Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

ठाण्यातील वकिलांचे आंदोलन मागे
 
ठाणे/प्रतिनिधी
ठाणे जिल्हा न्यायालयाच्या विभाजनाविरुद्ध ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयातील वकिलांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरू केलेले कामबंद आंदोलन शुक्रवारी दुपारी मागे घेतले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांनी विभाजन करण्याच्या निर्णयावर तूर्तास स्थगिती देत असल्याचे आश्वासन वकील संघटनेला दिल्याने आजपासून न्यायालयीन कामकाज पुन्हा सुरू केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. गजानन चव्हाण यांनी दिली.
ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे विभाजन करून भिवंडी येथे अति. जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. भिवंडीतील वकील संघटनेतर्फे काही वर्षांंपासून तशी मागणी केली जात आहे.
या निर्णयाला ठाणे जिल्हा वकील संघटनेने तीव्र विरोध केला आहे. यापूर्वी दोनवेळा जिल्हा न्यायालयाचे विभाजन करण्यात आले. आता पुन्हा तिसऱ्यांदा त्याचे विभाजन आम्ही करू देणार नाही. विभाजनानंतर जिल्हा न्यायालयाचे अस्तित्व नष्ट होईल, अशी भीती संघटनेने व्यक्त करून, त्यास विरोध करण्यासाठी ३ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. अ‍ॅड. चव्हाण, सेक्रेटरी मदन ठाकूर, अ‍ॅड. शैलेश सडेकर, अ‍ॅड. प्रशांत पांचाक्षरी व इतरांनी आज सकाळी मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांची भेट घेतली. या चर्चेस न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांनी वकील संघटनेची बाजू ऐकून घेतली. नंतर विभाजनाच्या निर्णयाला स्थगिती देऊन त्याची कार्यवाही सध्या न करण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात पुढील चर्चा येत्या सोमवारी सायंकाळी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.