Leading International Marathi News Daily                                  शनिवार, १० जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

‘पुलोत्सवात’ अजित प्रधान यांच्या ध्वनिमुद्रिकांचा चालता बोलता इतिहास
 
डोंबिवली/प्रतिनिधी -रिमिक्सच्या जमान्यात धुंद झालेल्या नवतरुण पिढीला आपली उज्ज्वल जुनी संगीत परंपरा कशी होती, याची माहिती देणारे अनोखे प्रदर्शन पुलोत्सवात ध्वनिमुद्रिकांचे संग्राहक अजित प्रधान यांनी सुरू केले आहे. दोन दिवस हे प्रदर्शन पाहण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. याशिवाय जुन्या जमान्यातील गाणी जुन्या साधनांवर ऐकण्याची हौस पुरी करता येणार आहे.
अजित प्रधान एक स्वेच्छानिवृत्ती घेतलेला बँक अधिकारी. लहानपणापासून त्यांना संगीत विषयाची आवड होती. जुन्या जमान्यातील रेकॉर्ड प्लेअर कशा होत्या, त्यामधील संगीत कसे होते, याविषयी अजित यांच्या मनात सतत उत्सुकता ताणलेली असायची. संगीताची ही सर्व जुनी साधने त्यांनी बाजारातून, मित्र-नातेवाईकांकडून, चोरबाजारातून मिळवली. १९४० पासून १९९७ पर्यंतच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी जतन करून ठेवल्या आहेत. असा सुमारे साडे तीन हजार ध्वनिमुद्रिकांचा संग्रह प्रधान यांच्या खजिन्यात आहे.
हा खजिना पुलोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना पाहण्यास मिळणार आहे. सावित्रीबाई फुले रंगमंदिरातील कलादालनामध्ये या संगीतमय खजिन्याचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ग्रामोफोन, रेकॉर्डप्लेअर, टेपरेकॉर्डर, ७८ आरपीएम, एलपी संग्रहात आहे. ओ. पी. नय्यर यांच्या गीतांचा सर्वाधिक संग्रह, शंकर जयकिशन, सी. रामचंद्रन, आर. डी. बर्मन, एस. डी. बर्मन, मदन मोहन, लता मंगेशकर यांच्या दोन हजार गीतांचा संग्रह, याशिवाय अनेक दिग्गज गायकांचा संग्रह प्रधान यांच्या खजिन्यात आहे. अनेक दिग्गज गायक प्रधान यांच्या घरी येऊन गेले आहेत. हाताने चक्री फिरवून गाणे ऐकताना मिळणारा आनंद हदयाचे ठोके चुकवतो. रिमिक्सच्या जमान्यात आपण यापूर्वी कोठे होतो, असा प्रश्न ही गाणी ऐकताना पडतो.