्रकारे सदोदित सहकार्याचा हात पुढे करणारा विरोधी पक्ष इतरत्र कुठेही सापडण्याची शक्यता कमीच. महापालिकेमार्फत शहर बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव असून शहरासाठी बससेवेची कोणती पध्दत योग्य होईल, याचा अभ्यास करण्यात सध्या महापौरांसह आयुक्त व विरोधी पक्षाचे गटनेतेही गुंतले आहेत. अभ्यास करावयाचा म्हटल्यावर दूरदेशी जाणे आलेच.

सकारात्मक दृष्टिकोन व दबावगटाची आवश्यकता
नाशिकला उद्योगनगरीचा दर्जा बहाल करण्यात येथे असणाऱ्या निरनिराळ्या ऑटोमोबाईल प्रकल्पांचा मोठा हातभार आहे. तथापि, मंदीच्या पाश्वभूमीवर सध्या बहुसंख्य उद्योग संकटात सापडले असून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला तर त्याचा तडाखा सर्वाधिक बसला आहे. परिणामी, नाशिक व परिसरातील उद्योग विश्वावर अवकळा पसरू लागली आहे. अशा परिस्थितीत स्थानिक उद्योग क्षेत्राला दिलासा देण्यासाठी नेमके काय करणे शक्य आहे, त्याबाबत कोणत्या उपाययोजना तातडीने हाती घ्यायला हव्यात याविषयी अपेक्षा व्यक्त करतानाच नाशिकच्या एकूणच उद्योग क्षेत्राचा नाशिक इंडस्ट्रीज् अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे (निमा) माजी अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी मांडलेला लेखाजोखा.. नाशिक व परिसरातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये काय कमतरता आहेत व त्या कशा दूर करता येतील, त्याबाबत गेल्या नऊ भागांमध्ये विविध मुद्दय़ांच्या आधारे परामर्श घेण्यात आला.

धुळ्याच्या नव्या महापौरांसमोर कामाच्या डोंगराचे आव्हान
वार्ताहर / धुळे

महापालिकेवर सत्ता स्थापण्यात यशस्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या महापौर, उपमहापौरांसमोर आता शहरवासीयांच्या विविध प्रश्नांसह विकास कामांच्या पूर्ततेचे आव्हान राहणार आहे. प्रामुख्याने वर्षभर अखंडीतपणे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, स्वच्छतेचे सातत्य, नव्या-जुन्या रस्त्यांचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण, नव्या वसाहतींमध्ये पथदीप या सुविधा उपलब्ध करून देतानाच त्या पुरविण्यासाठी आवश्यक असलेले उत्पनाचे स्तोत्र निर्माण करणेही आवश्यक ठरणार आहे.

गैरव्यवहार प्रकरणी ‘बेलगंगा’च्या अध्यक्षांसह १३ संचालकांवर गुन्हा
वार्ताहर / चाळीसगाव

येथील बेलगंगा सहकारी साखर कारखान्यातून दोन कोटी ५१ लाख रुपयांच्या साखरेची परस्पर विक्री केल्या प्रकरणी जिल्हा सहकारी बँकेने कारखान्याच्या अध्यक्षांसह १३ संचालकांविरुद्ध चाळीसगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेनेही व्यापाऱ्यांना सहकार्य करावे ; शिष्टमंडळाची भूमिका
नाशिक / प्रतिनिधी

नाशिकरोड परिसरातील बिटको पॉईंट ते जनार्दनस्वामी पूल रस्त्यापर्यंतच्या रुंदीकरणासाठी आम्ही महापालिकेस सहकार्य करण्यास तयार आहोत. परंतु, पालिकेनेही आम्हास सहकार्य करावे, अशी भूमिका जेलरोड, इंगळेनकर परिसरातील व्यापारी व दुकानदारांनी नाशिकरोडचे प्रभाग सभापती सूर्यकांत लवटे व पालिका अधिकाऱ्यांपुढे मांडली. दुकानदारांच्या समस्यांविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानास खासगी कंपन्यांचेही सहकार्य
नाशिक / प्रतिनिधी

