Leading International Marathi News Daily                                 शनिवार, १० जानेवारी २००९
विशेष

बामणीची स्थिती आजही शरम वाटावी अशीच !
‘अतिदुर्गम भागातील बालकांचे कुपोषण, गोवर वा हगवणीसारख्या आजाराने मृत्यू व्हावेत ही बाब निश्चितच प्रशासनाला शोभा देणारी नाही. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर शरमेने मान खाली गेली..!’ इति दिवंगत माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण.
१९८७ च्या सुमारास नंदूरबार जिल्ह्य़ाच्या अक्कलकुवा, धडगाव या अतिदुर्गम आदिवासी तालुक्यांमध्ये गोवर व हगवण यासारख्या आजारामुळे शेकडो बालकं मृत्युमुखी पडली होती. त्यावेळचा तो मृत्युचा आकडा खरा की खोटा याबाबतचा संशय आजही म्हणजेच तब्बल दोन दशकानंतरही शंका घेण्याइतपत वादग्रस्त. आताचे पालकमंत्री हेच तेव्हाही पालकमंत्री अन् आदिवासी विकास मंत्री. त्याकाळी कडक शिस्तीच्या ज्या मुख्यमंत्री महोदयांची मान शरमेने खाली गेली, त्यांचेच पुत्र अशोक शंकरराव चव्हाण हे सध्या त्याच जबाबदारीच्या खुर्चीवर विराजमान. सातपुडा पर्वतराजीतील अतिदुर्गम पाडय़ांना जोडणाऱ्या बारमाही रस्त्यांसाठी आतापर्यंत कोटय़वधी खर्ची पडल्यावरही येथे सहजी जायचे म्हटले तरी शेजारच्या गुजरातला वळसा घालूनच जावे लागते अशा बामणी व डनेल या पाडय़ावर प्रस्तुत प्रतिनिधीने भेट दिली तेव्हा पहिल्या इयत्तेतील मालसिंग मोआऱ्या वसावे हा रस्त्यातच निपचित पडलेला आढळून आला. डोळे खोलवर गेलेले, आजारपणाने डोळ्यातील चमक केव्हाच नाहीशी झालेली, त्याचे निस्तेज डोळे अशाही अवस्थेत जगण्याच्या मार्गावर खिळून असल्यागत..थोडक्यात काय तर बामणीत दोन-अडीच दशकापूर्वीची स्थिती आजही कायम असून अगदी मान शरमेने वारंवार खाली जावी इतपत ती आहे. सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगा व त्यातून वाहत जाणारी नर्मदा नदी. या पर्वतरांगा अन् नदी हीच महाराष्ट्र व गुजरातची सीमारेषा निश्चित करते. हा भाग पूर्णत: डोंगराळ, दाट जंगलाने वेढलेला. सरदार सरोवराच्या निर्माणामुळे आता जंगल काहीसे विरळ झाले असले तरी ही परिस्थिती फक्त मराठी भूमीपुरती मर्यादित. या उलट नर्मदेपल्याड गुजरात हद्दीतील जंगल आजही संवर्धीत, घनदाट आणि सुस्थितीतील. शहरी रस्त्यांची आठवण त्या अतिदुर्गम भागातही प्रकर्षांने व्हावी एवढय़ा चांगल्या अवस्थेत. पर्वतांचे सान्निध्य अन् नर्मदेची कुस यात वसलेले बहुचर्चित बामणी. आतापर्यंत जेवढी काही दु:ख, कष्ट, हालअपेष्टा अन् उपेक्षा बामणीच्या वाटय़ाला पिढय़ान्पिढय़ा चालत आली तेवढीच ती डनेल, चिमलखेडी, मणिबेली, जांखटी, सिंदुरी, गमण, मुकडी, मांडवा, कंजाला, सांबर, वेलखेडी, पलासखोबरा आणि डेबरामाळ या पंधरा गाव वा पाडय़ांच्या समूहाला येत आहे.

मुंबई ‘माझे शहर’ कधी होणार ?
जगातील प्रत्येक प्रसिद्ध शहराने आपले वैशिष्टय़ अगदी इतिहासाच्या खाणाखुणांसह खास जपले आहे. मात्र अशा जगविख्यात शहरांचे वेगळेपण इथेच संपत नाही. सत्ताधारी आणि प्रशासनाने शहर सुंदर ठेवण्यासाठीची आर्थिक तरतूद आणि अन्य व्यवस्था केली की, त्यापुढची सर्वात मोठी जबाबदारी नागरिकांची सुरु होते. मुंबई आणि जगातील अन्य शहरांत जर मोठा फरक पडत असेल तर तो इथेच म्हणजे नागरिकांच्या जाणीवांबाबत पडतो ! या जाणीवेबाबतच्या उदासीनतेमुळेच मुंबई शहराला बकालपणाच्या गर्तेत एवढे खोल ढकलले आहे की, आता हे शहर एकेकाळचे आपले वैभव परत मिळवू शकेल की नाही, याबाबत कुणीही अंदाज व्यक्त करू शकणार नाही. हे वास्तव अधिक भयंकर आहे.
