Leading International Marathi News Daily                                 शनिवार, १० जानेवारी २००९
क्रीडा

शालेय क्रिकेटला अधिक महत्त्व द्या!
सचिन तेंडुलकरचे मुंबई क्रिकेट व शालेय संघटनेला आवाहन

मुंबई, ९ जानेवारी / क्री. प्र.

शालेय क्रिकेट हा मुंबई क्रिकेटच्या यशाचा पाया होता. तो पाया मजबूत करण्यासाठी हॅरिस, गाइल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धाना अधिक महत्त्व द्या. प्रत्येक शाळेला या स्पर्धासाठी किमान तीन सामने खेळण्याची संधी मिळावी. त्यायोगे संघातील प्रत्येक खेळाडूला आपली गुणवत्ता, उपयुक्तता आणि कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. सुप्त गुणवत्ता प्रकाशात आणण्यासाठी शालेय क्रीडा संघटना आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांनी एकत्र येऊन अधिकाधिक खेळाडूंना आणि शाळांच्या संघांना कशी संधी मिळेल, याचा विचार करण्याची गरज आहे. भारताचा लिटल मास्टर सचिन तेंडुलकर याने आपल्या सत्काराप्रसंगी केलेल्या वार्तालापाच्या वेळी हे प्रतिपादन केले.

पिटरसनचा प्रस्ताव म्हणजे विनोद -वॉर्न
लंडन, ९ जानेवारी / पीटीआय

इंग्लंड क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्याचा केव्हिन पिटरसनने दिलेला प्रस्ताव म्हणजे केवळ विनोद असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने म्हटले आहे. प्रशिक्षक पिटर मूर्स यांच्याशी वाद झाल्यानंतर कौंटी स्पर्धेत हॅम्पशायर संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पिटरसनची संघाचा कर्णधार शेन वॉर्नने पाठराखण केली होती. मूर्स यांनी इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर पिटरसनने प्रसारमाध्यमापुढे बोलताना वॉर्नपुढे इंग्लंड संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवला होता. याबाबत बोलताना वॉर्न म्हणाला की, पिटरसनचा प्रस्ताव केवळ ‘जोक’ असून मी पूर्णवेळ प्रशिक्षकपद स्वीकारण्यास उत्सुक नाही. पिटर्सनने केवळ विनोदाने प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव माझ्यापुढे ठेवला आहे. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार पीटर मूर्सचा वारसदार म्हणून माझ्या नावाची चर्चा आहे.

‘पिटरसनला फ्लॉवरलाही पदावरून हटवायचे होते’
लंडन, ९ जानेवारी / पीटीआय

मुख्य प्रशिक्षक पीटर मूर्स यांच्यासह फलंदाजीचे प्रशिक्षक अ‍ॅन्डी फ्लॉवर यांच्याकडूनही इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पिटरसन यांना सुटका करून घ्यायची होती. ‘द गार्डियन’ने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख न करता प्रसिद्ध केलेल्या वृत्तात फ्लॉवरसुद्धा पिटरसनच्या नावडत्यांच्या यादीत होता. पिटर्सनला त्यांची जोडी तोडायची होती आणि त्यात अ‍ॅन्डी फ्लॉवरचाही समावेश होता, असेही इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

कसोटी क्रिकेटला पुन्हा सुगीचे दिवस!
पुन्हा एकदा दोन कट्टर प्रतिस्पध्र्यानी कसोटी क्रिकेटला बळकटी देण्याची कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटच्या एकूणच भवितव्याविषयी आपण विनाकारण चिंता करतो, त्याची चिरफाड करतो, असे मला वाटते. कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट हे जे काही आपल्या गुरुजनांनी सांगितले आहे त्याची प्रचीती कसोटी क्रिकेट बळकट होत असताना आपल्याला येते आहे. माझ्या मते कसोटी क्रिकेट वाचविण्यासाठी धडपड करण्याची काहीच गरज नसून केवळ त्यासंबंधी नवीन पिढीला माहिती देणे एवढेही पुरेसे आहे.

