Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला : ‘सत्यम’ प्रकरण हा आर्थिक दहशतवाद -टिळक
 
ठाणे/प्रतिनिधी
गेल्या २५ वर्षांंहून अधिक काळ तेजीत असलेल्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला प्रथमच आर्थिक मंदीचा जबरदस्त फटका बसला असून, जागतिक बाजारपेठेतील डॉलरचे स्थानही डळमळीत झाले आहे. भारतासारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये मात्र अजूनही मंदी नाही. परिणामी विकसनशील राष्ट्रे आपल्यापुढे जातील, अशी भीती अमेरिकेला वाटत असावी. त्यातच लष्करी युद्धापेक्षा आर्थिक युद्ध सोपे आणि प्रभावी असते, त्यामुळे सत्यम घोटाळा हा आर्थिक दहशतवादाचाच प्रकार असावा, अशी भीती ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केली.
सरस्वती सेकंडरी स्कूलच्या पटांगणात २३व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक चंद्रशेखर कुलकर्णी होते. यावेळी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, सचिव शरद पुरोहित, भाजप शहराध्यक्ष संजय वाघुले आदी उपस्थित होते.
‘जागतिक आर्थिक मंदी आणि सामाजिक भारत’ या विषयावर पुढे बोलताना टिळक म्हणाले की, जेव्हा जेव्हा आर्थिक फटके बसायला सुरू होतात. त्या त्या वेळी सामाजिक परिणाम जाणवतात. अर्थकारण- समाजकारण- राजकारण सर्व काही एकच आहे. जागतिक आर्थिक मंदीकडे पाहताना आपल्याही देशात मंदी असल्याचा बोलबाला होत असला, तरी आपल्याला तो मान्य नाही, असे प्रारंभीच त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेसारख्या राष्ट्रांचा जीडीपी शून्य ते वजा एकपर्यंत जात असताना आपला विकासाचा दर आजही चांगला आहे, त्यामुळे अमेरिकेलाच भारतात मंदी हवी आहे. दुर्दैवाने आपणही त्यांच्या या प्रचाराला साथ दिली तर आपल्यासारखे कपाळ करंटे आपणच असू, असा इशाराही त्यांनी दिला.
गेल्या कित्येक वर्षांंत प्रथमच अमेरिकेत आर्थिक मंदी आली असून, आजवर रिझव्‍‌र्ह करन्सी म्हणून पहिल्या जाणाऱ्या ‘डॉलर’लाही धक्का बसला आहे. विकसनशील देश आपल्यापुढे जातील याची अमेरिकेला भीती वाटू लागली आहे, परिणामी आपले आर्थिक आणि राजकीय वर्चस्व धोक्यात आल्याच्या जाणिवेतूनच तो देश आपल्यावर आर्थिक मंदीची चर्चा लादत आहे. याचा सामाजिक परिणाम म्हणजे आगामी काळात जागतिक राजकारणातही बदल होऊ शकतात.
आजच्या परिस्थितीत आर्थिक मंदीचा सर्वाधिक फायदा भारतीय सॉप्टवेअर उद्योगाला होऊ शकतो. औषध उद्योगही आघाडीवर होता. विप्रो, टीसीएस, इन्फोसिस यासारख्या अनेक कंपन्यानी परदेशी कंपन्या खरेदी करण्याचा सपाटा लावला होता. त्याच पाश्र्वभूमीवर सत्यमचा घोटाळा उघडकीस आणण्यामागे आधीच मांडवली झाली असावी, त्यामुळे सर्वांनीच खंबीर राहून पाश्चिमात्य देशांना ठणकाहून सांगण्याची वेळ आली आहे, असेही टिळक म्हणाले. मंदीच्या काळात बाजारभाव खाली यायला हवेत अशी सर्वसामान्यांची भावना असते. मात्र आपल्या देशात उद्योग आणि कृषीक्षेत्रातील उत्पादन आणि होणारी मागणी जोवर समान आहे तोवर महागाई कमी होणार नाही. देशातील ४० टक्के लोक दारिद्रय़रेषेखाली राहतात. त्यातच आपण कधीच वाजवीपेक्षा जास्त खर्च करीत नाही. त्यामुळे जोवर मागणी टिकून आहे आणि मध्यम वर्गीयांची राहणी बदलत नाही, तोवर सामाजिक-आर्थिक रूप बदलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आर्थिक मंदीचे सामाजिक परिणाम म्हणजे अशा काळात सामाजिक अशांतता उत्कलन बिंदूवर पोहचते. आपल्याकडे १९८६ ला जेव्हा आर्थिक मंदी आली, तेव्हा मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली. आजही आर्थिक मंदीचे वारे वाहत असताना स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आधीच्या आरक्षणाला फटका नको, असे मुद्दे गाजू लागले आहेत. निवडणुका जवळ येतील तसे हे मुद्दे तापतील, त्यातून हाणामाऱ्याही होतील. हा सगळा मंदीचा सामाजिक परिणाम असेल. म्हणूनच सामाजिक सकारात्मकता हे देशाचे सर्वात मोठे आर्थिक भांडवल असते. त्यामुळे वेडय़ावाकडय़ा प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रारंभी आमदार केळकर यांनी या व्याख्यानमाला आयोजनामागचा उद्देश विषद केला, तर अध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले की, मुरबाडच्या शेकोटी चर्चेतून उदयास आलेल्या या व्याख्यानमालेला ठाणेकर दरवर्षी मोठय़ा संख्येने हजेरी लावतात.
ही व्याख्यानमाला हे ठाण्याचे सांस्कृतिक संचित असून, त्यावर कधीही संक्रात येणार नाही. आजवरच्या व्याख्यानमालेतील भाषणांचा संग्रह प्रसिद्ध केल्यास तो नव्या पिढीला उपयुक्त ठरेल, अशी सूचनाही त्यांनी केली.