Leading International Marathi News Daily                                 शनिवार, १० जानेवारी २००९
राज्य

उत्तरेची भरभराट, पण दक्षिण मात्र बऱ्याच अंतरावर मागे!
उत्तर भाग पाटाच्या पाण्यामुळे सधन, तर दक्षिण भाग दुष्काळी ही नगर जिल्ह्य़ाची पूर्वापार ओळख. अलीकडे नागरीकरण होतानाही उत्तर-दक्षिण असा फरक आहेच; शिवाय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तीर्थस्थळ असलेल्या शिर्डीचा सर्व फायदाही जिल्ह्य़ाच्या उत्तर भागालाच होतो आहे, होत राहील. आकारमानानुसार हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा. चौदा तालुके, आठ नगरपरिषदा, एक नगरपंचायत, एक खासगी, तर १७ सहकारी साखर कारखाने, दोन मोठय़ा धरणांसह एकूण पाच धरणं ही नगर जिल्ह्य़ाची बलस्थानं. त्यात आता शिर्डी व शनिशिंगणापूर या दोन बडय़ा तीर्थस्थळांची भर पडली. जिल्ह्य़ाच्या उत्तर भागात पाटाच्या पाण्याची सुविधा पूर्वापार आहे. त्याच जोरावर सहकारी साखर कारखानदारी व सहकार चळवळ वाढली. तेथील पुढाऱ्यांचाही जिल्ह्य़ात व पुढे राज्यात दबदबा वाढत गेला. सामाजिक प्रश्नांवर झालेल्या मोठय़ा संघर्षांमुळे राजकीयदृष्टय़ाही जागरूक जिल्हा अशीही जिल्ह्य़ाची ख्याती बनली. जिल्ह्य़ाचा दक्षिण भाग अनेक गोष्टींसाठी नगर शहरावर अवलंबून असताना उत्तर भागाचे मात्र सरकारी कामाशिवाय शहराशी काम पडत नाही.

आदिवासींनी विकासप्रकल्पांना विरोध करू नये- अजित पवार
नामपाडा धरणाचे जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

शहापूर, ९ जानेवारी /वार्ताहर

ठाणे जिल्ह्यातील शेती सिंचनाचा अनुशेष दूर करून मोठय़ा प्रमाणात पाणी योजना राबविण्यासाठी लोकप्रतिनिधींची मंत्रालयात बैठक लावून मार्चनंतर महाजल वर्धित कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी दिली. किन्हवली परिसरातील सावरोलीजवळील नामपाडा (कुतरकुंड) धरणाचे भूमिपूजन पवार यांचे हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमास कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंद ठाकूर, आमदार महादू बरोरा, मुरबाडचे आमदार गोटीराम पवार, आ. किसन कथोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेश तपासे, दशरथ तिवरे, लक्ष्मण घुडे, जिल्हा परिषद सदस्य विनायक धानके आदीउपस्थित होते.

‘राम गबाले यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीचे अपरिमित नुकसान’
पुणे, ९ जानेवारी/ विशेष प्रतिनिधी

ख्यातनाम दिग्दर्शक राम गबाले यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील शांत, संयमी, टोकाच्या विषयांनाही तितक्याच ताकदीने न्याय देऊ शकणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व लयाला गेले आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली ही पोकळी कशानेही भरून निघणार नाही, अशा शब्दांत मराठी चित्रपट सृष्टीतील अनेकांनी आज गबाले यांना श्रद्धांजली अर्पण केली. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त - जशास तसे, देवबाप्पा असे दोन भिन्न विषय तितक्याच ताकदीने हाताळून दोन्ही विषयांना गबाले यांनी न्याय दिला. अण्णा माडगूळकर यांच्या घरी त्यांची व आपली पहिली भेट झाली. या भेटीतच त्यांनी निर्माण केलेल्या इर्षेमुळेच चित्रपट क्षेत्रात काही करून दाखविण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना- गबाले हे कधी दिग्दर्शक म्हणून वागले नाहीत. ते आम्हा कलावंताना मित्रासारखे वाटत. कोणतीही अडचण आली तर कधी ते थांबले नाहीत.

