Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

आदिवासी बजेटवरील डाका थांबवा-आंबेडकर
 
ठाणे/प्रतिनिधी
आदिवासी नक्षलवादी होऊ नयेत असे सरकारला वाटत असेल, तर त्यांनी या आदिवासींचे शोषण थांबवावे. त्यांच्या बजेटवर डाका टाकण्याचे चक्र रोखावे अन्यथा वाघाबरोबर लढाई करणाऱ्या या आदिवासीला सरकारमधल्या माणसाशी लढाई करायला वेळ लागणार नाही, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
जव्हार येथील आदिवासींच्या सभेत ते बोलत होते. भारिप बहुजन महासंघ आणि आदिवासी अस्मिता संघटनेच्या वतीने या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. जेव्हा आदिवासींवर सरकारी अत्याचार होतात, त्यावेळी अशा पीडित आदिवासींच्या हाती बंदूक येते. १९६२-६५ चा सरकारी अहवाल हेच सांगतो आहे. त्यामुळे अहवालात सांगितलेली ही परिस्थिती येऊ नये, म्हणून प्रशासन आणि सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी या जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांबाबत बोलताना ते म्हणाले, अशी अतिक्रमणे सरकारने अर्ज मागवून कायम केली. मात्र ठाणे जिल्ह्यात या समितीने एकही अर्ज मागविला नाही. परिणामी आदिवासींच्या नावावर सरकारी जमिनी होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे इथल्या आदिवासींना संरक्षित करायचे असेल तर त्यांनी अतिक्रमण केलेल्या जमिनी सरकारने त्वरित त्यांच्या नावावर कराव्यात. राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, प्रांतवाद निर्माण करणाऱ्या अशा माणसाची जागा लोकांमध्ये नाही तर कारागृहात आहे. आम्हाला देश एकत्रच ठेवायचा आहे. तो प्रांतवादाच्या नावाने तोडायचा नाही. त्यामुळे भविष्यात अशी विचारधारा असलेल्या पक्षाशी आपला पक्ष कधीही युती करणार नाही. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी शिक्षण सम्राटांवर प्रखर टीका करून अगोदर अशा संस्थांनांमध्ये या कथित सम्राटांनी आरक्षण लागू करावे,असा सल्ला दिला.
यावेळी अ‍ॅड. आंबेडकर यांची यशवंतराव मुकणे महाराज पुतळ्यापासून ते जुन्या राजवाडय़ापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आदिवासींची ५० कलापथके सहभागी झाली. जाहीर सभेत आदिवासी अस्मिता संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पुपाणे, प्रदेश अध्यक्ष हनुमंत उपरे, प्रवक्ते बाबुराव पोटभरे, यशवंतराव गायकवाड, ठाणे शहर अध्यक्ष विजय घाटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन दिलीप कोठुरकर यांनी केले.