Leading International Marathi News Daily                                 शनिवार, १० जानेवारी २००९

क्रिकेट सामन्यापासून वंचित ग्राहकाला तिकिटाचे दोन हजार रुपये परत करण्याचा आदेश
दहा वर्षांनंतर बाळासाहेब अनास्कर यांना मिळाला न्याय

पुणे, ९ जानेवारी / विशेष प्रतिनिधी

क्रिकेट सामन्याचे तिकीट विकत घेऊनही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गलथान कारभारामुळे सामन्यापासून वंचित राहावे लागलेल्या बाळासाहेब अनास्कर यांना तिकिटाचे दोन हजार रुपये परत करावेत, असा आदेश पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकताच दिला आहे. या निकालामुळे अनास्कर यांना तब्बल दहा वर्षांनी न्याय मिळाला असून क्रिकेटचा सामना वा मनोरंजनाच्या कार्यक्रमाची तिकिटे विकत घेणारेही ‘ग्राहक’च ठरतात यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. मैदानाच्या प्रेक्षक क्षमतेपेक्षा जास्त तिकिटांची विक्री केल्यामुळेच ग्राहकाचा सामना पाहण्याचा हक्क हिरावला गेला. त्यामुळेच संयोजकांनी पुरविलेल्या सेवेतील उणिवा स्पष्ट झाल्या. म्हणूनच ग्राहकाला भरपाई देण्याचा आदेश आपण देत असल्याचे न्यायमंचचे अध्यक्ष पी. के. गायकवाड यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

‘वसंतोत्सवा’स दमदार सुरुवात
पुणे, ९ जानेवारी/ प्रतिनिधी

युवा गायक राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने वसंतोत्सवाची दमदार सुरुवात झाली. त्यानंतर सुमारे पन्नास कलाकारांचा समावेश असलेल्या जर्मनीतील ‘लिपिज फिलार्मोनिक ऑक्रेस्ट्रा’तील भारतीय व पाश्चात्य शास्त्रीय संगीताने रसिकांना जिंकून घेतले. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने विधी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या वसंतोत्सवाला यंदाही रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. युवा गायक राहुल देशपांडे यांनी राग ‘श्री’ ने गायनाची सुरुवात केली. रसिकांकडून प्रचंड टाळ्या मिळवित त्यांनी नंतर ‘गौरी’तील दोन बंदिशी सादर केल्या. गायनाचा शेवट त्यांनी ‘गुरुजी जहाँ बैठू वहाँ छाया जी’ हे भजन सादर केले. या भजनालाही रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देशपांडे यांना आदित्य ओक (पेटी), निखिल फाटक (तबला), दीप्ती माटे व अभिजित हळवे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. देशपांडे यांच्या गायनानंतर त्यांच्या ‘इंट्रोडय़ुसिंग- राहुल देशपांडे’ या सारेगामा कंपनीने काढलेल्या सीडीचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कंपनीच्या योजना शिवानंद तसेच बापू देशपांडे त्या वेळी उपस्थित होते. या सीडीमध्ये राहुल देशपांडे यांनी आजोबा वसंतराव यांच्या बंदिशी व चिजा गायल्या आहेत. आजच्या शेवटच्या सत्रातील भारतीय व पाश्चात्य शास्त्रीय संगीताचा समावेश असलेल्या जर्मनी व भारतीय कलाकारांचा ऑक्रेस्ट्रा रसिकांचे खास आकर्षण ठरले. डॉ. एल.सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखालील या कार्यक्रमात तब्बल ५० कलाकारांचा समावेश होता. पाश्चात्य शास्त्रीय संगीताबरोबरच या कार्यक्रमात भारतीय व पाश्चात्य शास्त्रीय संगीताची जुगलबंदीही झाली. त्यास रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सुरुवातीला प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती यांनी पाश्चात्य ऑक्रेस्ट्रावर गायित्री मंत्र सादर केला. ऑक्रेस्ट्रामध्ये व्हायोलिन, व्हायोल, चेलो, डबल बास, जिम्पनी, व्हायब्रोफोन, झेयलोफोन आदी वाद्यांचा समावेश होता.

