Leading International Marathi News Daily
रविवार, ११ जानेवारी २००९

जगभरातील हवामानात अनेक बदल अलीकडे जाणवू लागले आहेत. हे सारे ग्लोबल वॉर्मिगमुळे घडत असले तरी त्याचा आपल्या मान्सूनवर विपरित परिणाम होणार नाही, असे आतापर्यंत मानले जात होते. पण आता नव्या संशोधनानुसार ग्लोबल वॉर्मिगमुळे मान्सूनच्या प्रदेशात प्रदीर्घ दुष्काळ पडू शकेल, असा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळेच ग्लोबल वॉर्मिगकडे दुर्लक्ष केल्यास पुढील पिढय़ा आपल्याला मुळीच माफ करणार नाहीत.
महाराष्ट्रात गतवर्षी मध्येच दीर्घ विश्रांती घेऊन पुढे लांबलेला पावसाळा, नाताळ उजाडला तरी दडी मारून बसलेली थंडी.. हवामानाच्या या बदलांमुळे वनस्पतींचे वेळी-अवेळी बहरणे, प्राणी-पक्ष्यांच्या स्थलांतरांचे ठिकाण बदलणे असे परिणाम सध्या पाहायला मिळत आहेत. खरंतर हवामानात निसर्गत: असे चढउतार होतच असतात. पण अलीकडे होणारे बदल पाहून जनमानसात एक भावना वाढीस लागली आहे. ती म्हणजे- हवामानाच्या घटनांची शाश्वती आता पहिल्यासारखी उरलेली नाही. याउलट हवामानाचा लहरीपणा बराच वाढला आहे आणि तो अधिकाधिक वाढतच आहे. पूर्वी हवामानाचे ठराविक नियम होते. त्यात एक लय होती. पण आता ती लय हरवली आहे, असेही बोलले जात आहे. हवामान बदलाचे जागतिक पातळीवर परिणाम पाहायला मिळालेच आहेत, पण आता ते थेट आपल्या अंगणात येऊन पोहोचले आहेत. हे बदलत्या हवामानचक्राचे संकेत तर नाहीत ना, अशी शंकासुद्धा आता येऊ लागली आहे.
हवामान बदल झालेच तर जगाप्रमाणेच भारतावरही परिणाम होणारच. त्याचा सर्वात व्यापक परिणाम कशावर होणार? याचे पहिले उत्तर येते, आपल्या मान्सूनवर. हवामान बदलांचा मान्सूनच्या संदर्भात विचार केला तर त्यामुळे आपण फार घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण या विषयावरील आतापर्यंतचा अभ्यास व आकलनानुसार, ग्लोबल वॉर्मिगमुळे म्हणजेच जागतिक तापमानात वाढ झाली तर मान्सूनचा प्रभाव वाढण्याचीच शक्यता आहे.

 

मान्सूनचा प्रभाव हा समुद्र आणि जमिनीवरील तापमानातील फरकाचा परिणाम आहे. हा फरक जेवढा वाढेल, तेवढी ती स्थिती मान्सूनसाठी चांगलीच आहे.. ग्लोबल वॉर्मिगमुळे ही तफावत वाढेल, तसाच मान्सूनचा प्रभावसुद्धा. त्यामुळे भारतासह बऱ्याचशा आशिया खंडात मान्सूनच्या पावसाचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे बदल आपल्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे. यात एकच काय ती काळजीची बाब आहे. ती म्हणजे- पावसाचे पडणे काही प्रमाणात विषम असू शकते. म्हणजे काही भागात तो अधिक असेल, तर काही भागात कमी. असे असले तरी पाणी जास्त मिळणार असल्याने सध्या हे बदल तितके गांभीर्याने घेतले जात नाहीत. त्यामुळे भारतीयांनी जागतिक तापमानवाढीमुळे फारशी चिंता करण्याचे कारण नाही. असाच काहीसा सूर काही हवामानतज्ज्ञांकडून काढला जात आहे.