सोमदेव उपान्त्य फेरीत
चेन्नई ओपन टेनिस
चेन्नई, ९ जानेवारी / पीटीआय

चौथ्या मानांकीत इव्हेा कालरेव्हीकला उपांत्यपूर्व सामन्यात ७-६(४), ६-४ असे नमवत भारताच्या सोमदेव देववर्मनने चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत शानदार प्रवेश केला. आजचा हा खेळ सुमारे ८६ मिनीटे चालला. आता सोमदेवची गाठ जर्मनीच्या रेनर शटलरसोबत पडणार आहे. या विजयानंतर लिएंडर पेस नंतर स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे.१९९८ मध्ये पेसने ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रीक रॅफ्टारला पराभूत केले होते.घरच्या पाठीराख्यांपुढे काल जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू स्पेनच्या कालरेस मोयाचा पराभव करणाऱ्या सोमदेवने आजही चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेच्या १४ वर्षांच्या इतिहासात उपांत्य फेरी गाठणारा लिएंडर पेसनंतर दुसरा भारतीय टेनिसपटू ठरला आहे. १९९८च्या स्पर्धेत लिएंडर पेसला ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रिक राफ्टरविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. दुसऱ्या उपांत्य लढतीत कोएशियाच्या तिसऱ्या मानांकित मारिन क्लिकची गाठ आठव्या मानांकित स्पेनच्या मार्सेल ग्रानोलर्ससोबत पडणार आहे. अन्य सामन्यात सर्बियाची जान्को तिपसाव्‍‌र्हीक विजयी ठरला. दुसऱ्या सामन्यात स्पेनच्या मार्सल ग्रॅनोलर्स याने झेक गणराज्यच्या लुकास डॉल्हीचा ७-५, २-६, ६-४ असा पराभव केला.

इंग्लंडच्या प्रशिक्षकपदासाठी टॉम मुडी अनुत्सुक
सिडनी, ९ जानेवारी / पीटीआय

पीटर मूर्सचा वारसदार म्हणून टॉम मुडी यांचे नाव चर्चेत असले तरी ऑस्ट्रेलियाचा हा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इंग्लंडचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास उत्सुक नाही. केव्हिन पिटर्सनने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसची कर्णधारपदी निवड करण्यात आली. मूर्स यांनीही प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला पण, त्यांच्या स्थानावर अद्याप कुणाची निवड झालेली नाही. मुडी यांचे नाव प्रशिक्षकपदाच्या चर्चेत होते. मिळालेली संधी नाकारण्याचे आणि प्रस्ताव धुडकावण्याचे हे वय नाही पण, मी पर्थमध्ये समाधानी आहे. पर्थमध्ये कुटुंबीयांसोबत आणि माझ्या व्यवसायाबाबत समाधानी आहे, असेही मुडी यांनी सांगितले. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने या संदर्भात अद्याप संपर्क केला नसल्याचे मुडीने सांगितले. श्रीलंकन क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद भूषवणारे मुडी सध्या पश्चिम ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक आहेत.

‘आधी लगीन कोंडाण्याचे..’
दरबान, ९ जानेवारी/पीटीआय

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकन कर्णधार ग्रॅमी स्मिथ उत्सुक असून, यासाठीच त्याने ‘आधी लगीन कोंडाण्याचे..’ असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका संपल्यावरच दुखऱ्या कोपरावर शस्त्रक्रिया करण्याची योजना स्मिथने आखली आहे. विश्रांती घेऊन ८ ते १२ आठवडय़ांनी शस्त्रक्रिया करण्याचे मी ठरविले आहे. यादरम्यान उपचार मात्र सुरू ठेवणार आहे, असे डावखुऱ्या स्मिथने ऑस्ट्रेलियाहून परतल्यावर सांगितले. स्मिथच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाला आहे. टेनिस एल्बोला झालेल्या दुखापतीवर मात करीत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत निकराची झुंज दिली. दक्षिण आफ्रिकेने ही कसोटी मालिका २-१ ने जिंकण्याची करामत दाखविली.