आयुर्वेदाच्या विकासाकरिता राज्यात कृतिआराखडा करणार
फेब्रुवारीमध्ये उच्चस्तरीय बैठक

पुणे, ९ जानेवारी/खास प्रतिनिधी

आयुर्वेदाच्या विकासाकरिता सर्वसमावेशक कृतिआराखडा तयार करण्यात येणार असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ामध्ये त्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलाविण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च, तंत्र व वैद्यकीय शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केली. शिक्षण-संशोधनाबरोबरच औषधनिर्माण-पर्यटन आदी उद्योग क्षेत्रांमधील घटकांनाही त्यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे.
भारती विद्यापीठाच्या आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने आजपासून आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तिच्या उद्घाटन सोहळ्यात टोपे बोलत होते.

जागेअभावी कापूस खरेदी पुन्हा बंद!
पणन महासंघाचा निर्णय व्यापाऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार

सोनपेठ, ९ जानेवारी/वार्ताहर

शहरातील तिन्ही कापूस खरेदी केंद्रांवर कापूस साठविण्यासाठी जागा नसल्याने पुन्हा एकदा कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. ही केंद्रे परत कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरणआहे. व्यापाऱ्यांसाठी मात्र ही बाब मोठय़ा फायद्याची ठरत असून मनमानी दराने कापूस खरेदी करण्यात येत आहे. राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या गंगाखेड उपविभागातील गंगाखेड, सोनपेठ, पालम व राणीसावरगाव येथील कापूस केंद्रांवर क्षमतेपेक्षा जादा आवक झाल्याने साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे आजपासून पुढील आदेशापर्यंत म्हणजेच अनिश्चित काळापर्यंत सर्व खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहेत.

निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे आग्राव उघाडीची वाताहत
जीव मुठीत धरून येजा करतात ग्रामस्थ

अलिबाग, ९ जानेवारी/ प्रतिनिधी

खारभूमी विभागाने त्यांच्या कंत्राटदारांच्या माध्यमातून केलेल्या रायगड जिल्'ाातील अनेक बांधबंदिस्ती आणि उघाडीची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याने, त्यावर खर्च करण्यात आलेला कोटय़वधी रुपयांचा निधी चक्क पाण्यात गेला आहे, तर त्या बांधबंदिस्ती आणि उघाडीमुळे अपेक्षित सुरक्षितता ग्रामस्थांना प्राप्त होऊ शकलेली नाही. या संदर्भात किनारी भागातील गावांतील ग्रामसभांमध्ये निषेधाचे ठराव होऊन तक्रारी दाखल झाल्या, तरी जिल्हा प्रशासन वा अन्य कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून या संदर्भात कारवाई तर सोडाच परंतु साधी चौकशीदेखील झाली नाही, याबद्दल या ग्रामस्थांच्या मनात आता असंतोष खदखदू लागला आहे. त्याचे रूपांतर कोणत्याही क्षणी आंदोलनात हाऊ शकते, अशी परिस्थिती या किनारी भागातील ग्रामस्थांशी बोलल्यावर लक्षात आली आहे.

कॅट परीक्षेचा निकाल जाहीर
पुणे, ९ जानेवारी/खास प्रतिनिधी

देशभरातील सात ‘आयआयएम’सह आघाडीच्या व्यवस्थापन संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सामयिक प्रवेश परीक्षेचा (कॅट) निकाल आज जाहीर करण्यात आला. देशातील सुमारे पावणेतीन लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य आज निश्चित झाले.
अहमदाबाद, बंगलोर, कोलकाता, लखनौ, इंदोर, कोझिकोड आणि शिलाँग येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (आयआयएम) प्रवेश घेण्यासाठी कॅट बंधनकारक आहे. त्या व्यतिरिक्त देशातील इतरही आघाडीच्या व्यवस्थापन संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी ‘कॅट’मधील गुणवत्ता क्रमांक विचारात घेतला जातो. या पाश्र्वभूमीवर आजच्या निकालाने पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन शिक्षणाच्या संधींचे दरवाजे खुले केले आहेत. पुणे शहर व परिसरातील सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांनी ‘कॅट’ दिली होती. ‘कॅट’चा निकाल www.catiim.in या संकेतस्थळावर उपलब्ध होऊ शकेल.