थोडक्यात काय, तर ग्लोबल वॉर्मिग हे मान्सूनच्या पथ्यावरच पडणार आहे, हा समज दृढ असतानाच आता एक नवे संशोधन पुढे आले आहे. त्याने या समजाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवे संशोधन म्हणते की, ग्लोबल वॉर्मिगमुळे मान्सूनच्या पावसाचे प्रमाण वाढणार नाही, तर त्यामुळे मान्सूनच्या प्रभावाखालील प्रदेशाला दीर्घ दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. त्याचा संबंध उत्तर अटलांटिक महासागराच्या तापमानात होणाऱ्या बदलांशी जोडण्यात आला आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. त्यामुळे त्याचे गांभीर्य दुर्लक्षित करून चालणार नाही. भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेचे (आय.आय.टी.एम.) संचालक डॉ. बी. एम. गोस्वामी आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकाऱ्यांनी मान्सूनचा हा संबंध नुकताच जगासमोर मांडला आहे. त्याला इतिहासकाळात घडलेल्या घटनांचा भक्कम आधार आहे. या होऊ घातलेल्या बदलांचा संबंध थेट उत्तर अटलांटिक महासागराशी जोडण्यात आला आहे.
उत्तर अटलांटिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान कमी झाले की, मान्सूनच्या प्रवाहाची तीव्रता कमी होत असल्याचे या संशोधनात पाहायला मिळाले आहे. चीनमध्ये ८२०० वर्षांपूर्वी अशाच कारणांमुळे प्रदीर्घ दुष्काळ पडला होता, याचे पुरावे मिळाले आहेत. या दुष्काळाचा प्रभाव तब्बल १००-२०० वर्षे कायम होता. त्यामुळे चीनसह आशिया खंडातील बऱ्याचशा प्रदेशांत २० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला होता. त्याच वेळी उत्तर अटलांटिक महासागरातील पाण्याचे तापमान तब्बल पाच ते सहा अंशांनी कमी झाले होते. हे तापमान कमी होण्याचा मान्सूनच्या प्रवाहाशी संबंध या संशोधनात अधोरेखित करण्यात आला आहे. त्या वेळी उत्तर अटलांटिकमध्ये अचानक मोठय़ा प्रमाणावर गोडे पाणी मिसळल्याने त्याचे तापमान कमी झाले. त्या काळी कॅनडाच्या ‘हडसन बे’जवळ ‘लेक अगॅसिस’ हे गोडय़ा पाण्याचे सरोवर होते. ८२०० वर्षांपूर्वी तेथील बर्फ वितळल्यामुळे हे तळे फुटले आणि त्याचे गोडे पाणी उत्तर अटलांटिकमध्ये मिसळले. या पाण्यामुळे समुद्रातील उबदार प्रवाहांचा प्रभाव कमी झाला आणि उत्तर अटलांटिकचे तापमान कमी झाले.
उत्तर अटलांटिक हा उत्तर गोलार्धातील तापमानाला प्रभावित करणारा अतिशय प्रभावी घटक आहे. त्यामुळे त्यात होणाऱ्या बदलांचा प्रभाव संपूर्ण उत्तर गोलार्धाच्या तापमानावर होतो. त्यामुळे मान्सूनसाठी आवश्यक असलेली जमीन व समुद्र यांच्यातील तापमानाची तफावत कमी होते, त्याचबरोबर मान्सूनचा प्रभावही ओसरतो. ८२०० वर्षांपूर्वीच्या सुमारास हेच घडले आणि मान्सूनच्या पावसाचे प्रमाण कमी झाले. त्याचा फटका मान्सूनच्या प्रभावाखाली असलेल्या बहुतांश प्रदेशांना बसला आणि भारत, चीनपासून आशिया खंडाच्या जास्तीत जास्त भागात हा दुष्काळ पडला. हवामानातील हे बदल हळूहळू घडणारे होते, पण दीर्घ काळ टिकणारेसुद्धा. त्यामुळेच या दुष्काळाचा प्रभाव १००-२०० वर्षांपर्यंत प्रदीर्घ काळ टिकून होता. त्या काळात पावसाचे प्रमाण तब्बल २० टक्क्यांहून कमी झाले होते.