शहर म्हणजे केवळ नोकरी, पोटापाण्याची व्यवस्था आणि त्याअनुषंगाने येणाऱ्या साऱ्या सोयीसुविधा नव्हेत. त्यापलीकडेही माझे वास्तव्य असलेला हा एक स्वच्छ, सुंदर प्रदेश आहे, त्याला मोठा इतिहास आहे, ही कुठल्याही मॉलमध्ये विकत न मिळणारी अंर्तमनातील जाणीव आहे. मुंबईबाबत अशी जाणीव आज निर्माण होऊ शकते काय ?
अगदी साध्या साध्या गोष्टी एखाद्या शहराच्या संपन्नतेत भर घालत असतात. त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या शहराचा प्रथमदर्शनी दिसणारा चेहरा असतो. तोच जर ओंगळवाणा असेल तर त्याला शहर तरी कशाला म्हणायचे, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुंबईकरांच्या दुर्देवाने या शहराचा चेहरा केवळ विद्रूपच झालेला नाही तर त्याला आता असाध्य रोगांनी ग्रासलेही आहे.
मान्य आहे की, या शहरात संपूर्ण देशातून रोजीरोटीसाठी लोंढे येतात. हे शहर, येथील मूळ महाराष्ट्रीयन त्यांना स्थिरावूही देतो. मात्र त्यापलीकडे येथे अनेक वर्षे राहूनही हे शहर स्वच्छ राहावे, यासाठी या ‘नव्या’ मुंबईकरांत काही जाणीव आहे, असे दिसत नाही. त्यामुळेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील गाभा असलेल्या उपनगरी रेल्वेत नव्या चकाचक गाडय़ांचा ताफा दाखल झाला तरी पानांच्या पिचकाऱ्यांनी या गाडय़ांचा बाह्यभाग घाण करून ठेवला जातो. गाडय़ांच्या दरवाजात उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना पान, गुटखा खात आपले तोंड गाडीवरच रिकामी करण्यात धन्यता वाटते. खाण्याचे पदार्थ खाऊन झाल्यावर जे काही उरलेले असते ते वेष्ठनासह गाडय़ांच्या आसनाखाली सरकवले जाते. खिडक्यांतून तोंड, नाक आदी मोकळे केले जाते. आपल्यानंतर येथे काही मिनिटांतच दुसरा प्रवासी येऊन बसणार आहे, त्याला आपल्याला जे काही झाले आहे त्याचा संसर्ग होऊ शकतो, याची माहिती नसल्याप्रमाणे शुद्ध अडाणीपणा केला जातो.
या शहराचा कोणताही भाग सुंदर नाही. रेल्वे स्थानके, बस थांबे, सार्वजनिक स्थळे कमालीची घाण आहेत. येथे अत्यंत वाईट अवस्थेतील झोपडपट्टय़ा आहेत. तुंबलेले नाले आहेत. हवा, पाण्याच्या प्रदूषणाबाबत सरकारी पातळीवरील प्रयत्नांपलीकडे येथे नागरिकांकडून कोणतेच प्रयत्न केले जात नाहीत. मी, माझे कुटुंब आणि माझा पैसा यापलीकडे मुंबईत कोंबल्यागत राहात असलेल्या माणसांच्या जाणीवा जात नाहीत. या भयंकर अशा उदासीनतेमुळेच जागतिक दर्जाच्या कोणत्याही निकषाच्या जवळपासही मुंबई येऊ शकत नाही.
या मुंबई शहराचे आज कसे वाटोळे झाले आहे, याचे प्रातिनिधिक चित्र म्हणून आमचे छायाचित्रकार दिलीप कागडा यांनी टिपलेली पाल्र्याच्या मिठीबाई महाविद्यालयाजवळच्या रसराज नाल्याची ही दोन छायाचित्रे लेखासोबत आहेत. त्यातील एक २००८ नोव्हेंबर महिन्यातले तर दुसरे या नव्या वर्षांतील जानेवारीतील आहे. नोव्हेंबर महिन्यात असलेली गाळाची जैसे थे स्थिती आज दोन महिन्यांनंतर तशीच आहे. याचे कारण गाळ वा कचरा कितीही उपसला तरी तो तेवढय़ाच वेगाने पुन्हा टाकला जातो आहे आणि नाला तसाच तुंबलेल्या अवस्थेत राहतो आहे. २६ जुलै २००५ रोजी मुंबई पावसामुळे ठप्प होण्याचे प्रमुख कारण मिठी नदीवर ठिकठिकाणी झालेले अतिक्रमण दिले गेले होते. मुंबईवर भविष्यात कोसळणाऱ्या आपत्तीचे कारण मिठी नदी वा अन्य काही नसेल तर नागरिकांचा स्वच्छतेबाबतचा बेजबाबदारपणाच मुंबईला आणखी गर्तेत घेऊन जाईल. हे माझे शहर आहे आणि मी ते स्वच्छ ठेवीन, ही जाणीव मुंबईकरांत येणार केव्हा ?
maharavindra@gmail.com
अभिरुची हे सदर जागेअभावी आज प्रसिद्ध होऊ शकले नाही - संपादक