Leading International Marathi News Daily                                 शनिवार, १० जानेवारी २००९

रांगा सौख्यभरे!
ठाणे/प्रतिनिधी : वाहतूकदारांचा संप आणि पेट्रोलियम कंपन्यांतील अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने ठाणे जिल्ह्यातील डिझेल, पेट्रोल व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई या शहरी भागातील सर्वच पेट्रोलपंपांवर पेट्रोलसाठी एक ते दीड कि.मी. लांबीच्या रांगा लागल्या. अन्नधान्यातही मोठी तूट होईल, अशी भीती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका सूत्राने व्यक्त केली. ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागात ८६, तर ग्रामीण भागात एकूण ९६ पेट्रोलपंप सध्या कार्यरत आहेत. त्यांना दोन दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचा पुरवठा झाला नसल्याने शहरी भागातील ७५ आणि ग्रामीण भागातील १४ पेट्रोलपंपांवरील इंधनात १०० टक्के खडखडाट झाल्याने ते पूर्णत: बंद पडले आहेत. ज्या पेट्रोलपंपावर पेट्रोल व डिझेलचा काही प्रमाणात साठा शिल्लक आहे, तेथे इंधन भरण्यासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासूनच दुचाकी व चार चाकी वाहनांच्या प्रचंड लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्यावरील ८० टक्के रिक्षा रस्त्याच्या कडेला इंधनाअभावी बंद करून ठेवल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.

अधिकृत रेती परवान्याच्या प्रतीक्षेत रेती उत्पादक
कल्याण/प्रतिनिधी

गेल्या पाच महिन्यापासून रेती उत्पादक मालकांना शासनाने रेती काढण्याचे अधिकृत परवाने दिले नाहीत. त्यामुळे भांडवली खर्चासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकू लागल्याने रेती उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच, परवाने मिळत नसल्याने या व्यवसायातील हजारो कामगारांना काम नसल्याने त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. कोकण किनारपट्टीवरील नवी मुंबई, रेवदंडा, चिपळूण, सावित्री नदी या ठिकाणी खोल समुद्र, नदीच्या पात्रात जाऊन रेती काढण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून काही रेती उत्पादक शासनाचा अधिकृत परवाना घेऊन करत आहेत. दरवर्षी ऑगस्टमध्ये रेती उत्पादकांच्या परवान्याचे नूतनीकरण केले जाते. परंतु, या वर्षी रेती उत्पादकांना नव्याने परवाने देण्यात आले नाहीत.

पाटकर विद्यालयाने उभा केला क्रीडा क्षेत्रातला डोंबिवली पॅटर्न
प्रतिनिधी : क्रीडा क्षेत्रातला डोंबिवली पॅटर्न तयार करणारी, डोंबिवलीचा अभिमानबिंदू मानली जाणारी आणि एकाच वर्षांत राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार व बॅडमिंटनमधील जागतिक दर्जाचे यश संपादन करणारी माजी विद्यार्थीनींची जोडगोळी ज्या शाळेला लाभली, त्या शाळेने विद्यार्थी-पालक व शिक्षक यांचे कौटुंबिक नात्यांचे आदर्श उदाहरण उभे केलेले पहायला मिळणे हा देवदुर्लभ योग आहे असे उदगार लोकसत्ताचे निवासी संपादक सुधीर जोगळेकर यांनी नुकतेच येथे काढले. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या डोंबिवलीतील चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. शेक्षणिक तसेच क्रीडा व इतर कलागुणांमध्ये विशेष नैपुण्य दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सन्मानचिन्ह व विशेष पुरस्कृत रोख पारितेषिके देऊन गौरव केल्यानंतर ते बोलत होते. या प्रसंगी शाळेच्या माजी विद्यार्थिनी रुणिता मोघे व कादंबरी छेडा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

