Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

दुर्बिणीच्या शोधाची कथा
१६०९ मध्ये गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला. त्याला सन २००९ मध्ये ४०० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने International
 
Astronomical Union आणि UNESCO ने सन २००९ हे ‘आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष २००९’ म्हणून संपूर्ण जगभर साजरे करावयाचे ठरविलेले आहे. ठाणे शाखेने यानिमित्त रविवारी ११ जानेवारी रोजी गडकरी रंगायतनमध्ये ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर आणि खगोलतज्ज्ञ प्रा. मोहन आपटे यांची व्याख्याने आयोजित केली आहेत. दोन सत्रात पार पडणाऱ्या या कार्यक्रमात खगोलविषयक माहितीपटही दाखविले जाणार आहेत. सकाळी सव्वा आठ ते दुपारी तीन यावेळेत दोन सत्रात हा कार्यक्रम होणार असून प्रवेश विनामूल्य आहे. प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्रवेश मिळेल. यानिमित्त खगोल विज्ञानातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आढावा घेणारा हा लेख..
ख्रि स्तपूर्व ३८४ साली जन्मलेल्या अ‍ॅरिस्टॉटलपासून किंवा त्याच्याही थोडय़ा आधीपासून मान्यता पावलेला, पृथ्वीचा गोलाकार गोळा हा विश्वाच्या केंद्रस्थानी असून, सूर्य, ग्रह व तारे हे सर्व तिच्याभोवती गोलाकार कक्षेत भ्रमण करतात, याच मताचे प्राबल्य जनमानसावर आणि ख्रिश्चन चर्च धर्मियांवर होते. अ‍ॅरिस्टॉटलच्या मतांना पूरक असे, पृथ्वी केंद्रस्थानी मानून पृथ्वीभोवती आठ वर्तुळातून फिरणाऱ्या ग्रहांचे मॉडेल टॉलेमीने मांडले. ज्यात सूर्याचाही समावेश होता. या आठ वर्तुळाकार कक्षांच्या पलीकडे स्वर्ग आणि नरक या संकल्पनांनाही जागा असल्याने हे मॉडेल चर्चनेही ग्राह्य मानले.
या विचारांच्या पलीकडे जाऊन पृथ्वी, सूर्य, ग्रह यांच्या भ्रमणविषयी कोणी अन्य विचार मांडल्यास त्याला चर्चकडून विरोध केला जाऊ लागला. नुसता तात्त्विक विरोध न करता मोठय़ा प्रमाणावर शारीरिक छळ केला जात असे, त्यामुळेच अन्य विचार पुढे येऊ शकले नाहीत. सूर्य केंद्रस्थानी आणि पृथ्वीसह अन्य ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत, असे ग्रहांचे मॉडेल कोपर्निकसने मांडायचा प्रयत्न केला, पण त्याचे विचार ऐकून धार्मिक मंडळींनी त्याची टिंगल केली, प्रखर विरोध केला. बरीच वर्षे त्याने आपले विचार प्रकाशित केलेच नाहीत. आयुष्याच्या शेवटी ‘ऑन दी रिव्होल्युशन्स’ या पुस्तकाच्या माध्यमातून कोपर्निकसच्या मरणोपरांत ते मॉडेल लोकांपर्यंत आले.
गॅलिलिओच्या जन्माआधी विश्वाचा जन्म, रचना, ग्रह, तारे, पृथ्वी, सूर्य यांचा परस्पर संबंध याविषयी बऱ्याच वेगवेगळ्या संकल्पना अस्तित्वात होत्या. लंबकाचा शोध गॅलिलिओने लावला आणि त्या लंबकाच्या तत्त्वाच्या आधारेच पुढे ह्युजेन्सने पहिले घडय़ाळ बनविले. सन १६०९ मध्ये डचांनी निर्माण केलेल्या दुर्बिणीपेक्षा कितीतरी शक्तिशाली दुर्बिणीची निर्मिती गॅलिलिओने केली आणि महत्त्वाचे म्हणजे त्याचा उपयोग केवळ दूरच्या जहाजांना बघण्यासाठी न करता त्याने ती आकाशातील ग्रह, तारे इ.चे निरीक्षण करण्यासाठी आकाशाकडे वळविली आणि त्यामुळेच सर्व विज्ञानाचा, खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला. या दुर्बिणीतून त्याने चंद्रावरचे डोंगर, ज्वालामुखीची विवरे बघितली. पुढे १६१० साली गुरू या ग्रहाचे निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे उपग्रह, चंद्र शोधून काढले. शुक्रतारा (ग्रह) आणि त्याच्या ‘कलां’चाही अभ्यास केला. त्यावर त्याने ‘दि स्टारी मेसेंजर’ हे पुस्तक लिहिले. त्याच्या निरीक्षणामुळेच त्याला कोपर्निकसने मांडलेले ‘पृथ्वी केंद्रस्थानी नसून सूर्य केंद्रस्थानी आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ हे विचार पटायला लागले. वरील पुस्तकामुळे गॅलिलिओ रातोरात हीरो बनला. अर्थातच अ‍ॅरिस्टॉटलच्या चर्चने मान्य केलेल्या मतांविरोधात गॅलिलिओचे विचार असल्याने त्याला चर्चचा फार मोठा विरोध सहन करावा लागला.