आसिफची सुनावणी भारतात होण्याची शक्यता
कराची, ९ जानेवारी/पीटीआय

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पध्रेत उत्तेजक द्रव्ये घेऊन खेळल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफच्या सुनावणीचे ठिकाण आता निश्चित झाले आहे. आयपीएलच्या उत्तेजक द्रव्यासंदर्भातील लवादाने सुनावणीचे ठिकाण पुन्हा भारताचीच निवड होण्याची शक्यता आहे.मुंबईवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या स्थितीमुळे आसिफचे वकील आणि वेगवान गोलंदाज शाहीद करीम यांनी ही सुनावणी त्रयस्थ ठिकाणी घेण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्यामुळे लंडन येथे २४ जानेवारीला या लवादापुढे आसिफ हजर राहणार होता.दरम्यान, आयपीएलने सुनावणी पुन्हा भारतात घेण्याचे निश्चित केल्याचे आपल्याला सांगण्यात आले आहे. याबाबत माझ्या वकिलांनी अद्याप त्यांना उत्तर दिलेले नाही, असे आसिफने सांगितले. सुनावणी भारताऐवजी लंडनमध्ये झाली तर बरे होईल, यावर माझा विश्वास आहे, असे आसिफने म्हणाला. आसिफच्या नजीकच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या लवादाने ई-मेलद्वारे भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाची परिस्थिती निवळत असून, आता भारतात सुनावणी घेण्यास काहीच हरकत नसल्याचे सुचित केले आहे.

चिवट झुंजीनंतर सायना पराभूत
क्वाललाम्पूर, ९ जानेवारी / पीटीआय

भारताची स्टार बॅडिमटनपटू सायना नेहवाल हिला मलेशियन सुपर बॅडमिंटन स्पर्धेत आज पराभवाचे तोंड पाहावे लागले. कडवी झुंज देऊनही फ्रान्सच्या होंगयान पाई हिने सायनाला १७-२१, २६-२४, १६-२१ असे नमवले. तब्बल ५६ मिनिटे चाललेल्या या खेळात सरतेशेवटी पाईची सरशी झाली. गतवर्षी झालेल्या जागतिक सुपर स्पर्धेत पाईला सायनाने नमविले होते. जागतिक क्रमवारीत सायना दहाव्या तर पाई आठव्या क्रमांकावर आहे. पहिल्या ब्रेकमध्ये ९-६ अशी आघाडी घेण्याऱ्या पाईने सायनावर १५ -९ अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर सायनानेही बचावात्मक पवित्रा सोडून आक्रमक खेळ केला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये स्ट्रेट फटके लगावत सायनाने २१ विरुद्ध १७ अशी आगेकूच केली. परंतु प्रारंभापासूनच आपले इरादे स्पष्ट करणाऱ्या पाईने तीन जलद गुण संपादित केले.त्यानंतरही सायनाने झुंज चालूच ठेवली. २४ - २४ अशी बरोबरी झाल्यानंतर कोण ही गेम जिंकणार अशी उत्सुकता वाढली. त्यावेळी मात्र दोन जलद गुण संपादन करत पाईने २६-२४ असा खेळ जिंकला. १३ ते १८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या कोरियन सुपर स्पर्धेत सायना सहभागी होणार आहे.