जिल्हा परिषद सदस्य एकमेकांच्या अंगावर धावले!‘दौंड’चे राजकारण सर्वसाधारण सभेत
पुणे, ९ जानेवारी/खास प्रतिनिधी

दौंडच्या आमदारपुत्रांनी खातेप्रमुखांची परस्पर बैठक घेतल्याच्या मुद्दय़ावरून जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत जोरदार गोंधळ झाला. काँग्रेसचे सदस्य राहुल कापरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिवेकर यांच्यात यावरून हमरीतुमरी होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. अखेर ज्येष्ठ सदस्यांनी मध्यस्थी केल्याने या वादावर पडदा पाडला.

‘सायबर गुन्हय़ांमधील वाढ हे मोठे संकट’
पुणे, ९ जानेवारी/प्रतिनिधी
सायबर गुन्ह्य़ांमध्ये होत असलेली वाढ हे आपल्या देशापुढील सर्वात मोठे संकट असून, त्याला तोंड देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचे अद्ययावत ज्ञान असणारी पोलीस आणि न्यायालय अशी संयुक्त यंत्रणा तातडीने निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन ‘डाटा अ‍ॅन्ड सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलेश बजाज यांनी आज केले.

एफ.सी. ही आता एस.पी.च्या मार्गावर ?
पुणे, ९ जानेवारी/खास प्रतिनिधी
फग्र्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाच्या उद्या मुलाखती होणार असल्या, तरी आरक्षणाचा मुद्दा पुढे करून स. प. महाविद्यालयाप्रमाणेच आयत्या वेळेस मुलाखती रद्द केल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अर्थात, या संदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याचे विविध घटकांमधील सूत्रांनी स्पष्ट केले.

हावडा-पुणे-हावडा विशेष गाडी सोडणार
पुणे, ९ जानेवारी/प्रतिनिधी

मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता हावडा-पुणे-हावडा विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हावडय़ाहून सुटणाऱ्या या विशेष गाडीचा क्रमांक ०८३० असून, ती १८ जानेवारीला सुटेल. त्याचप्रमाणे पुण्याहून ही गाडी २० जानेवारी रोजी सुटणार असून, तिचा क्रमांक ०८२९ आहे. या विशेष गाडीमध्ये दहा द्वितीय श्रेणी आरक्षण कक्ष, दोन द्वितीय श्रेणी विनाआरक्षण कक्ष, दोन थ्री-टीयर वातानुकूलित कक्ष, दोन टू-टीयर वातानुकूलित कक्ष व दोन एसएलआर कक्ष असे एकूण १८ कक्ष आहेत. ही गाडी हावडय़ाहून दुपारी २.३५ वाजता निघून पुण्यामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी साडेबारा वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे पुण्याहून निघणारी गाडी सकाळी नऊ वाजता पुण्याहून निघून दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजता हावडा येथे पोहोचेल. रेल्वे प्रशासनाने पुणे-दौंड मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे ९ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान पुणे-दौंड पॅसेंजर ही दौंडहून १५ मिनिटे उशिरा सुटून पुण्यास ३० मिनिटे उशिरा पोहोचेल, तसेच पुणे-निजामाबाद पॅसेंजर पुण्याहून २० मिनिटे उशिरा सुटेल. त्यामुळे प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

नावनोंदणीसाठी लाच मागणाऱ्या महिलेस अटक
पुणे, ९ जानेवारी/प्रतिनिधी

घराच्या कागदपत्रांवर नावनोंदणी करण्याकरिता तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या राजगुरुनगर येथील तालुका निरीक्षक कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली. राजगुरुनगर येथील भूमी अभिलेख तालुका निरीक्षक कार्यालयात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. रुक्मिणी लक्ष्मण काशिद (वय ४७, रा. गणेश पेठ) या महिलेला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. नीतेश गणपतराव पवार (वय २१, रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांनी याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार सापळा रचून काशिद हिला पोलिसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक संजय भामरे, राधिका फडके, संगीता पाटील, पोलीस हवालदार सीताराम धावडे, पोलीस नाईक उमर शेख आदी यांच्या पोलीस पथकाने ही कामगिरी केली. इमारतीच्या खरेदीविषयी खेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ग्रामपंचायतीकडे नोंद केल्यानंतर नीतेश पवार यांनी या घराच्या कागदपत्रांवर आपल्या आईच्या नावाची नोंदणी करण्यासाठी तालुका निरीक्षक यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. त्या अर्जाबाबत काशिद हिने पवार यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली, तसेच तीन हजार रुपयांची लाच मागितली होती, अशी माहिती विभागाचे सहायक पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय नाईकपाटील यांनी दिली.

