Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

विकास प्रकल्पांना मंजुरी द्या; सेनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे
 
ठाणे/प्रतिनिधी
ठाणे महापालिका क्षेत्राचे झपाटय़ाने नागरीकरण होत असून त्याचा पायाभूत सुविधांवर गंभीर परिणाम होत आहे. ही अनैसर्गिक वाढ लक्षात घेता त्याचा भार एकटी महापालिका सहन करू शकत नाही. त्यामुळे उड्डाण पूल, मलनि:सारण, पाणीपुरवठा व वाहतूक सुविधा या संदर्भातील अनेक महत्त्वाचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याने त्यास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी ठाणे जिल्हा शिवसेनेतर्फे आमदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भेटून केली.
आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची ठाण्यात भेट घेऊन त्यांच्याशी ठाणे शहराच्या विविध विकास प्रस्तावांसंदर्भात चर्चा केली. शासनाने या प्रस्तावांचा सहानुभूतीने विचार करून त्यास मंजुरी द्यावी, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
ठाणे शहरातून नाशिक, नवी मुंबई व गुजरातकडे येणाऱ्या-जाणाऱ्या अवजड वाहनांची प्रचंड संख्या आहे. त्याचा भार वाहण्यासाठी सध्याचे रस्ते अपुरे आहेत. गोल्डन डाईज नाका ते घोडबंदर रोड या मार्गावरील माजिवडा व कापूरबावडी येथील उड्डाण पूल वाहतूक कोंडीवरील उपाय म्हणून आवश्यक आहे. त्यासाठी आतापर्यंत अनेक सव्‍‌र्हे होऊन वेळोवेळी तरतुदी झाल्याचे ऐकिवात आहे, पण दुर्दैवाने अद्याप कामाला सुरुवात नाही. शहरातही काही उड्डाण पूल प्रस्तावित आहेत. ही सर्व कामे जातीने लक्ष घालून मार्गी लावावीत, असे साकडे यावेळी मुख्यमंत्र्यांना घालण्यात आले.नागरिकांना उत्तम वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी, रस्त्यावरील वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी व्हावे, या दृष्टिकोनातून मोनो रेलचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता, तसेच ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेला सक्षम करण्यासाठी बस खरेदी करणे अत्यावश्यक असून त्यासाठी एमएसआरडीसी वा तत्सम प्राधिकरणाकडून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी पाठपुरावा करीत असून त्यात मध्यस्थी करावी, अशी विनंतीही करण्यात आली.
ठाणे शहराला पुढील २५ वर्षांंत लागणाऱ्या पाणीपुरवठय़ाची गरज लक्षात घेता नियोजित शाई धरणाचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. ठाणे म. पा.चा अर्थसंकल्प त्यासाठी अपुरा असल्याने शासनाकडून निधी उपलब्ध होणे अनिवार्य असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणण्यात आले.