Leading International Marathi News Daily                                  रविवार, ११ जानेवारी २००९

राजकीय पुनर्वसनासाठी राणे यांची दिल्लीवारी
सोनियांची भेट नाहीच; अँटनींना भेटून आपली बाजू मांडली

नवी दिल्ली, १० जानेवारी/खास प्रतिनिधी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने काँग्रेसश्रेष्ठींवर भरपूर टीका करून निलंबन ओढवून घेणारे माजी महसूल मंत्री नारायण राणे यांनी आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी आज प्रदेश काँग्रेसचे प्रभारी, संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांची भेट घेतली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याची संधी मात्र त्यांना मिळाली नाही. आपण काँग्रेसमध्येच आहोत, असे राणे यांनी साऊथ ब्लॉकमध्ये अँटनी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांपाशी स्पष्ट केले.

जागा वाटपात शिवसेनेला हवे फिफ्टी-फिफ्टी
दक्षिण मुंबई, कल्याण, यवतमाळ मतदारसंघांबाबतही आग्रही

मुंबई, १० जानेवारी / प्रतिनिधी

राज्यातील भारतीय जनता पक्षाची ताकद घटली असल्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने प्रत्येकी २४ जागा लढवाव्या अशी मागणी भाजपकडे करण्याचा निर्णय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थित आज झालेल्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे समजते. दक्षिण मुंबई, कल्याण, यवतमाळ या लोकसभेच्या तीन जागा कोणत्याही परिस्थितीत शिवसेनाच लढवेल, अशी आग्रही भुमिकाही या बैठकीत घेण्यात आली असल्याचे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

काँग्रेस उमेदवारांची यादी फेब्रुवारीच्या प्रारंभीे जाहीर होणार
नवी दिल्ली, १० जानेवारी/पीटीआय

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन काँग्रेस पक्षाने आता युद्धपातळीवर पूर्वतयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरणाऱ्या काँग्रेस उमेदवारांची यादी येत्या फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीच जाहीर करण्यात येईल असे या पक्षाने ठरविले आहे. काँग्रेस पक्षनेत्यांनी नेमून दिलेली कामे आखून दिलेल्या मुदतीतच पार पाडावीत असे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज सांगितले. प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षातील ज्या इच्छुकांना उमेदवारी द्यायची आहे अशांच्या नावांची यादी प्रदेश काँग्रेस कमिटय़ांनी जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत पाठवावी असा आदेश काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पक्षनेत्यांना हा दिला. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य व विविध राज्यांचे प्रभारी असलेले नेते यांची एक बैठक आज पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

नानाचा ठेका अन् लिटल चॅम्प्सचा धमाका
पुणे, १० जानेवारी/प्रतिनिधी

‘कोकणगंधर्व’ प्रथमेशसह लिटल चॅम्प्स ‘दत्तदर्शनाला आणि जायाचं नि जायाचं’ गाणं सादर करत होते.. हजारो रसिकांची गाण्याला भरभरून दाद मिळत होती.. गाणं संपलं.. टाळ्यांचा कडकडाट झाला.. प्रथमेश नेहमीसारखा ‘थँक्यू’ म्हणत रंगमंच सोडू लागला.. आणि एक दमदार ‘एन्ट्री’ रंगमंचावर झाली.. प्रथमेशला अडवत ‘तो’ म्हणाला, इथं असं थँक्यू म्हणून जमत नसतं, इथं अजून एकदा म्हणावं लागतं.. गाणं पुन्हा म्हणण्याचा हा ‘आदेश’ मिळाला होता साक्षात् अभिनेता नाना पाटेकरकडून! नानाचा आदेश आणि आग्रहामुळे लिटल चॅम्प्सनी पुन्हा एकदा तेच गाणं मोठय़ा बहारीनं सादर केलं आणि नानासह हजारो रसिकांना या चिमुकल्यांनी या गाण्यावर अक्षरश: डोलायला लावलं! वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘वसंतोत्सवा’चा आजचा दुसरा दिवस महाराष्ट्रभर सर्वतोमुखी झालेल्या प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैशंपायन यांनी गाजवला.

‘सत्यम’चे रामलिंग राजू यांना २३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी
नवी दिल्ली/ हैदराबाद, १० जानेवारी/ पीटीआय

आंध्र प्रदेश गुन्हे अन्वेषण विभागाने काल रात्री अटक केलेल्या सत्यम कॉम्प्युटरचे घोटाळेबाज माजी अध्यक्ष रामलिंग राजू आणि त्यांचे बंधू बी. रामा राजू यांना आज हैदराबादच्या न्याय दंडाधिकाऱ्यांनी २३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश सुनावला. तुरुंग अधिकाऱ्यांनी मात्र राजू यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवावे, असे न्यायालयाने सुनावले आहे.