शुल्कवाढीविरोधात १८ जानेवारीला परिषद
पुणे, ९ जानेवारी/प्रतिनिधी

व्यावसायिक महाविद्यालयांनी पूर्वसूचनेविना केलेल्या शुल्कवाढीविरोधात शिक्षण व्यापारीकरणविरोधी मंचातर्फे १८ जानेवारीला परिषद होणार आहे. मंचाचे सचिव डॉ. मिलिंद वाघ यांनी आज पत्रकार परिषदेत या विषयी माहिती दिली. काशीबाई नवले महाविद्यालयाचे कोंढवा व नऱ्हे येथील तसेच अलाना महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयांनी खोटा वाढीव शैक्षणिक खर्च दाखवून चुकीचा प्रस्ताव शिक्षण शुल्क समितीला सादर केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. तसेच महाविद्यालयांकडून मूलभूत शैक्षणिक सोयी उपलब्ध होत नसल्याची तक्रारही विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. त्याचप्रमाणे नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे वाढीव शुल्क हे द्वितीय व तृतीय वर्षांतील विद्यार्थ्यांना लागू होत नाही असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.या पाश्र्वभूमीवर शुल्कवाढीविरोधी परिषदेमध्ये प्रवेशावेळी शुल्काविषयीची पूर्ण कल्पना द्यावी अंतरिम शुल्कामध्ये पाच टक्क्य़ांपेक्षा अधिक वाढ करू नये. ुल्कासंबंधीचा प्रस्ताव तयार करताना विद्यार्थी व पालक यांना सहभागी करून घ्यावे शुल्काचे तयार प्रस्ताव महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करून त्यावरील हरकतींचा विचार करावा आणि आर्थिक व सामाजिकदृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारने भरावे आदी प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.

होळकर पुलाचा वाढीव खर्च स्वतंत्र कंपनीमार्फत करणार
पुणे, ९ जानेवारी/प्रतिनिधी

नवी इमारत, एक उड्डाणपूल, अंतर्गत रस्ते, सीमाभिंत, वृक्षारोपण आदी सर्व कामे सुरू केल्याशिवाय नवीन होळकर पुलाच्या बांधकामाला प्रारंभ करू नये, असे संरक्षण विभागाने पत्र महापालिका प्रशासनाला दिल्यामुळे ही सर्व कामे महापालिकेला तातडीने हाती घ्यावी लागणार आहेत. परिणामी, होळकर पुलाचा खर्च २० कोटींनी वाढणार आहे. सध्याचा होळकर पूल वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्यामुळे या पुलाशेजारी एक पाच पदरी आणि एक तीन पदरी असे दोन पूल बांधण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. सध्याच्या होळकर पुलाचे मजबुतीकरणही याच कामांतर्गत केले जाणार आहे. या कामांचा खर्च ६१ कोटी रुपये असून स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर पुलाच्या कामाचे भूमिपूजनही ८ नोव्हेंबर रोजी एका समारंभात करण्यात आले होते. हा समारंभ झाल्यानंतर संरक्षण विभागाने महापालिकेला एक पत्र पाठवले. होळकर पुलामुळे, तसेच रस्तारुंदी व अन्य कामांमुळे संरक्षण विभागाचा परिसर विभागला जाणार आहे. हे दोन्ही परिसर एकमेकांशी जोडण्यासाठी, तसेच दोन्ही परिसरांचा परस्परांशी संपर्क राहण्यासाठी काही विकास कामे करणे आवश्यक असून ती महापालिकेने करून द्यावीत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. ही सर्व कामे सुरू केल्याशिवाय नवीन होळकर पुलाचे काम सुरू करू नये, असेही या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. संरक्षण विभागाने कळविल्याप्रमाणे त्यांना करून द्यावयाच्या कामांची १९ कोटी ७० लाख रुपयांची निविदा स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आली आहे. संरक्षण विभागासाठी एक इमारत (खर्च- दोन कोटी ८४ लाख), उड्डाणपूल (आठ कोटी ९४ लाख), अंतर्गत रस्ते (४० लाख), सीमाभिंत (३० लाख) आणि वृक्षारोपण (आठ लाख) अशी १२ कोटी ६० लाखांची कामे करून दिली जाणार आहेत.

