Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

रांगा सौख्यभरे!
 
ठाणे/प्रतिनिधी : वाहतूकदारांचा संप आणि पेट्रोलियम कंपन्यांतील अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने ठाणे जिल्ह्यातील डिझेल, पेट्रोल व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई या शहरी भागातील सर्वच पेट्रोलपंपांवर पेट्रोलसाठी एक ते दीड कि.मी. लांबीच्या रांगा लागल्या. अन्नधान्यातही मोठी तूट होईल, अशी भीती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका सूत्राने व्यक्त केली.
ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागात ८६, तर ग्रामीण भागात एकूण ९६ पेट्रोलपंप सध्या कार्यरत आहेत. त्यांना दोन दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचा पुरवठा झाला नसल्याने शहरी भागातील ७५ आणि ग्रामीण भागातील १४ पेट्रोलपंपांवरील इंधनात १०० टक्के खडखडाट झाल्याने ते पूर्णत: बंद पडले आहेत. ज्या पेट्रोलपंपावर पेट्रोल व डिझेलचा काही प्रमाणात साठा शिल्लक आहे, तेथे इंधन भरण्यासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासूनच दुचाकी व चार चाकी वाहनांच्या प्रचंड लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्यावरील ८० टक्के रिक्षा रस्त्याच्या कडेला इंधनाअभावी बंद करून ठेवल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. त्यामुळे नागरिकांचेही मोठय़ा प्रमाणावर हाल सुरू आहेत.
भारत पेट्रोलियम कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारनंतर संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली असली, तरी इंधनाचा पुरवठा पूर्ववत होण्यासाठी आणखी २४ तास जावे लागतील, असे एका पेट्रोलपंपाच्या मालकाने सांगितले.
वाहतूकदारांच्या संपामुळे जिल्ह्यात होणाऱ्या धान्याच्या पुरवठय़ावर विपरीत परिणाम झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून एका सूत्राने सांगितले. जिल्ह्यात रोज ३८० ट्रक एवढी अन्नधान्याची आवक होते. ती ९५ ट्रक एवढी खाली आल्याची माहिती या सूत्राने दिली. त्यामुळे संप लवकर मिटला नाही तर जिल्ह्यात धान्याचा तुटवडा निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये रोज ४७५ ट्रक एवढा भाजीपाला व १६१ ट्रक एवढय़ा कांद्याची आवक होत असते. आज ४५१ ट्रक भाजीपाला आणि २६२ ट्रक कांद्याची आवक झाली. त्यामुळे भाजीपाला व कांद्याची टंचाई नसल्याचे या सूत्राने सांगितले.