पशुखाद्य कारखान्यांमुळे ‘महानंद’चे कोटय़वधींचे नुकसान!
केदार दामले
मुंबई, १० जानेवारी

राज्यात जेव्हा जेव्हा नेतृत्वबदल झाला तेव्हा तेव्हा नव्या मुख्यमंत्र्यांना आणि नव्या दुग्धविकास मंत्र्यांना खूश करण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यात ‘महानंद’तर्फे पशुखाद्य कारखाने सुरू करण्यात आले. मात्र अशा प्रकारे सुरू करण्यात आलेल्या चार कारखान्यातून गेल्या काही वर्षांत किती पशुखाद्य पुरविण्यात आले हा संशोधनाचा विषय होऊन बसलेला आहे. असे असताना या कारखान्यांना करारातील तरतुदींनुसार ठरावीक रक्कम देण्याचे बंधन ‘महानंद’वर असल्याने २५ लाख दूध उत्पादक शेतक ऱ्यांच्या या शिखर संस्थेला कोटय़वधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.

गृहनिर्माण विभागातील आणखी एक महाघोटाळा!
मुख्यमंत्र्यांच्या सहीविनाच
३५‘व्हीआयपीं’चे ‘गृहस्वप्न’ साकार

निशांत सरवणकर
मुंबई, १० जानेवारी

म्हाडा उच्चपदस्थांच्या ‘गृहस्वप्न’ या सोसायटीबरोबरच जुहूसारख्या मोक्याच्या ठिकाणी अनेक सोसायटय़ांना २.४ इतका एफएसआय देण्याचे प्रकरण गाजत असतानाच गृहनिर्माण विभागातील आणखी एक महाघोटाळा उघड झाला आहे. गृहनिर्माण विभागातील काही अधिकाऱ्यांनी संगनमताने शासनाच्या विशेषाधिकाराचा परस्पर वापर करून मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेली सुमारे ३५ घरे जानेवारी २००४ ते जून २००७ या काळात वितरीत केली आहेत. या प्रकाराची गृहनिर्माण विभागामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती ‘म्हाडा’मधील सूत्रांनी दिली. उद्या सोमवारी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे होणाऱ्या बैठकीत या विषयावरही चर्चा होणार आहे.

अघोषित बंदी मागे; आता ‘को एम-२६५’ उसाचे ‘मार्केटिंग’!
अशोक तुपे
श्रीरामपूर, १० जानेवारी

‘जाणत्या राजा’ने मान्यतेची मोहोर उमटवताच सहकारी साखर कारखान्यांनी उसाच्या नवीन जातीवरील अघोषित बंदी मागे घेतली. गेली दोन वर्षे हा ऊस लावू नका, असे म्हणणारे आता अहमहमिकेने पुढे सरसावले. ही कथा आहे क ो एम-२६५ या उसाच्या वाणाची! राज्यातील उसाखालील असलेल्या क्षेत्रापैकी निम्म्या क्षेत्रात तरी कोएम-२६५ जातीची लागवड होईल. त्यामुळे ऊसउत्पादनात मागे असलेले राज्य उत्तर भारताच्या बरोबरीने येईल! काही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस, तर काहींच्या कार्यक्षेत्रात उसाचा तुटवडा. यामुळे क ोएम-२६५ जातीमुळे उसाचे उत्पादन २० टक्क्य़ांनी वाढते. उत्पादनवाढीमुळे उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण होईल.