‘अभ्यास तंत्रांविषयी ‘नवनीत’ची कार्यशाळा
पुणे, ९ जानेवारी / प्रतिनिधी

‘नवनीत’ प्रकाशन संस्थेने इयत्ता नववीच्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी ‘अभ्यास तंत्रांविषयी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेमध्ये दहावीचा अभ्यास अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी उपयुक्त अशा अभ्यास तंत्राविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्तम रीतीने शिकणे, वेगाने आकलन होणे आणि स्मरणशक्ती वाढविणे शक्य होण्यासाठी विविध प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत. ‘नवनीतच्या दृक्श्राव्य सॉफ्टवेअरमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास मनोरंजक होण्याबरोबरच त्याचे मूल्यमापनही अधिक प्रगत होईल, असा कंपनीचा दावा आहे. ही कार्यशाळा १० जानेवारीला सकाळी १० ते १२ दुपारी २ ते ४ आणि सायंकाळी ५.३० ते ७.३० तसेच ११ जानेवारीला सकाळी १० ते १२ या वेळेत पुण्यातील नेहरू मेमोरियल कॅम्प हॉल येथे होणार असून कार्यशाळेस प्रवेश विनामूल्य आहे.

मुंबई-पुणे महामार्ग, बोपोडीतील बीएसएनएल सेवा विस्कळीत
पुणे, ९ जानेवारी/प्रतिनिधी

भारत संचार निगम लिमिटेडच्या खडकी क्षेत्रामधील जमिनीखालील वाहिन्यांची चोरी खडकी रेल्वे स्थानकाजवळ झाल्याने सुमारे २१५० दूरध्वनी बंद राहणार आहेत. त्याप्रमाणे खडकी टपाल कार्यालयाजवळ पुणे महानगरपालिकेचे मुंबई महामार्ग विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने तेथील जवळपास ३१२ दूरध्वनी बंद राहणार आहेत. या चोरीसंबंधी कंपनीतर्फे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून, नागरिकांनाही असा चोरीचा प्रयत्न आढळल्यास तक्रार करण्याची विनंती करण्यात आली आहे. यामुळे मुंबई-पुणे महामार्ग, बोपोडीगाव, बोपोडीनाका, चेतक सोसायटी, खडकी रेल्वेस्थानक, सावंतनगरी, भाऊ पाटील मार्ग, शिबा सोसायटी, सर्वत्र विहार आदी परिसरातील सेवा विस्कळीत होणार आहे. या गैरसोयीबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली असून, दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली. पुढील आठवडय़ाभरामध्ये सर्व सेवा पूर्ववत होईल, असे कंपनीतर्फे कळविण्यात आले आहे.

सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची मागणी
पुणे, ९ जानेवारी/प्रतिनिधी

सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने त्वरित प्रयत्न करावेत, अन्यथा येत्या निवडणुकीत देशातील काही सफाई कर्मचारी मतदानाच्या माध्यमातून ताकद दाखवून देतील, असा इशारा या कर्मचाऱ्यांनी सरकारला दिला आहे. कष्टकरी सफाई कर्मचाऱ्यांबाबत अनेक घोषणा दिल्या जातात, मात्र प्रत्यक्षात कोणत्याही घोषणांची अंमलबजावणी केली जात नाही. म्हणून अखिल भारतीय सफाई मजूर कामगार संघटनेच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीत एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीत सुदाकरण दास, चरणसिंह टाक, एस. डी. वाघमारे, नरेश साळुंखे यांच्यासह चौदा राज्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.