Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

अधिकृत रेती परवान्याच्या प्रतीक्षेत रेती उत्पादक
 
कल्याण/प्रतिनिधी
गेल्या पाच महिन्यापासून रेती उत्पादक मालकांना शासनाने रेती काढण्याचे अधिकृत परवाने दिले नाहीत. त्यामुळे भांडवली खर्चासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकू लागल्याने रेती उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच, परवाने मिळत नसल्याने या व्यवसायातील हजारो कामगारांना काम नसल्याने त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
कोकण किनारपट्टीवरील नवी मुंबई, रेवदंडा, चिपळूण, सावित्री नदी या ठिकाणी खोल समुद्र, नदीच्या पात्रात जाऊन रेती काढण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून काही रेती उत्पादक शासनाचा अधिकृत परवाना घेऊन करत आहेत. दरवर्षी ऑगस्टमध्ये रेती उत्पादकांच्या परवान्याचे नूतनीकरण केले जाते. परंतु, या वर्षी रेती उत्पादकांना नव्याने परवाने देण्यात आले नाहीत. त्यामुळे या व्यवसायातील सहा हजार कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे कामगार काम नसल्याने रोजीरोटीसाठी तडफडत आहेत. अनेक कामगार तीस ते चाळीस वर्षांपासून ड्रेझरवर काम करीत आहेत. भिवंडी, कल्याण परिसरात सुमारे दीडशे अधिकृत रेती उत्पादक आहेत.
गेल्या पाच महिन्यापासून रेती व्यवसाय बंद पडल्याने पैशाची आवक बंद पडली आहे. त्यामुळे भांडवली खर्चासाठी रेती उत्पादकांनी घेतलेली कर्जे थकण्यास सुरुवात झाली आहे. बँकेचे अधिकारी रेती मालकांचे हप्ते थकू लागल्याने घरी चकरा मारू लागले आहेत. रेती व्यवसाय हा फक्त आठ महिने चालणारा व्यवसाय आहे. त्यात पाच महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे करायचे काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी शासनाने परवाने देण्याच्या विषयावर गांभीर्याने विचार केला आहे. त्यामुळे शासनपातळीवर उत्पादकांच्या मागणीचा विचार करण्यासाठी सध्या तरी कोणाला वेळ नसल्याचे समजते.