दुर्बिणीच्या शोधाची कथा
१६०९ मध्ये गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला. त्याला सन २००९ मध्ये ४०० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने कल्ल३ी१ल्लं३्रल्लं’ अ२३१ल्ल्रेूं’ वल्ल्रल्ल आणि वठएरउड ने सन २००९ हे ‘आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष २००९’ म्हणून संपूर्ण जगभर साजरे करावयाचे ठरविलेले आहे. ठाणे शाखेने यानिमित्त रविवारी ११ जानेवारी रोजी गडकरी रंगायतनमध्ये ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर आणि खगोलतज्ज्ञ प्रा. मोहन आपटे यांची व्याख्याने आयोजित केली आहेत. दोन सत्रात पार पडणाऱ्या या कार्यक्रमात खगोलविषयक माहितीपटही दाखविले जाणार आहेत. सकाळी सव्वा आठ ते दुपारी तीन यावेळेत दोन सत्रात हा कार्यक्रम होणार असून प्रवेश विनामूल्य आहे. प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्रवेश मिळेल. यानिमित्त खगोल विज्ञानातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आढावा घेणारा हा लेख..ख्रि स्तपूर्व ३८४ साली जन्मलेल्या अ‍ॅरिस्टॉटलपासून किंवा त्याच्याही थोडय़ा आधीपासून मान्यता पावलेला, पृथ्वीचा गोलाकार गोळा हा विश्वाच्या केंद्रस्थानी असून, सूर्य, ग्रह व तारे हे सर्व तिच्याभोवती गोलाकार कक्षेत भ्रमण करतात, याच मताचे प्राबल्य जनमानसावर आणि ख्रिश्चन चर्च धर्मियांवर होते. अ‍ॅरिस्टॉटलच्या मतांना पूरक असे, पृथ्वी केंद्रस्थानी मानून पृथ्वीभोवती आठ वर्तुळातून फिरणाऱ्या ग्रहांचे मॉडेल टॉलेमीने मांडले. ज्यात सूर्याचाही समावेश होता.

जिल्हा नियोजन समिती, महापालिका मतदारसंघात समझोता
ठाणे/प्रतिनिधी

संपूर्ण जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत महापालिका मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करण्यात सर्वच राजकीय पक्षांना यश आले, मात्र वसई विकास मंडळाच्या आडमुठय़ा धोरणामुळे जिल्हा परिषद गटात, तसेच नगरपालिका गटात समझोता होऊ शकला नसल्याने निवडणूक अटळ ठरली आहे. ठाणे जिल्हा नियोजन समितीसाठी २३ जानेवारीला निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी महापालिका गटातील २४ जागांवर सेना-भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात समझोता झाला. गेले दोन दिवस याबाबत प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू होत्या. अखेर युती-१०, राष्ट्रवादी-७, काँग्रेस- ६ असा समझोता झाला. त्यानुसार सर्व पक्षांनी आपल्या अतिरिक्त उमेदवारांना माघार घ्यायला लावली. त्यानुसार २४ जागांसाठी २४ उमेदवार उरले असल्याने, बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीचे देवराम भोईर, अपर्णा साळवी, विष्णू गायकवाड, तात्या माने, सुजाता पाटील, मिलिंद पाटणकर यांच्यासह प्रकाश तरे, संजय पाटील, हरिश्चंद्र पाटील, मंगेश गायकर, सीमा सावंत आदी बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्हा परिषद गटातील १२ व नगरपालिकेच्या जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये समझोता होऊ न शकल्याने आता २३ तारखेला निवडणूक होईल.

आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचा समारोप
कल्याण/प्रतिनिधी

कल्याण- डोंबिवली पालिकेच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचा समारोप यशस्वी विद्यार्थ्यांंना पारितोषिके देऊन झाला. बक्षीसपात्र विद्यार्थी पारितोषिक स्वीकारल्यानंतर मैदानात आनंदोत्सव साजरा करीत होते. या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आमदार रामनाथ मोते, महापौर रमेश जाधव, आयुक्त गोविंद राठोड, सभापती संदीप देसाई, उपसभापती अनंत गवळी, प्रशासनाधिकारी जी. व्ही. कुलकर्णी, नगरेसवक अनिल पंडित, उमेश बोरगावकर आदी उपस्थित होते. ७० शाळांमधील पाच हजार विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते. चौदा गटांमध्ये या स्पर्धा झाल्या. खो खो, लंगडी, कबड्डी, लांब उडी, गोळाफेक, भालाफेक, चेंडूफेक प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शिक्षक अजयकुमार जोगी, निलेश वाबळे, दिगंबर नवाळे, संध्या चव्हाण, कल्पना पाटील, आर. टी. जगदाळे यांनी प्रयत्न केले.