श्रीलंकन संघात दिलशान; मॅथ्यूज, कदंबी नवे चेहरे
पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी जाहीर
कोलंबो, ९ जानेवारी/ वृत्तसंस्था

पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंका संघात तिलकरत्ने दिलशानचा समावेश करण्यात आला आहे. या दौऱ्यासाठी श्रीलंका संघाची आज घोषणा करण्यात आली. अ‍ॅंजेलो मॅथ्यूज आणि थिलिना कदंबी या दोन नव्या चेहऱ्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.ऑगस्ट २००८ मध्ये भारताविरुद्धच्या लढतीनंतर दिलशानला श्रीलंका संघातून वगळण्यात आले होते. श्रीलंकेच्या नुकत्याच झालेल्या बांगलादेश दौऱ्यात दिलशानने चमकदार फलंदाजी केली होती. अखेरच्या कसोटीत तर त्याने दोन्ही डावात शतक झळकाविले होते.बांगलादेश, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी मात्र दिलशानचा विचार करण्यात आलेला नाही. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी समावेश करण्यात आलेला वेगवान गोलंदाज दमिका प्रसाद याचा पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी विचार करण्यात आलेला नाही. ज्येष्ठ फलंदाज सनथ जयसूर्याने आपले स्थान कायम राखले आहे. श्रीलंका संघ : महेला जयवर्धने (कर्णधार), कुमार संगकारा, सनथ जयसूर्या, उपुल थरंगा, चामरा कापुगेदरा, जेहान मुबारक, तिलकरत्ने दिलशान, थिलिना कदंबी, मुथय्या मुरलीधरन, अजंथा मेंडिस, परवेझ महारुफ, दिलहरा फर्नाडो, नुवान कुलशेखरा, थिलिना तुषार, अ‍ॅंजेलो मॅथ्यूज.

धोनीचे अव्वल स्थान कायम, युवराज पाचव्या स्थानी
दुबई, ९ जानेवारी / पीटीआय

भारतीय संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले तर वेगवान गोलंदाज झहीर खानने अव्वल दहा गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले. आयसीसीतर्फे आज जाहीर झालेल्या एकदिवसीय संघाच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर असून दक्षिण आफ्रिका व भारत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे. स्टार फलंदाज युवराज सिंगने पाचव्या स्थानावर झेप घेतली असून पहिल्या वीसमध्ये स्थान मिळवणाऱ्या अन्य भारतीय फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकरचा समावेश आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये झहीरव्यतिरिक्त हरभजन सिंगने पहिल्या वीसमध्ये स्थान मिळवले. दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार डॅनियल व्हेटोरीने या वर्षांची चांगली सुरुवात करताना एकदिवसीय गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले. व्हेटोरीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यात सहा बळी घेण्याची कामगिरी केली. त्याने गेल्यावर्षी एकदिवसीय गोलंदाजांच्या मानांकनात सुरुवातीचे सहा महिने अव्वल स्थान कायम राखले होते. दरम्यान, ब्रॅकनला अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी ब्रॅकनची ऑस्ट्रेलिया संघात निवड झाली आहे.

‘डबल’ बॅटवर बंदी घालण्याची वॉल्टर्स, डेव्हिस यांची मागणी
मेलबर्न, ९ जानेवारी / पीटीआय

‘डबल’ बॅटच्या वापराबाबत माजी क्रिकेटपटूंमध्ये मतभेद आता चव्हाटय़ावर येत असताना डॉग वॉल्टर्स आणि इयान डेव्हिस यांनी या संशोधनावर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. न्यू साऊथ वेल्सचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने गेल्या आठवडय़ात दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत या बॅटचा उपयोग केला होता. माजी क्रिकेटपटू जॅन बेनॉ यांनी बॅटचे स्वागत केले आहे. ‘डबल’ बॅटमुळे फलंदाजांना अवाजवी फायदे मिळतील आणि त्यामुळे स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये अशा बॅटला थारा देता कामा नये, असे मत वॉल्टर्स आणि डेव्हिस यांनी नोंदविले आहे.

