Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९
क्रीडा

(सविस्तर वृत्त)

शालेय क्रिकेटला अधिक महत्त्व द्या!
सचिन तेंडुलकरचे मुंबई क्रिकेट व शालेय संघटनेला आवाहन
मुंबई, ९ जानेवारी / क्री. प्र.

 
शालेय क्रिकेट हा मुंबई क्रिकेटच्या यशाचा पाया होता. तो पाया मजबूत करण्यासाठी हॅरिस, गाइल्स शिल्ड क्रिकेट स्पर्धाना अधिक महत्त्व द्या. प्रत्येक शाळेला या स्पर्धासाठी किमान तीन सामने खेळण्याची संधी मिळावी. त्यायोगे संघातील प्रत्येक खेळाडूला आपली गुणवत्ता, उपयुक्तता आणि कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. सुप्त गुणवत्ता प्रकाशात आणण्यासाठी शालेय क्रीडा संघटना आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांनी एकत्र येऊन अधिकाधिक खेळाडूंना आणि शाळांच्या संघांना कशी संधी मिळेल, याचा विचार करण्याची गरज आहे. भारताचा लिटल मास्टर सचिन तेंडुलकर याने आपल्या सत्काराप्रसंगी केलेल्या वार्तालापाच्या वेळी हे प्रतिपादन केले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील रिक्रीएशन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात बोलताना सचिन तेंडुलकर पुढे म्हणतात, ‘‘माझ्या आयुष्याचे सारे काही क्रिकेटच्या मैदानावरूनच सुरू झाले. क्रिकेटचे हे व्यासपीठ मुंबईच्या साऱ्या क्रिकेटपटूंसाठीही महत्त्वाचे आहे. शरद पवार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे म्हणून मी खास आभार मानतो, कारण त्यांनी सर्व क्रिकेटपटूंसाठी येथे साऱ्या अत्याधुनिक क्रिकेट प्रशिक्षण सेवा सुरू केल्या.’’ सचिन म्हणाला, ‘‘मुंबईसाठी खेळणे हा बहुमान आहे. मुंबई संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये आपल्या विचारांची देवाणघेवाण करणे हाही वेगळा अनुभव आहे, असे तो म्हणाला. मात्र त्रयस्थ ठिकाणी सामने खेळण्याबाबत सचिनने प्रतिकूल मत व्यक्त केले.’’ विश्वचषक, ‘ट्वेन्टी-२०’ विश्वचषक चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा परदेशातील मालिका यामध्ये त्रयस्थ ठिकाणी खेळण्याचा अनुभव वेगळाच असतो. मात्र रणजी स्पर्धा स्वगृही खेळण्यात औरच मजा आणि थ्रील असते, असे सचिनने सांगितले. ऑस्ट्रेलियात प्रत्येक वेळी खेळायला उतरताना मिळणारी प्रेक्षकांची उठून उभे राहून मिळणारी मानवंदना मात्र न विसरण्याजोगी गोष्ट असल्याचा उल्लेखही सचिनने केला.
कसोटी क्रिकेटचे महत्त्व भविष्यातही कायम राहील, मात्र प्रेक्षकांची उपस्थिती काळजी करायला लावते तोच मुद्दा पकडून, सचिन तेंडुलकरने या वेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांना कसोटी क्रिकेटसाठी स्थानिक शालेय व महाविद्यालयीन खेळाडू विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश द्या, असे आवाहन केले.