‘वृत्तपत्रांनी नव्या पिढीला
मार्गदर्शन करावे’

बदलापूर/वार्ताहर : प्रत्येक क्षेत्रात असणारी स्पर्धात्मक चढाओढ वृत्तपत्र क्षेत्रामध्येही असून, मराठी वृत्तपत्र वाचणाऱ्या वाचकांची संख्याही रोडावली आहे. स्पर्धेतील आव्हानांना तोंड देण्यासाठी १५ ते २० वयोगटातील मुलांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा दाखविण्यासाठी वृत्तपत्रांनी आणि पत्रकारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांनी व्यक्त केले.
अंबरनाथ रोटरी क्लबतर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.वडवली येथील रोटरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात क्लबचे अध्यक्ष अजय डालमिया यांनी प्रास्ताविक, महोत्सव सप्ताह समितीचे अध्यक्ष हेमंत गोगटे यांनी सूत्रसंचालन आणि सतीश जगताप यांनी आभार मानले. एक्स्प्रेस वृत्तसमूहातर्फे उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल छायाचित्रकार संतोष शिंदे यांच्यासह शहरातील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. साप्ताहिक आहुतीच्या ४३व्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

ठाण्यामध्ये अतिरुद्र महाअनुष्ठान
ठाणे/प्रतिनिधी

श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम् दक्षिणाम्नाय शारदापीठम् शृंगेरी यांनी ठाणे येथे घंटाळी मैदानावर अतिरुद्र महाअनुष्ठान आयोजित केले आहे. नुकतेच त्याचे उद्घाटन झाले. शंकराचार्याचे प्रतिनिधी वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले (सातारा) हे या महानुष्ठानांचे निमंत्रक व मुख्य कार्यकारी संयोजक आहेत. ठाण्याचे नगरसेवक विलास सामंत व वेदमूर्ती हेमंत वीरकर (गुरुजी) यांचे या महाअनुष्ठानाला मोलाचे सहकार्य लाभले आहे. दररोज सकाळी १२१ ब्राह्मण सामुदायिकरीत्या रुद्रपठण करतात. सकाळी ७ ते दुपारी दीडपर्यंत ११ वेळा असे पठण होते व एक महारुद्र पूर्ण होतो, असे ११ दिवस महारुद्र केल्यावर एक अतिरुद्र पूर्ण होतो. ११ जानेवारी या दिवशी हा अतिरुद्र पूर्ण होईल व सोमवार, १२ जानेवारी या दिवशी पूर्णाहुती होऊन यज्ञकर्म समाप्ती होणार आहे.

शाळेच्या संरक्षक भिंतीस भगदाड; विद्यार्थ्यांमध्ये घबराट
भिवंडी/वार्ताहर

पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शेठ जुगीलाल पोदार इंग्लिश मीडियम स्कूल, विद्याश्रम मराठी शाळा व रात्र विद्यालय, भिवंडी या चार शाखांमध्ये बालवाडीपासून इयत्ता बारावीपर्यंतचे सुमारे ७५०० विद्यार्थी शिकत असून, शाळेच्या संरक्षक भिंतीस पटेल कंपाऊंड येथील काही समाज कंटकांनी भगदाड पाडल्याने विद्यार्थी व पालक वर्गामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. शाळेच्या प्राचार्या अरुणा जाधव यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पद्मश्री अण्णासाहेब जाधव या संस्थेच्या धामणकर नाका परिसरात बालवाडीपासून पदव्युत्तर शिक्षण संस्था असून, या शिक्षण संस्थेमध्ये सुमारे १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आवाराभोवती आठ फुटी संरक्षक भिंत आहे. पटेल कंपाऊंड येथील काही समाज कंटकांनी या भिंतीस भगदाड पाडल्याने पुतळ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या संरक्षणाचा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. या पटेल कंपाऊंडमध्ये अनेक गुन्हेगार व परप्रांतीय नागरिक राहत असल्याने परिसराचे संरक्षण करण्यासाठी नेमलेल्या सुरक्षारक्षकांना वारंवार दमबाजी केली जात आहे. संस्थेच्या संरक्षणासाठी पोलीस खात्याने तात्काळ उपाययोजना न आखल्यास अनावस्था प्रसंग ओढवू शकतो, अशी भीती व्यक्त करून संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी संस्थेने केली आहे.