रमाबाई चपळगावकर यांचे निधन
औरंगाबाद, ९ जानेवारी/प्रतिनिधी

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील नेते पुरुषोत्तमराव चपळगावकर यांच्या पत्नी आणि उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या मातोश्री रमाबाई चपळगावकर यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ९३ होते. त्यांच्यावर प्रतापनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्यार्थी दशेत असताना चंद्रपूर, नागपूर येथे स्वातंत्र्यलढय़ात त्यांचा सहभाग होता. त्या वेळी त्यांनी प्रभातफेऱ्या काढल्या होत्या. त्यांच्या मागे दोन मुले न्या. नरेंद्र, अ‍ॅड. सुधाकर आणि कन्या उषा देशपांडे, सुना, नातवंडे, नातजावई असा मोठा परिवार आहे.

माझ्या यशामध्ये दिग्दर्शकांचा मोठा वाटा -सुलोचना
पुणे, ९ जानेवारी/प्रतिनिधी

‘चित्रपट कारकिर्दीत मला ज्या वैविध्यपूर्ण भूमिका मिळाल्या, त्या भूमिकांनीच मला मोठे केले. त्यामुळे माझ्या यशामध्ये माझ्या दिग्दर्शकांचा मोठा वाटा आहे, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांनी येथे काढले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
ज्येष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर, मास्टर विनायक, राम गबाले, राजा परांजपे, दत्ता धर्माधिकारी, अनंत माने या सर्व दिग्गजांचा आदरपूर्वक उल्लेख करून सुलोचनादीदींनी भालजी पेंढारकरांना आपण गुरुस्थानी मानत असल्याचे सांगितले. भालजी पेंढारकर यांच्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘‘त्यांच्याकडे नोकरी करत असतानाच मला अभिनयाची प्रेरणा मिळाली. बाबांनी माझ्यातील वेगळेपण हेरून मला भूमिका दिल्या. तसेच घोडेस्वारी, तलवारबाजी इत्यादींचे प्रशिक्षणही दिले. त्यांच्या चित्रपटाच्या तालमीवेळी सर्व तंत्रज्ञ उपस्थित असत. ‘वहिनीच्या बांगडय़ा’ चित्रपटावेळी लेखक य. गो. जोशी यांनी उच्चारांना आक्षेप घेतल्याने बाबांनी संस्कृत पुस्तक देऊन उच्चार सुधारून घेतल्याची आठवणही त्यांनी या वेळी सांगितली. तसेच हिंदी उच्चार सुधारण्यासाठी आपण बंद खोलीत रेडिओवरील गाणी ऐकत होतो, असेही त्या म्हणाल्या.
चरित्र भूमिकांविषयी बोलताना सुलोचनादीदींनी चरित्र भूमिकांसाठी नायिकेपेक्षा जास्त मेहनतीची गरज असल्याचे सांगितले. आजच्या नायिकांविषयी बोलताना त्यांनी नायिकांच्या अभिनयाचे कौतुक केले. मात्र त्यांच्या भडक कपडय़ांविषयी नापसंती व्यक्त केली.

अमोल माळीची तबलावादन स्पर्धेत महाराष्ट्रातून निवड
पेण, ९ जानेवारी/वार्ताहर : अमृतसर, पंजाब येथे देशस्तरीय होणाऱ्या तबलावादन स्पर्धेत महाराष्ट्रातून अमोल दत्तात्रय माळीची निवड करण्यात आली आहे. तसेच राजस्थान सरकारकडून ढोलकीवादन प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. अमोल हा पुणे येथील ढोलकीवादन सम्राट पंडित पांडुरंग घोटकर गुरुजी यांच्याकडे ढोलकीवादनाचे प्रशिक्षणाचे धडे घेत आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण येथील स्वरांजली शास्त्रीय संगीत विद्यालय येथे संगीतविशारद रामदास मोकल यांचा माजी विद्यार्थी असून, त्यांच्या अधिपत्याखाली तबला, ढोलकीवादनाचे त्याने शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी जी. ए. सामंत तबलावादन विद्यालय, पुणे यांच्याकडे तबलावादनाचे पूर्ण शिक्षण घेत आहे. महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व क्रीडा जिल्हा अधिकारी कार्यालय आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सव सांगली येथे नुकताच पार पडला. या महोत्सवातील तबलावादन स्पर्धेत प्रत्येक श्रेणीत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक त्याने पटकावले. अमोल माळी हा मूळ जळगावचा असून गरीब घराण्यातील हुशार व नामवंत कलाकार आहे. स्वरांजली शास्त्रीय संगीत विद्यालय, पेठा व पुणे येथील संगीत विद्यालयातील सर्व संगीत शिक्षक, विद्यार्थी व संगीतप्रेमी नागरिकांनी त्याच्या प्रावीण्याबद्दल सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

