Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

ठाणे-तुर्भे- नेरुळ उपनगरीय रेल्वे सेवेचे उद्घाटन : रेल्वे टर्मिनस, जिल्हा विभाजनासाठी लवकरच बैठक
 
ठाणे/प्रतिनिधी
आजच्या कार्यक्रमात ठाणे- नेरुळ उपनगरीय सेवा सुरू करण्याचे श्रेय लाटण्याची कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील चढाओढ पाहण्यासारखी होती. या चढाओढीपासून मात्र भाजप दूर होता. कारण त्यांना कार्यक्रमासाठी बोलाविण्यात आलेच नाही. प्रवाशांच्या प्रश्नासाठी अनेकदा आंदोलने करणारे आमदार संजय केळकर यांना रेल्वे आणि सिडको विसरली.
ठाणे, नवी मुंबई हे विकासाचे केंद्र बनले असून तेथील रेल्वेला जोडणारे अंतर्गत रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून राज्य शासन पुरेसा निधी उपलब्ध करेल, तसेच मेंटल रुग्णालयाजवळ रेल्वे टर्मिनस, ठाणे जिल्हा विभाजन आणि इतर विकास कामांच्या धोरणात्मक निर्णयासाठी लवकरच बैठक बोलावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज ठाणेकरांना दिले.
रेल्वे आणि सिडकोच्या भागीदारीतून सुरू झालेल्या ठाणे-तुर्भे- नेरुळ या उपनगरीय रेल्वे सेवेला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज हिरवा झेंडा दाखविला. मुख्यमंत्री म्हणून ठाणेकरांनी केलेल्या सर्वपक्षीय स्वागताची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील विकास कामांसाठी भरघोस आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. पालकमंत्री गणेश नाईक, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार एकनाथ शिंदे आणि खासदार आनंद परांजपे यांनी केलेल्या मागण्यांना प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यातील विकासकामांबाबत धोरणात्मक निर्णय, रेल्वे सेवेबरोबर त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास आणि मेंटल हॉस्पिटलजवळील १० एकर जागेत रेल्वे टर्मिनल्स उभारण्यासंबंधी बैठक बोलविण्यास सहमती दर्शविली.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वेला जोडणारे अंतर्गत रस्ते आणि मेंटल हॉस्पिटलजवळ टर्मिनल्स उभारून मेट्रो अथवा मोनो रेल ही बोरीवलीपर्यंत नेण्याची मागणी केली. पालकमंत्र्यांनी सीएसटी ते ठाणे-वाशी ते सीएसटी अशी रिंग रेल्वे आणि उपसभापती डावखरे यांनी कल्याण-अहमदनगर रेल्वे व जिल्हा विभाजनाचा प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले. ठाण्यातील विकासकामांच्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांकडे आमदार एकनाथ शिंदे यांनी वेळ मागितली आणि खासदार आनंद परांजपे यांनी ठाण्याला रेल्वे टर्मिनल्स बनविण्याचा आग्रह धरला.