या संशोधनामुळे मान्सूनचा जागतिक घटकांशी असलेला संबंध स्पष्ट झालाच, पण त्याचबरोबर संपूर्ण पृथ्वीवरील हवामान, मान्सूनसारखे वाऱ्याचे प्रवाह, जगभरातील समुद्र व त्यातील पाण्याचे प्रवाह यांचे एकमेकांशी असलेले घट्ट नातेसुद्धा अधोरेखित झाले. हे घटक एकमेकांशी इतके संबंधित आहेत की, जगाच्या एका कोपऱ्यात त्यांच्यात काही बदल झाले, तर त्याचे परिणाम दूरवरच्या हवामानावर पाहायला मिळतात. (कुठं अटलांटिक महासागर आणि कुठं आपल्या भागाला प्रभावित करणारा मान्सून? तरीही या दोन घटकांमध्ये अतिशय घट्ट नातं आहेच.) म्हणजेच मान्सूनचा प्रवाह, पाऊस, उन्हाळा, वादळे, थंडीच्या लाटा, हिमवर्षांव तसेच हवामानविषयक आपत्ती या घटनांवर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होत असेल, हे आताच निश्चितपणे सांगता येणार नाही. यावरून आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मान्सूनच्या वागण्यातील अनिश्चिततासुद्धा स्पष्ट होते. हवामानाचा एक घटक म्हणून ही अनिश्चितता निसर्गत: आहेच. आता तर हवामानबदलामुळे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मान्सूनचा अंदाज बांधणे व त्याचे भाकीत करणे अधिकच कठीण बनण्याचा धोका आहे.
उत्तर अटलांटिकच्या तापमानात घट झाल्यावर मान्सूनचा प्रभाव ओसरतो, हा संबंध या संशोधनात स्पष्ट झाला. त्याच्याच आधारावर भविष्यात मान्सूनच्या प्रदेशात दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
हे कशामुळे घडेल? उत्तर अटलांटिकच्या पृष्ठभागाचे तापमान कशामुळे कमी होईल? हे घडण्यासाठी पुन्हा काही कारणामुळे उत्तर अटलांटिक महासागरात मोठय़ा प्रमाणात गोडे पाणी जमा व्हावे लागेल. आताची हवामानबदलाची परिस्थिती पाहता हे घडण्यास वाव आहे. ग्लोबल वॉर्मिग हे त्याचे कारण ठरू शकते. कारण ग्लोबल वॉर्मिगमुळे उत्तर ध्रुवाजवळील बर्फ वितळण्याची शक्यता आहे.
खरं तर या प्रक्रियेला सुरुवात झालेलीच आहे. उत्तर ध्रुवावर असलेले बर्फ गेली काही दशके वितळत आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात तर उत्तर ध्रुवावरील बर्फाच्या थराचे बेट झाल्याचे पाहायला मिळाले. एरवी हे बर्फ कॅनडा, रशिया, ग्रीनलंड अशा वेगवेगळ्या भागावर असलेल्या बर्फाशी चिकटलेले असते. पण आधुनिक माणसाच्या इतिहासात पहिल्यांदाच, गेल्या ऑगस्ट महिन्यात ते वेगळे पडले होते. तसेच ग्रीनलंडवरील बर्फ वितळण्याचा वेगही अपेक्षेपेक्षा अधिक वाढला आहे. हे धोक्याचे संकेत आहेत. उत्तर ध्रुवावरील बर्फ पूर्णपणे वितळले तरी विशेष फरक पडणार नाही, पण ग्रीनलंडवरील बर्फ वितळले तर मात्र मोठय़ा प्रमाणात गोडे पाणी उत्तर अटलांटिकमध्ये मिसळेल. त्यामुळे सागरी प्रवाह प्रभावित होऊन उत्तर अटलांटिक महासागराचे पाणी थंड होऊ शकेल. त्याचा परिणाम म्हणून मान्सूनचा प्रभाव कमी होईल आणि पुढेसुद्धा भारतासह मान्सूनच्या प्रभावाखालील आशिया खंडातील देशांना प्रदीर्घ दुष्काळांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
खरंतर ग्लोबल वॉर्मिगबाबत सध्या अनेक भाकिते केली जातात. पृथ्वीच्या हवामानावर नेमके काय बदल होतील हेही बोलले जाते. पण ही भाकिते किती अनिश्चित आहेत, हेही या बदलांमुळे सिद्ध झाले आहे. आणि ग्लोबल वॉर्मिगमुळे भविष्यात नेमके काय वाढून ठेवले आहे, हेही आताच सांगणे कठीण झाले आहे. गेल्या दशकांमध्ये जगाने आणि गेल्या काही वर्षांत भारताने (आपण महाराष्ट्रातसुद्धा) जे काही अनुभवले, ती तर या बदलांची नांदी आहे, असे म्हणावे लागेल. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिग रोखण्यासाठी ठोस प्रयत्न केले गेले नाहीत, तर आपले भवितव्य अधिकच चिंतेचे होईल.