नाशिकमध्ये शैक्षणिक विषयावरील राष्ट्रीय परिषद
नाशिक, ९ जानेवारी / प्रतिनिधी

युजीसी पुरस्कृत आणि पुणे विद्यापीठ व येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जागतिकीकरणात शिक्षक शिक्षणाची भूमिका’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज येथे झाले.परिषदेचे उद्घाटन पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता डॉ. व्ही. एस. देशपांडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नांदेडच्या एस. आर. टी. विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. एस. एम. सोनवणे, प्रा. व्ही. बी. कर्डीले, संस्थेचे सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांताराम रायते, उपप्रचार्य डॉ. नीता कासार आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांच्या षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्त धुळ्यात कार्यक्रम
धुळे, ९ जानेवारी / वार्ताहर

येथे आचार्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज (आचार्य किशोरजी व्यास) यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २६ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या कार्यक्रमांना देशभरातील मान्यवर संत महंतांची विशेष उपस्थिती असणार आहे. सोहळ्याचे संयोजन इव्हेंट मॅनेजमेंटचे नितीन चंद्रचूड यांच्यामार्फत होत आहे. यासाठी देशविदेशातील भक्तांनी आचार्य स्वामी गोविंददेव गिरी षष्टय़ब्दीपूर्ती समारोह समितीची स्थापना केली आहे. अशी माहिती समितीचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत केले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, कार्यक्रमास्थळी आयोजनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. कथेचे व्यासपीठ, भव्य मंडप, विद्युत रोषणाईची कामे जवळपास पूर्णत्वास आली आहेत. यज्ञमंडप खास राजस्थानमधील पिसालाल बंजारा यांनी उभारला आहे. १८ ते २६ जानेवारी या आठवडाभराच्या कालावधीत यज्ञ-होम, हवन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक संत साहित्य संमेलनामुळे धुळेकरांना विशेष सांस्कृतिक व धार्मिक मेजवानी मिळणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. आ. राजवर्धन कदमबांडे, महापौर मोहन नवले आदी यावेळी उपस्थित होते.

आयुक्तालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ वकिलांचा मोर्चा
लातूर, ९ जानेवारी/वार्ताहर

सरकारने लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवून विभागीय महसूल आयुक्तालय घाईगडबडीने नांदेड येथे स्थापन केले, असा आरोप करीत व या निर्णयाच्या निषेधार्थ जिल्हा वकील संघाने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.जिल्हा न्यायालयाच्या परिसरातून सकाळी ११.३० वाजता मोर्चास प्रारंभ झाला. वकील संघाचे अध्यक्ष विक्रम हिप्परकर, सचिव गोविंद कातळे, उपाध्यक्ष संतोष देशपांडे, सुरेखा जानते, नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा अशोक हॉटेल, तहसील कार्यालयामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांना वकिलांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी आयुक्तालयाचा निर्णय घेताना एकांगी विचार केला असून तो पूर्णपणे चुकीचा आहे. निर्णय घेताना सर्वाच्या भावनांचा विचार करून, त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्यतेच्या निकषावरच निर्णय घ्यायला हवा. सरकारने लातूर, उस्मानाबाद, अंबाजोगाई, आदी भागांतील जनतेच्या भावना लक्षात घ्याव्या व नांदेडचे मुख्यालय निश्चित करण्याचा निर्णय त्वरित रद्द करून लातूर येथे महसूल कार्यालय सुरू करावे.