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी राज्य शासनातर्फे विविध प्रकारे प्रयत्न करण्यात येत असताना मुंबईस्थित एक्सेल क्रॉप केअर लिमीटेडने गावांमधील गाजर गवत व घन कचऱ्यापासून कम्पोस्ट खत तयार करण्याच्या पद्धतीचा प्रचार व प्रसार करण्याकरिता अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार (एप्रिल ते डिसेंबर २००८ दरम्यान) राज्यातील ३५ जिल्ह्य़ात पाच हजार नागरिक साथीच्या रोगांमुळे रुग्णालयात भरती झाले आहेत, पैकी ३२ लोकांना प्राणास मुकावे लागले आहे. अस्वच्छता, आरोग्याविषयी अज्ञान व सर्वाचे दुर्लक्ष यासाठी कारणीभूत असल्याचे यातून पुढे येत असून त्याला आळा घालण्यासाठी ग्रामस्वच्छता अभियानासारखे उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आता या बाबीवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

‘कंत्राटी कामगार पद्धती’ विषयावर कार्यशाळा
प्रतिनिधी / नाशिक

नाशिक इण्डस्ट्रिज आणि मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन व इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कंत्राटी कामगार व्यवस्थापन’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन येत्या रविवारी निमा हाऊस, सातपूर येथे करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलजीचे संचालक डॉ. एन. वाय. फडणीस ‘कंत्राटी कामगार पद्धतीचा योग्य वापर, कंत्राटी कर्मचारी करार लिहीण्याचे फायदे व तोटे, त्यची अभ्यास पद्धती, कंत्राटी कामगार संबंधीचे कायदेशीर मुद्दे’ आदी महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या एकदिवसीय कार्यशाळेचा उद्देश कंत्राटी पद्धतीतील लेखापरीक्षण विभाग, निरीक्षण विभाग, व्यवस्थापकीय विभाग आदी विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना विविध संधी उपलब्ध करून देणे हा आहे. तसेच सर्वसामान्य कामगार वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी निमा कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन निमा अध्यक्ष रमेश वैश्य, मानद सरचिटणीस धनंजय बेळे व कार्यशाळा उपसमिती चेअरमन विनस वाणी यांनी केले आहे.

भारतापुढील आर्थिक संकटाची ही तर सुरूवात - सोमय्या
नाशिक / प्रतिनिधी

औद्योगिक क्षेत्रात जाणवणारी आर्थिक मंदी ही वास्तवात आर्थिक आपत्ती आहे असे सांगताना भारतापुढे येणाऱ्या आर्थिक संकटांची ही खरी सुरूवात आहे, असा इशारा भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी येथे दिला. नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनतर्फे (निमा) आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. मानद सरचिटणीस धनंजय बेळे यांनी प्रास्तविक केले. अध्यक्ष रमेश वैश्य यांनी सोमय्या यांचे तर रमेश कनानी यांनी उपमहापौर अजय बोरस्ते यांचे स्वागत केले. कार्यशाळेच्या प्रारंभी महापालिकेचे उपायुक्त सतीश खडके यांनी आर्थिक मंदिचा सरळ सरळ परिणाम नाशिकच्या प्रगतीवर होत असून महापालिकेचा जमा होणारा जकात हा दरवर्षांच्या तुलनेत पाच टक्क्य़ांनी कमी आहे. नाशिकच्या महापालिकेचे सर्व जकात उत्पन्न हे अ‍ॅटोमोबाईल कंपनीवर अवलंबून असते. त्यामुळे त्याचा सरळ परिणाम नाशिकच्या प्रगतीवर होत आहे असे सांगितले. मुंबई-पुण्यातीलच नव्हे तर नाशिकसारख्या शहरांतही मोठय़ा आणि पर्यायाने लहानही उद्योगांना आर्थिक संकटाचा फटका बसला आहे. त्यामुळे ठिकठिकाणचे जवळपास एक लाख कामगार बेरोजगार झाले आहेत. या संकटास सामोरे जाण्यासाठी वास्तविकता स्वीकारणे गरजेचे आहे. अन्यथा सत्यम सारखे अनेक घोटाळे घडतील अशी भीती सोमय्या यांनी व्यक्त केली. हे आर्थिक संकट अ‍ॅटोमोबाईल कंपन्यांकडून पूरक उत्पादकांकडे येत आहे. हे आर्थिक संकट टाळण्यासाठी आपणच आपल्या शहरातील विविध क्षेत्रातील अभ्यास करून उपाययोजना कराव्यात व त्यासाठी एकत्रित येवून सरकारला आपल्या समस्यांबाबत उपयोजना सूचवाव्यात असेही ते म्हणाले. याप्रसंगी कैलास आहेर, निशीकांत अहिरे, श्रीपाद कुलकर्णी, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष डी. जी. जोशी, राजेंद्र छाजेड, विनस वाणी, सतिश कोठारी, देवयानी महाजन, भाजप शहराध्यक्ष विजय साने, प्रदीप पेशकर, संजय महाजन आदि उपस्थित होते.