गंमत म्हणजे गॅलिलिओच्या मृत्यूनंतर ३४० वर्षांंनी म्हणजे १९८२ साली सूर्य आणि पृथ्वी यांच्यापैकी कोण कुणाभोवती फिरतो, याविषयी जुनी केस चर्चमध्ये पुन्हा उभी राहिली. त्यावर १० वर्षे उलटसुलट वाद-प्रतिवाद होऊन पुराव्यांची छाननी होऊन पोप पॉल दुसरे यांनी गॅलिलिओला चांगली वागणूक मिळाली नाही आणि पृथ्वीच सूर्याभोवती फिरते हे मान्य केले आणि गॅलिलिओला खऱ्या अर्थाने ३५० वर्षांंनी न्याय मिळाला. १६०९ साली गॅलिलिओने ज्या पद्धतीने दुर्बिणीच्या सहाय्याने ग्रहगोलाचे/खगोलाचे निरीक्षण केले तो खगोलशास्त्रातला एक फारच मोठा टप्पा मानला जातो. २००९ मध्ये ४०० वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणूनच सन २००९ हे ‘आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष’ साजरे केले जात आहे. त्यानिमित्ताने जगभरातील जवळपास सर्व देशांनी आपापल्या देशात सर्वसामान्यांना खगोलशास्त्राची ओळख होईल, असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करावयाचे ठरविले आहे.
भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांसाठी प्रमुख समन्वयक म्हणून जबाबदारी पुणे येथील आयुका \(कवउअअ) या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या संस्थेकडे आहे.
मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागानेदेखील ‘आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष २००९’ निमित्ताने वर्षभरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. वर्षभरातील विविध कार्यक्रमांची सुरुवात ११ जानेवारी २००९ ला डॉ. जयंतराव नारळीकर यांच्या ‘खगोलशास्त्राच्या अभ्यासाची आवश्यकता?’ आणि प्रा. मोहनलाल आपटे यांच्या ‘अद्भूत विश्व’ या विषयांवरील (दृकश्राव्य माध्यमाद्वारे) व्याख्यानाने होणार आहे. वर्षभरातील कार्यक्रमांचा उद्घाटन सोहळा गडकरी रंगायतन नाटय़गृहात दु. १२ ते ३ या वेळात असून, कुमार केतकर यांच्या हस्ते महापौर स्मिता इंदुलकर तसेच आयुक्त नंजकुमार जंत्रे आणि मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर देवधर यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.
ज्या पृथ्वी नावाच्या ग्रहावर आपण राहतो ती सूर्याच्या परिवाराचा घटक आहे. असे अब्जावधी सूर्य (तारे) आपल्या कुटुंब कबिल्यासहित किंवा एकेकटय़ाने या आपल्या आकाशगंगेत नांदत आहेत आणि पुन्हा अशा अब्जावधी आकाशगंगा या अवकाशात अस्तित्वात आहेत, ज्या आपणास दिसू शकतात, ज्यांचे अस्तित्व जाणवते, त्यावरून हे ज्ञात विश्व किती मोठे आहे याचा आपणथोडाफार अंदाज बांधू शकतो. या दृश्य कक्षेच्या पलीकडे काय? आणि किती प्रमाणावर? आणि कोणत्या दिशेला हे विश्व पसरलेले असेल? प्रत्यक्षात त्याचा आकार नेमका केवढा असेल? असे म्हटले जाते की, प्रत्यक्ष दृश्य स्वरूपात असलेले वस्तुमान विश्वाच्या एकूण वस्तुमानाच्या फक्त पाच ते सहा टक्के एवढेच आहे. जे दिसत नाही, परंतु अस्तित्वात आहे, अशा ९४ ते ९५ टक्के वस्तुमानाचे काय?
या आणि अशा अवकाशशास्त्राशी निगडित प्रचंड गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी घडणाऱ्या घडामोडी यांची माहिती करून घेण्यासाठी आकाशातील ग्रह- तारे यांचा अभ्यास करताना जे शोध लागलेत, त्याचा मानवाच्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग झाला, हे समजून घेण्यासाठी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंतराव नारळीकरांशिवाय योग्य व्यक्ती दुसरी कुणी असूच शकणार नाही याची खात्री आहे.
आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष २००९ निमित्ताने ठाणे विभाग वर्षभरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.
डॉ. ह. शा. भानुशाली
अध्यक्ष
मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग