Leading International Marathi News Daily                                 शनिवार, १० जानेवारी २००९
विविध

अजून यौवनात मी..
लंडन ९ जानेवारी/पीटीआय

माणसाचे वय वाढते तसे वार्धक्याच्या पाऊलखुणा त्याच्या शरीरावर उमटायला लागतात , चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. त्वचा ओघळायला लागते पण हे सगळे घडते ते काही जैविक क्रियांमुळे. गेल्या अनेक वर्षांपासून वैज्ञानिक वार्धक्याचे हे कोडे सोडवण्याच्या प्रयत्नात आहेत. अगदी अलीकडेच वैज्ञानिकांनी वार्धक्याची प्रक्रिया नेमकी कशी घडते याचे रहस्य उलगडले असून लवकरच चिरयौवन मिळवण्यासाठी एखादे रामबाण औषधही शोधले जाण्याची शक्यता आहे.

सजीवांच्या उत्पत्तीस कारण ठरू शकणारा रेणू प्रयोगशाळेत विकसित करण्यात यश
वॉशिंग्टन ९ जानेवारी/पीटीआय

ज्याच्यातून सजीवाची निर्मिती प्रक्रिया घडू शकेल असा कृत्रिम रेणू वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत तयार केला आहे. आपल्याच आणखी आवृत्त्या तयार करण्याचा म्हणजे सेल्फ रेप्लीकेशनचा गुणधर्म त्याच्यात असून त्यामुळे पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती कशी झाली असावी यावर नवा प्रकाश पडणार आहे. स्क्रीप्स रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या पथकाने आरएनए म्हणजे रायबोन्युक्लिईक आम्लापासून एक रसायन मिळवले आहे.

केंद्रीय विद्यापीठे स्थापन करण्यासाठी अध्यादेश जारी करणार-चिदंबरम
नवी दिल्ली, ९ जानेवारी/पीटीआय

देशात बारा नवीन केंद्रीय विद्यापीठे स्थापन करण्याबाबत सरकार लवकरच अध्यादेश जारी करणार आहे. सध्याच्या चार केंद्रीय विद्यापीठांचा दर्जा उंचावण्याचाही सरकारचा प्रयत्न राहणार आहे. नवीन केंद्रीय विद्यापीठे बिहार, गुजरात, हरयाना, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, ओरिसा, पंजाब , राजस्थान व तामिळनाडू या राज्यात केंद्रीय विद्यापीठे स्थापन करण्यात येणार आहेत. गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अगोदरच केंद्रीय विद्यापीठांच्या स्थापनेची घोषणा केली आहे, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. अल्पसंख्याक शिक्षण संस्थांपुढे असलेले प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने संबंधित कायद्यात दुरूस्ती करण्याचे ठरवले असून त्यात अल्पसंख्याक शिक्षण संस्था राष्ट्रीय आयोगाला जादा अधिकार देण्यात येणार आहेत. दुसऱ्या एका निर्णयानुसार सरकारने नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांसाठी २५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे त्यामुळे या संस्थांना त्यांच्या दायित्वातून मुक्त होता येईल. आयडीबीआयचे स्ट्रेस्ड अ‍ॅसेटस ताब्यात घेण्यासाठी स्ट्रेस्ड अ‍ॅसेटस स्टॅबिलायझेशन निधीही स्थापन करण्यात आला आहे.

कराचीत झोपडय़ांना आग लागून ३८ मृत्युमुखी
कराची, ९ जानेवारी/ए.एफ.पी.

कराची शहरातील झोपडय़ांना आज सकाळी लागलेल्या आगीमध्ये ३८ नागरिकांचा मृत्यू झाला असून अन्य २५ जण जखमी झाले आहेत. या आगीत अनेक झोपडय़ा जळून खाक झाल्या असून मृतांमध्ये १५ लहान मुले व १२ महिलांचा समावेश असल्याची माहिती पाकिस्तानचे सिंध प्रांताचे आरोग्य मंत्री साघीर अहमद यांनी दिली. मध्यरात्रीच्या सुमारास वीजेची तार झोपडय़ांवर कोसळली आणि त्यातून ही आग लागली. तार कोसळली तेव्हा अनेकजण झोपेतच असल्याने प्राणहानी अधिक प्रमाणात झाल्याचेही अहमद यांनी सांगितले. एकूण ३० झोपडय़ा या आगीमध्ये भस्मसात झाल्या असून २०० वर अधिक नागरिक बेघर झाले आहेत. काही जखमींना येथील अब्बासी शाहीद रग्णालयात दाखल करण्यात आले असून २५ जखमींपैकी १२ जणांची प्रकृती जबर भाजल्याने अत्यवस्थ असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.या आगीत येथील झोपडपट्टी विभाग बेचिराख झाला आहे.

फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्यास योग्य वातावरण निर्माण करण्याची गरज - ओमर अब्दुल्ला
जम्मू, ९ जानेवारी / पीटीआय

काश्मीर प्रश्न सुटण्यासाठी फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण होण्याची गरज असून नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या संयुक्त सरकारला त्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागतील, असे मत जम्मू आणि काश्मिरचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सचिवालयात आयोजित केलेल्या त्यांच्या पहिल्यावहिल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीसंबंधी भाष्य करताना ते म्हणाले की, आपला शत्रू पाकिस्तान नसून तेथील अशांत परिस्थितीस कारणीभूत असणाऱ्या शक्ती आपल्या खऱ्या शत्रू आहेत. त्यामुळे सरसकट पूर्ण पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणणे चुकीचे ठरेल. मित्र हे बदलता येतील पण शेजारी बदलता येत नाहीत असे सांगून भारताबरोबर शांतता प्रस्थापित करण्यास उत्सुक असल्याच्याा पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी आणि पंतप्रधान गिलानी यांच्या वक्तव्याचा त्यांनी उल्लेख केला.
काश्मिर प्रश्न सुटण्यासाठी फुटीरतावाद्यांशी चर्चेसाठी योग्य वातावरण निर्माण करण्याची गरज असून हे राज्य सरकारचे काम आहे. माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी २००२ मध्ये असे वातावरण तयार करण्यात यश मिळवले होते. केंद्र सरकारही याबाबत अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले.

नंदीग्रामची जागा तृणमूलने हिसकावली
कोलकाता, ९ जानेवारी / पीटीआय

तृणमूल कॉंग्रेसने डाव्या आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या नंदीग्राममध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मोठय़ा फरकाने विजय मिळवत राजकीय खळबळ उडवून दिली. सुजापूर आणि पारा मतदासंघात मात्र कॉंग्रेस आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने जागा टिकवल्या आहेत. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या फिरोजा बेदी यांनी डाव्या आघाडीचा पाठिंबा असलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार पारामंदा भारती यांचा बहुरंगी लढतीत ३९ हजार ५५१ मतांच्या फरकांनी पराभव केला.

ओबामांचे प्रशासन ‘हमास’सोबत चर्चा सुरू करणार
लंडन, ९ जानेवारी/पी.टी.आय.

अमेरिकेमध्ये शासनाची सूत्रे हाती घेत असलेले अध्यक्ष बराक ओबामा यांचे प्रशासन दहशतवादी संघटना हमाससोबत बोलणी सुरू करण्याची शक्यता असल्याचे ब्रिटिश वृत्तपत्र गार्डियनने म्हटले आहे. इस्लामी संघटनांशी चर्चा तर साधायची, पण त्याचवेळेला हमासला वेगळे पाडायचे हे बुश यांचे धोरण ओबामा प्रशासन बदलण्याची शक्यता असल्याचेही या वर्तमानपत्राने नमूद केले आहे.
अमेरिकेच्या गुप्तचर एजन्सीतर्फे हमास संघटनेशी तशी थेट बोलणी करण्यासाठी सध्या संपर्क शोधले जात आहेत. ओबामा प्रशासनाने हे केल्यास ते मात्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या आजपर्यंतच्या धोरणाशी फारकत घेणारे ठरेल, असे मत व्यक्त होत आहे. अमेरिकेच्या गृह खात्याने २००६ मध्येच हमासला दहशतवादी संघटना ठरविले होते.

पॅन्थर्स पार्टीचे प्रमुख भीम सिंह यांचा राजीनामा
जम्मू, ९ जानेवारी/पी.टी.आय.

नुकत्याच झालेल्या जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत जम्मू आणि काश्मीर राष्ट्रीय पॅन्थर्स पार्टीचे अध्यक्ष व आमदार भीम सिंह यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा सादर केला आहे. राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्याकडे आपण आपला राजीनामा पाठविला आहे आणि उद्या आपण तो विधानसभेच्या अध्यक्षांना सादर करू, असे भीम सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधानसभा निवडणुकांमध्ये जी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरण्यात आली त्यामध्ये आधीच गैरप्रकार करून ठेवण्यात आले होते. त्यामुळे राजकीय पक्षांच्या नसलेल्या मतांना सुध्दा त्यात स्थान मिळाले. कित्येक पक्षांची मते जास्त भरली त्याचे हेच मुख्य कारण असल्याचा आरोप करून भीम सिंह यांनी ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नव्याने अस्तित्वात येत असलेले सरकार सर्वसामान्यांचे काहीही भले करू शकणार नाही अशीही टीका त्यांनी केली.

श्रीलंका लष्कराने ‘एलिफंट खिंड’ जिंकली
कोलंबो, ९ जानेवारी/पीटीआय

श्रीलंकेच्या सैन्य दलांनी आज एलिफंट खिंड हे जाफना द्वीपकल्पाचे प्रवेशद्वारच एलटीटीईच्या ताब्यातून हिसकावले आहे. तेथून एलटीटीईच्या तामिळ बंडखोरांना हुसकावण्यात सैन्याला यश आले आहे. गेल्याच आठवडय़ात किलीनोची हा सामरिक बालेकिल्ला एलटीटीईच्या हातून गेला होता. एलिफंट खिंड जिंकल्याची घोषणा अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी दूरध्वनीवरील भाषणात केली. त्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी हा दुसरा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आता एलिफंट खिंडीमधून तामिळ बंडखोरांना हुसकावण्यात आले असून सुरक्षा दलांनी कब्जा घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, एलिफंट खिंड आता सुरक्षा दलाच्या ताब्यात असून जाफना-कँडी रस्ता एलटीटीईच्या नियंत्रणातून मुक्त झाला आहे. कोलंबोत लोकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. सध्या येथे तुफान धुमश्चक्री सुरू आहे.