नाशिकमध्ये जिल्हास्तरीय मुख्याध्यापक उद्बोधन शिबीर
प्रतिनिधी / नाशिक

नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने १५ व १६ जानेवारी रोजी गंगापूररोड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात मुख्याध्यापक उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेदहा वाजता शिबिराचे उद्घाटन होणार असून यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागाचे अध्यक्ष गुरूनाथ कंठे, आ. डॉ. वसंत पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, आ. दिलीप सोनवणे, शिक्षण विभाग उपसंचालक संतोष पाटील, शिक्षण सभापती विष्णूपंत म्हैसधुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी ‘आरक्षण आणि बिंदू नामावली’, ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातील समस्या व उपाय’, ‘शालेय लेखापरीक्षण’, ‘शालेय व्यवस्थापनातील नव्या दिशा’, ‘योग साधना व आरोग्य’, ‘मुख्याध्यापक- शंका समाधान’ या विषयांवर व्याख्याने होतील. दुसऱ्या दिवशी ‘वेतन देयके सादर करणे’, ‘माहितीचा अधिकार’, ‘संपूर्ण माणूस घडविणारे शिक्षण’ या विषयांवर व्याख्याने व पुण्याचे सदानंद चांदेकर यांचा ‘हसरी उठाठेव’ हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. जिल्हयातील मुख्याध्यापकांनी शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

हिंदुस्थान कोका कोला कंपनीतील कामगारांना पगारवाढ
नाशिक / प्रतिनिधी

अंबड औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान कोका कोला कंपन व सिटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियन यांच्यात कामगारांना २,७२५ ते २,८४५ रुपये वेतनवाढ देणारा त्रवार्षिक करार नुकताच करण्यात आला. या व्यतिरिक्त कामगारांना महागाई भत्यातही वाढ मिळणार आहे. यामुळे तीन वर्षांत ७०० रुपये पेक्षा जास्त वाढ होईल. १० वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कामगारांना पाच हजार सेवापूर्व अनुदान मिळणार आहे. कामगारांना ८.३३ टक्के बोनस व सहा हजार रुपये उत्पादकता बोनसही मिळणार आहे. ३१ डिसेंबर २०१० पर्यंत हा करार अस्तित्वात असेल. जागतिक मंदीच्या अरिष्टाखाली उद्योग व्यवसाय असतानाही बहुराष्ट्रीय कंपनीत हा करार झाला आहे. करारावर व्यवस्थापनाच्यावतीने कंपनीचे व्यवस्थापक विशाल खेताणी, सी. श्रीनिवासलू, निरज बरेथीया, मुकुंद भागवत, अभय जोशी, सी. डी. कुलकर्णी, युनियनचे सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, अध्यक्ष आर. एस. पांडे, सीताराम ठोंबरे, यशवंत पवार, संतोष काकडे, कामगार प्रतिनिधी पी. जी. पालोदकर, डी. आर. दातीर, डी. एस. काळे, व्ही. पी. शिंदे, आर. ए. बेडसे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

गुरूजी रूग्णालयातर्फे
आज महिला आरोग्य जागृती चर्चासत्र

नाशिक / प्रतिनिधी - येथील गुरूजी रूग्णालयाच्या वतीने शनिवारी सायंकाळी पाच वाजता जनकल्याण रक्तपेढीमध्ये महिलांसाठी आरोग्य जागृती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. चाळीशीनंतर महिलांना आरोग्याच्या तक्रारी सुरू होण्याचा धोका असतो. रजोनिवृत्तीच्या वेळेस दिसणारी लक्षणे म्हणजे हाडे ठिसूळ होणे, पाठदुखी, पाळीच्या तक्रारी, झोपेतील अनियमितपणा, याशिवाय कॅन्सरचीही लक्षणे दिसतात. अशा समस्यांवर वेळीच लक्ष केंद्रित करून तपासणी केल्यास धोका टळू शकतो. याचे गांभीर्य ओळखून श्री गुरूजी रूग्णालयाच्या वतीने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. विश्राम दिवाण, डॉ. पद्मजा जोसी, डॉ. गिरीश बेंद्रे चर्चासत्रात सहभागी होणार आहेत, अशी माहिती डॉ. संतोष गायकवाड यांनी दिली.