वास्तव असे असूनही प्रत्यक्षात याबाबत आपण खऱ्या अर्थाने जागे झालेलो नाही. ग्लोबल वॉर्मिग व ते रोखण्याच्या उपायांबाबत जगभर चवीने चर्चा होते आहे, पण प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ येते, तेव्हा आपली इच्छाशक्ती गळून पडते. हे सर्व टाळण्याच्या दिशेने खंबीर पावले उचलली जात नाहीत. अर्थात, काही सकारात्मक बाबी घडत आहेत, पण अजूनही त्या अपवादात्मकच आहेत. त्यांचा वेग वाढल्याशिवाय आणि त्वरेने काही सुधारणा केल्याशिवाय हा अनिश्चिततेच्या दिशेने सुरू असलेला प्रवास थांबणार नाही. या अभ्यासाद्वारे आपल्याला प्रदीर्घ दुष्काळाची वॉर्निग मिळालीच आहे. त्याकडे दुर्लक्ष केले आणि ही वॉर्निग प्रत्यक्षात आली, तर पुढच्या पिढय़ा आपल्याला माफ करणार नाहीत. कारण त्यांचे जीवन व संपन्नता आपण हिरावून घेतलेली असेल.

हवामानाचा इतिहास उलगडताना..

हजारो वर्षांपूर्वीचे प्रदीर्घ दुष्काळ व त्या काळी महासागरात मिसळलेले गोडे पाणी या घटनांचे पुरावे कसे मिळाले? संशोधनाची ही प्रक्रिया अतिशय रंजक आहे. चीनमध्ये प्राचीन काळी दुष्काळ पडल्याचे पुरावे तेथील गुहांमधील चुनखडीच्या थरात सापडले आहेत. त्या गुहेत ऑक्सिजन वायूच्या विविध रूपांचे एकमेकांशी असलेले प्रमाण किती आहे, यावरून त्या काळी पावसाचे प्रमाण कमी होऊन प्रदीर्घ दुष्काळ पडल्याचे शोधून काढता आले. सुमारे ८२०० वर्षांपूर्वी पडलेला तो दुष्काळ शंभर-दोनशे वर्षे कायम होता. याचे सुसंगत पुरावे सोमालियाच्या किनाऱ्याजवळ समद्रात मिळाले. तिथे जमा झालेल्या गाळावरून मान्सूनचा प्रभाव कमी झाल्याचे आढळले. मान्सून प्रभावी असेल तेव्हा वाऱ्यांमुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे पाणी अधिक वाहते आणि खालचे थंड पाणी वर येते. त्याचा परिणाम म्हणून समुद्रात ‘फोरॅमिनिफेरा’सारखे सूक्ष्म जीव फोफावतात. त्यांचे अवशेष गाळात साचून राहतात. प्राचीन काळातील गाळाच्या अभ्यासावरून ही गोष्ट निश्चितपणे हेरता येते. अशा प्रकारे जुन्या काळातील हवामानाच्या घटना उलगडता आल्या आणि पुढील हवामानाबाबत भाकीत करणे शक्य झाले.अभिजित घोरपडे
abhighorpade@rediffmail.com