Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

पाटकर विद्यालयाने उभा केला क्रीडा क्षेत्रातला डोंबिवली पॅटर्न
 
प्रतिनिधी : क्रीडा क्षेत्रातला डोंबिवली पॅटर्न तयार करणारी, डोंबिवलीचा अभिमानबिंदू मानली जाणारी आणि एकाच वर्षांत राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार व बॅडमिंटनमधील जागतिक दर्जाचे यश संपादन करणारी माजी विद्यार्थीनींची जोडगोळी ज्या शाळेला लाभली, त्या शाळेने विद्यार्थी-पालक व शिक्षक यांचे कौटुंबिक नात्यांचे आदर्श उदाहरण उभे केलेले पहायला मिळणे हा देवदुर्लभ योग आहे असे उदगार लोकसत्ताचे निवासी संपादक सुधीर जोगळेकर यांनी नुकतेच येथे काढले. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या डोंबिवलीतील चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
शेक्षणिक तसेच क्रीडा व इतर कलागुणांमध्ये विशेष नैपुण्य दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सन्मानचिन्ह व विशेष पुरस्कृत रोख पारितेषिके देऊन गौरव केल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी शाळेच्या माजी विद्यार्थिनी रुणिता मोघे व कादंबरी छेडा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे पा्रस्ताविक मुख्याध्यापिका मुक्ता मायदेव यांनी केले, तर अनघा टिल्लू यांनी वार्षिक अहवाल सादर केला. पारितोषिक वितरणानंतर शारिरीक शिक्षण दिनाच्या सादरीकरणाची चित्रफीत दाखविण्यात आली.
पारितोषिक वितरणाच्या आदल्याच दिवशी पार पडलेल्या शारिरीक दिन कार्यक्रमात विद्याथ्यार्ंचे संचलन, सामूहिक कवायत, रुमाल कवायत, सूर्यनमस्कार, योगासने, डंबेल्स, रिंग, झेंडा-बांबू, घुंगुरकाठी, मानवी मनोरे, मल्लखांब, बर्ची कवायत, लेझीम अशी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. याप्रसंगी बिर्ला महाविद्यालयाचे उपप्राचार्य जयंत पानसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास पाटकर ट्रस्टच्या अध्यक्षा जयंती पाटकर विशेषत्वाने उपस्थित होत्या.