तणावाच्या पाश्र्वभूमीवर रावेरची बाजारपेठ बंद
रावेर, ९ जानेवारी / वार्ताहर

मोहरमनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत दोन युवकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीमुळे अफवा पसरून येथे गुरूवारी निर्माण झालेला तणाव आजही कायम होता. विशेष दक्षता म्हणून शहरात अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला असून आज बाजारपेठ बंद होती.नाजरी मोहल्ल्यातून निघालेली मिरवणूक शांततेत स्वामी विवेकानंद चौकात आली. मिरवणुकीच्या स्वागतासाठी हैदरअली लेझीम पथक कलाविष्कार सादर करीत होते. या दरम्यान रस्ता अरूंद असल्याने मिरवणुकीतील दोघांचा एकमेकांना धक्का लागल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यातच विविध अफवा पसरल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी पोलीस येताच परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी दोन संशयितांची चौकशी सुरू आहे. आज बाजाराचा दिवस असूनही शहरातील दुकाने, बाजारपेठ तणावामुळे बंद होती. अपर जिल्हा पोलीस प्रमुख धनंजय कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी दिलीप राव यांनी येथे तळ ठोकला असून दंगा नियंत्रण पथक, तसेच राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

बनावट दस्तावेजांव्दारे फसवणूक ; आठ जणांविरुद्ध गुन्हा
धुळे, ९ जानेवारी / वार्ताहर

बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतजमिनीवर बोजा चढवून सुमारे एक कोटी रुपयांचे कर्ज काढल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात देवीदास शंकर पालखे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार पाखले व त्यांच्या भावाच्या मालकीची शिरूड शिवारात शेतजमीन आहे. या जमिनीवर खोटय़ा कागदपत्रांच्या सहाय्याने बोजा चढवूने मुंबई येथील दोन बँकांतून परस्पर एक कोटीचे कर्ज काढण्यात आले. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्टॅम्प वेंडर अनिल कोठावदे, यांच्यासह भिका श्रीधर वाणी, विमलबाई भिका वाणी, अरविंद वाणी, चेतन वाणी या धुळे येथील तसेच पुण्याच्या रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे.

बाबा आमटे यांच्या तैलचित्राचे अनावरण
वरोरा, ९ जानेवारी / वार्ताहर

ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांच्या ग्रंथालयावरील प्रेमाची ज्योत अखंड तेवत राहावी, बाबांचे तैलचित्र सतत विद्यार्थ्यांसमोर असावे व त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने आनंद निकेतन कृषी महाविद्यालय ग्रंथालयाच्या वाचन कक्षात बाबांच्या तैलचित्राचे अनावरण साधनाताई आमटे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजय पोळ होते. यावेळी साधनाताई आमटे यांनी आशीर्वादपर मनोगत व्यक्त केले. आनंदवनातील कुष्ठरुग्णांनी कलाकौशल्याने केलेले नूतनीकरणाचे काम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रंथालयातील विविध विभागांची पाहणी त्यांनी केली. डॉ. एस.एम. रोकडे यांनी ग्रंथालयाच्या संगणकीकरणाची माहिती दिली. ग्रंथालय अद्ययावत होत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.वाय. पालारपवार यांनी केले.

वसंतदादा बँकेचा परवाना रद्द
सांगली, ९ जानेवारी / प्रतिनिधी

सांगली येथील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना शुक्रवारी भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने रद्द केल्याने बँकेचे ठेवीदार व खातेदार चांगलेच हादरून गेले असून या निर्णयामुळे पणनमंत्री मदन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी स्थापन केलेली ही बँक गेली अनेक वर्षे आर्थिक विवंचनेत सापडली होती. सहा महिन्यांपूर्वी या बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने आर्थिक निर्बंध लागू केले होते. मिरज अर्बन बँकेपाठोपाठ वसंतदादा शेतकरी बँकेचाही बँकिंग परवाना रद्द केल्याने दक्षिण महाराष्ट्रातील एक मोठी सहकारी बँक बुडीत निघाली आहे. वसंतदादा शेतकरी बँक गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक विवंचनेत सापडली होती. बँकेने मोठय़ा प्रमाणात कर्जवाटप केले असून राजकीय नेत्यांकडूनच कर्जाची वेळेत वसुली न झाल्याने बँक आर्थिक आरिष्टात सापडली. या बँकेच्या एकूण ३५ शाखा असून तब्बल पावणे चारशे कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. सहकारी साखर कारखाने व बडे कर्जदार यांच्याकडे ठेवीइतकीच कर्जाची येणेबाकी आहे. बँकेने ३९ उद्योगसमूहाला १४० कोटींचे कर्जवाटप केले असून ते पूर्णत थकले आहे. बँकेची २८०६ कर्जखाती एनपीएमध्ये असताना पुन्हा या कर्जदारांना २५२ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.

