Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९
राज्य

(सविस्तर वृत्त)

‘राम गबाले यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीचे अपरिमित नुकसान’
पुणे, ९ जानेवारी/ विशेष प्रतिनिधी

 
ख्यातनाम दिग्दर्शक राम गबाले यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील शांत, संयमी, टोकाच्या विषयांनाही तितक्याच ताकदीने न्याय देऊ शकणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व लयाला गेले आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली ही पोकळी कशानेही भरून निघणार नाही, अशा शब्दांत मराठी चित्रपट सृष्टीतील अनेकांनी आज गबाले यांना श्रद्धांजली अर्पण केली.
ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त - जशास तसे, देवबाप्पा असे दोन भिन्न विषय तितक्याच ताकदीने हाताळून दोन्ही विषयांना गबाले यांनी न्याय दिला. अण्णा माडगूळकर यांच्या घरी त्यांची व आपली पहिली भेट झाली. या भेटीतच त्यांनी निर्माण केलेल्या इर्षेमुळेच चित्रपट क्षेत्रात काही करून दाखविण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली.
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना- गबाले हे कधी दिग्दर्शक म्हणून वागले नाहीत. ते आम्हा कलावंताना मित्रासारखे वाटत. कोणतीही अडचण आली तर कधी ते थांबले नाहीत.
दिग्दर्शक जब्बार पटेल- गबाले हे हॉलिवूड चित्रपटांचे एनसायक्लोपीडिया होते. आमच्या सारख्या धडपडणाऱ्या कलावंताना ते मोठा आधार वाटत असत. ते ‘नाच रे मोरा’सारखे अजरामर गीत देणारे दिग्दर्शक होते.
ज्येष्ठ दिग्दर्शक बाळ बापट - राम गबाले हे सिनेमाक्षेत्रातील सज्जन व्यक्तिमत्त्व. सभ्य माणूस व मित्र म्हणून ते कायम आपल्या जवळ होते.
ज्येष्ठ दिग्दर्शक मधुकर ऊर्फ बाबा पाठक - गबाले यांच्या ‘जशास तसे’ या चित्रपटाद्वारे त्यांचा सहायक म्हणून १९५१ मध्ये आपण चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. शेवटच्या क्षणापर्यंत ते अत्यंत उत्साही होते. तब्येतीची किंवा घरगुती अडचणीची चिंता न करता अखेरपर्यंत ते धडपडत होते. आपल्याकडे असलेल्या माणसांचे गुण ओळखून ते त्याला मार्गदर्शन करीत असत. आयुष्यभर ते हसत व हसवत राहिले.
ज्येष्ठ अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर - त्यांच्याबरोबर घरधनी, पोस्टातली मुलगी, दूधभात असे तीन चित्रपट केले. भालजी पेंढारकर, राजाभाऊ परांजपे आणि राम गबाले जुन्या पिढीतील या तीन दिग्दर्शकांनी आपल्याला घडवले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार- सर्जनशील अभ्यासक आणि प्रभावी प्रशासक म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल नेहमीच आदर वाटतो. चित्रपट दिग्दर्शकाचा त्यांचा आलेख परिपूर्ण होता.
सुधीर मोघे (कवी)- गबाले यांच्या निधनाने एका युगाचा शेवट झाला. वय झालेले असूनही ते सतत ताजेतवाने असत. चित्रपटातील प्रत्येक आशय त्यांच्यात भिनलेला होता. आपला मोठेपणा त्यांनी कधी मिरवला नाही.
प्रभाकर पेंढारकर (लेखक)- गबाले यांच्या निधनाने मोठा भाऊ गेला असेच वाटते. एका गावात एका शाळेत आम्ही शिकलो. लहानपणापासूनच त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करण्याचा प्रयत्न केला.
मुकुंदराव किलरेस्कर (ज्येष्ठ संपादक)- चित्रपटसृष्टीतील आपल्याला माहित असलेली सज्जन व्यक्ती. या क्षेत्रात असूनही ते सुसंस्कृत होते.
अरुण जाखडे (प्रकाशक)- साहित्यावर, माणसावर व परंपरेवर प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व. दीडवर्षांपूर्वी ‘आत्मचित्र’ हे त्यांचे आत्मचरित्र आपल्या पद्मगंधा प्रकाशनने प्रकाशित केले. त्याची दुसऱ्या आवृती काढण्याचा आमचा विचार होता. त्यात त्यांना काही बदल करायचे होते. त्याबाबत चर्चाही सुरू होती.
खासदार सुरेश कलमाडी- गबाले यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा एक शिल्पकार हरपला. त्यांनी केवळ चित्रपटसृष्टीवरच नव्हे तर डॉक्युमेंटरीज, बालचित्रपट, लघुपट यावरही आपला ठसा उमटविला. नवीन पिढीतील कलाकार व दिग्दर्शकांचे ते खऱ्या अर्थाने गुरू होते.
अल्पचरित्र
व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओतील बालचित्रपट विभागाचे प्रमुख, मुंबईतील फिल्मसिटीचे संस्थापक, सरकारच्या फिल्म डिव्हिजनचे पाच वर्षे संचालक, पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटचे उपप्राचार्य व मानद व्याख्याते, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मानद सभासद, चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे प्रमुख, इंडियन फिल्म डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाचे फिल्म्स संचालक, महाराष्ट्र सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य शासनाच्या फीचर फिल्म प्रोजेक्टमध्ये कार्यकारी निर्माते, पुण्यातील नवप्रभात चित्र या संस्थेचे संचालक अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पेलल्या.
गबाले यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना अनेक पारितोषिके आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र सवरेत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार (छोटा जवान), पंतप्रधानांचे सर्वोत्तम बालचित्रपटाचे सुवर्णपदक (फूल और कलियाँ), लिपझिगच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कार (काले गोरे), राज्य पुरस्कार (द स्टोरी ऑफ डॉ. कर्वे), सवरेत्कृष्ट मराठी चित्रपटासाठी फिल्म फेअर अ‍ॅवॉर्ड (जिव्हाळा) पुरस्कारांचा समावेश आहे. ‘शतायू केसरी’साठी केसरीच्या शताब्दी सोहळ्यात इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांना विशेष पुरस्कार देण्यात आला असून, गदिमा पुरस्कार, शासनाचा जीवनगौरव पुरस्कार, श्रीराम पुजारी प्रतिष्ठानचा पु. ल. बहुरुपी पुरस्कार, नानासाहेब सरपोतदार चित्र गौरव सन्मान, अल्फा टिव्ही मराठीचा अल्फा जीवनगौरव आदी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.
गबाले यांचे गाजलेले चित्रपट
वंदे मातरम्, मोठी माणसे, देव पावला, जोहार मायबाप, जशास तसे, दूधभात, घरधनी, नरवीर तानाजी, देवबाप्पा, तन्हाई (बडी माँ), पोस्टातल मुलगी, शेर शिवाजी, छोटा जवान, जिव्हाळा, गाऊ त्यांना आरती, पुण्याई, अनवाणी (नंगे पाँव), हे गीत जीवनाचे, धरती आकाश, दिनूचे बिल.