मिलर यांच्याकडून इंग्लंड क्रिकेट मंडळाचे कौतुक
लंडन, ९ जानेवारी/वृत्तसंस्था

केविन पिटरसन आणि पीटर मूर्स यांच्यातील वादामुळे निर्माण झालेली परिस्थिती इंग्लंड क्रिकेट मंडळाने योग्य पद्धतीने हाताळली, असे मत निवड समिती सदस्य जेफ मिलर यांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसातील घडामोडी चविष्ट बातम्या ठरल्या असल्या तरी त्या इंग्लंडमधील क्रिकेटच्या दृष्टीने अयोग्य होत्या, असेही ते म्हणाले.‘यॉर्कशायर पोस्ट’ या वृत्तपत्राशी बोलताना मिलर म्हणाले की, जे काही घडले त्याला इंग्लंड मंडळ जबाबदार नव्हते. त्यामुळे पिटरसन-मूर्स यांच्या वादातून निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर इंग्लंड मंडळाने परिस्थितीनुरुपच निर्णय घेतला, असे म्हणावे लागते.जे काही झाले ते विसरुन जाऊन आता आपल्याला भविष्याचा विचार करावा लागणार आहे. इंग्लंड संघातील खेळाडूंमध्ये गंभीर स्वरुपाचे मतभेद आहेत, असे मला मुळीच वाटत नाही. मात्र ड्रेसिंग रुममधील वातावरण दूषित नसावे असे मला वाटते, असेही ते म्हणाले. पिटरसन नव्या जोमाने इंग्लंड संघात परतेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पाटपन्हाळे मॅरेथॉन स्पर्धा उद्या
मुंबई ९ जानेवारी / क्री. प्र.

पाटपन्हाळे एज्युकेशन संस्थेच्या विद्यमाने महाराष्ट्र हौशी अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने प्रतिवर्षांप्रमाणे यंदाही रत्नागिरी जिल्ह्य़ातील पाटपन्हाळे येथे १० वी पाटपन्हाळे मॅरेथॉन ११ जानेवारी (रविवार) रोजी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजता मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे.ग्रामीण भागांतील मुलांना खेळाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. एकता, प्रेम, बंधुभाव, शांतता यांचे महत्त्व पटवून देणे, तसेच कॅन्सर व एड्स यासारख्या दुर्धर रोगांविषयी जनजागृती करणे हादेखील मॅरेथॉनचा आणखी एक हेतू आहे. या मॅरेथॉनमध्ये स्पर्धक विविध प्रकारांत सहभागी होऊ शकतात. पुरुषांसाठी ३० कि. मी., महिलांसाठी २१ कि. मी., १८ वर्षांखालील मुलांना १० कि. मी., १४ वर्षांखालील मुलांना सात कि. मी. तर १० वर्षांखालील मुलांना तीन कि. मी. शर्यतीत भाग घेता येईल. अधिक माहितीसाठी भालचंद्र चव्हाण यांच्याशी ९८२०५११७७२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व संदीप सिंगकडे
नवी दिल्ली, ९ जानेवारी/पीटीआय

अर्जेटिनाविरुद्ध चालू महिन्यात होणारी चार कसोटी सामन्यांची मालिका आणि ३१ जानेवारीपासून चंदिगढमध्ये सुरू होणाऱ्या चौरंगी पंजाब गोल्ड कप हॉकी स्पध्रेसाठी २२ सदस्यीय भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली असून, ड्रॅग फ्लिकर संदीप सिंगकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे.१८, १९, २१ आणि २२ जानेवारीला मार डील प्लाता येथे अर्जेटिनाविरुद्ध कसोटी मालिका रंगणार आहे. भारतीय संघ : संदीप सिंग (कर्णधार), अ‍ॅड्रेन डि’सोझा, दिलीप तिर्की, व्ही. आर. रघुनाथ, प्रबोध तिर्की, प्रबजोत सिंग, दीपक ठाकूर, सरवनजित सिंग, गुरबज सिंग, तुषार खांडेकर, राजपाल सिंग, बलजित सिंग, हरी प्रसाद, शिवेंद्र सिंग, रवी पाल, विकास पिल्ले, व्ही. एस. विनया, भरत, अजितेश राय, एस. व्ही. सुनील, विक्रम पिल्ले, बिकाश तोप्पो. प्रमुख प्रशिक्षक : हरेंद्र सिंग, प्रशिक्षक : रामदीप सिंग, रोमिया जेम्स.