ट्रॅक्टर उलटून दोन महिला ठार; चार जखमी
मेहकर, ९ जानेवारी / वार्ताहर

मेहकरपासून २४ किलोमीटरवर दुर्गम भागात दगडाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर टायर फुटल्याने उलटून दोन महिला घटनास्थळीच ठार तर चौघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच जानेफळचे ठाणेदार भालचंद्र साळुंखे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.
प्राप्त माहितीनुसार, मेळजामोरीवरून दगड वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रॉली त्रंबक शिंदे यांच्या शेताजवळ उलटले. यात पंचफुला बळीराम लोखंडे (५५) व निर्मला कळणू खिल्लारे (४०) या महिला घटनास्थळीच ठार झाल्या.

आदिवासी संघटनांचा पुसदला मोर्चा
पुसद, ९ जानेवारी / वार्ताहर

बान्सी येथील मनकर्णा मळघणे (४२) यांच्या मारेकऱ्याला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी विविध आदिवासी संघटनांच्यावतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील बान्सी येथील मनकर्णा मळघणे यांचा खून झाल्याच्या घटनेला २४ दिवस होऊन मारेकऱ्यांना अटक करण्यात न आल्याने मोर्चेकऱ्यांनी यावेळी संताप व्यक्त केला. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून आदिवासी संघटनांनी आरोपीच्या अटकेची मागणी केली. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, विमुक्त भटक्यांची संघटना, कास्ट्राईब, बिरसा मुंडा बिग्रेडने हा मोर्चा काढला.

भिवंडीतील नेत्याशी माझा संबंध नाही -डावखरे
ठाणे, ९ जानेवारी/प्रतिनिधी

भिवंडी येथील विष्णू बंडू डावखरे हे माझे नातेवाईक अथवा निकटवर्तीय नाहीत. केवळ नामसाधम्र्यामुळे धक्काबुक्कीसारख्या घटनेशी माझा संबंध जोडणे उचित नाही, असे विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी स्पष्ट केले आहे.‘लोकसत्ता’च्या शुक्रवारच्या अंकात ‘शासकीय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की, राष्ट्रवादीच्या भिवंडीतील नेत्यास अटक’ या शीर्षकाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यासंबंधी खुलासा करताना ठाणे जिल्ह्यात डावखरे या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल होताच, त्याचा थेट माझ्याशी संबंध जोडणे गैर आहे. उपरोक्त बातमीत ज्यांचा उल्लेख आहे ते विष्णू डावखरे माझे कोणीच नाहीत. कायद्यानुसार पोलीस याप्रकरणी कारवाई करतील. मी त्यात पडू इच्छित नाही, असेही डावखरे यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे.

लांजामधील विद्यार्थ्यांना अच्युत पालव देणार सुलेखनाचे धडे
लांजा, ९ जानेवारी/वार्ताहर

जगविख्यात चित्रकार अच्युत पालव यांचे सुलेखन या विषयावरील मार्गदर्शन ऐकण्याची सुवर्णसंधी लांजा तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळाली आहे. उद्योगपती दिलीप बाईंग यांच्या पुढाकाराने शिवोशी शिक्षण प्रसारक मंडळाने ती उपलब्ध करून दिली आहे.शुक्रवार, १६ जानेवारी रोजी लांजा शहरामध्ये पालव यांच्या सुलेखन या विषयावरील मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये लेखनशैली, शब्दनाद, सुलेखन या विषयावर पालव हे स्वत: प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यक्रमामध्ये चर्चासत्राद्वारे ते विद्यार्थी व शिक्षकांशी थेट संवाद साधणार आहेत. संगणक युगामध्ये विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन याकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याबाबत विशेष मार्गदर्शन व्हावे, या हेतूने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, संपूर्णपणे विनामूल्य असलेल्या या कार्यशाळेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षकांनी घ्यावा, असे आवाहन उद्योगपती दिलीप बाईंग यांनी केले आहे.