ना. धों. महानोर यांना जनस्थान पुरस्कार
पुणे, १० जानेवारी/ प्रतिनिधी

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ कवी व कादंबरीकार ना. धों. महानोर यांना जाहीर झाला आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी २७ फेब्रुवारीला नाशिक येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी आज येथे पत्रकार परिषदेत महानोर यांच्या नावाची घोषणा केली. पुरस्कार प्रबंधक समितीचे अध्यक्ष डॉ. वसंत पवार, प्रतिष्ठानचे कार्यवाह अ‍ॅड. विलास लोणारी व आमदार हेमंत टकले त्या वेळी उपस्थित होते. कुसुमाग्रजांच्या प्रेरणेने सुरू झालेला मराठी साहित्यातील मानाचा असलेला हा पुरस्कार मराठीतून गौरवास्पद ललित लेखन करणाऱ्या साहित्यिकाला दिला जातो. एक लाख रुपये रोख, मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी देशाबरोबरच परदेशातील मराठी रसिकांकडून नावे मागविण्यात आली होती. त्यावर आज येथे निवड समितीची बैठक झाली. त्यात महानोर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ज्येष्ठ समीक्षक द. भि. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमध्ये डॉ. यशवंत पाठक, सदानंद मोरे, निशिकांत ठकार, अंबरीश मिश्र, डॉ. अरुणा ढेरे आदी साहित्यिकांचा समावेश होता. दोन वर्षांतून एकदा दिला जाणारा हा पुरस्कार यापूर्वी विजय तेंडुलकर, िवदा करंदीकर, इंदिरा संत, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, बाबुराव बागुल यांना मिळाला आहे. महानोर यांनी १९६७ पासून आजपर्यंत विपुल लेखन केले आहे. ‘रानातल्या कविता’ हा त्यांचा सुरुवातीचा काव्यसंग्रह. त्यानंतर त्यांचे विविध काव्यसंग्रह व कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. जैत रे जैत, विदूषक आदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतेही लिहिली आहेत. निसर्ग हा त्यांच्या साहित्याचा प्रमुख विषय राहिला आहे.

अमेरिकन कंपनीकडून एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना लाच?
मुंबई, १० जानेवारी / प्रतिनिधी

‘व्हॉल्व’ बनविणाऱ्या एका अग्रणी अमेरिकन कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर कंत्राटे पदरी पाडून घेण्यासाठी लाच दिल्याप्रकरणी अमेरिकन सरकराने ठपका ठेवला आहे. या अधिकाऱ्याने मार्च २००३ आणि २००७ मध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या (एमएसईबी) अधिकाऱ्यांनाही लाच दिल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे राज्याचे उर्जामंत्री सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे. सदर अमेरिकन अधिकाऱ्याचे नाव मारिओ कोव्हिनो (४४)असून तो कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे. भ्रष्टाचाराच्या मार्गाने १० लाख अमेरिकन डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर असून, त्याने न्यायालयासमोर आपला गुन्हा मान्य केला आहे. कंत्राटे मिळविण्यासाठी जगभरात अनेक संस्थांच्या अधिकाऱ्यांना लाच दिल्याचे त्याने म्हटले असून, त्यामध्ये एमएसईबीच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे त्याने नमूद केले आहे. अमेरिकन सरकारने सदर कंपनीचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र ही कंपनी जगभरातील अणु, वायू आणि वीजनिर्मिती क्षेत्रासाठी कंट्रोल व्हॉल्वचे उत्पादन करते. जगातील ३० देशांमध्ये कंपनीचे ग्राहक आहेत. तिच्या संचालकपदी (सेल्स) असताना कॉव्हिनोने मार्च २००३ आणि २००७ मध्ये अनेक विदेशी कंपन्यांना ही लाच दिली होती. उर्जामंत्री सुनिल तटकरे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली असता, ‘हा प्रकार घडला त्यावेळी मी उर्जामंत्री नव्हतो. मात्र या प्रकरणी माहिती घेण्यात येईल व सखोल चौकशी केली जाईल’, असे ते म्हणाले.

पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसमध्ये आठवडय़ाभरात दरकपात
मुंबई, १० जानेवारी/ व्यापार प्रतिनिधी

केंद्र सरकार पेट्रोलच्या दरात पाच रुपयांची, डिझेलमध्ये तीन रुपयांची तर घरगुती वापराच्या गॅसच्या दरात २५ रुपयांची कपात करण्याबाबत विचार करीत असून, येत्या आठवडय़ाभरात या संबंधाने ठोस निर्णय जाहीर केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम मुरली देवरा यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेलाच्या किमती बॅरलमागे ४० डॉलरच्या आसपास असल्याने सरकारवर पडणारा इंधन सबसिडीचा बोजा बव्हंशी कमी झाला असून, पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीही घटविण्याबाबत सरकारमध्ये विचारविमर्श सुरू आहे. पंतप्रधानांशी आपले बोलणेही झाले असून पाच-१० दिवसांत निश्चित निर्णय येईल, असे देवरा यांनी स्पष्ट केले. तेल व वायू उत्पादक कंपन्यांतील अधिकाऱ्यांच्या दोन दिवस चाललेल्या संपानंतर मुंबईतील इंधन पुरवठय़ाच्या स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी देवरा यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील एचपी पेट्रोलपंपाला आज भेट दिली, त्यासमयी त्यांच्यासोबत हिंदुस्थान पेट्रोलियम तसेच महानगर गॅस लिमिटेडचे उच्च अधिकारीही उपस्थित होते.
क्रूड तेलाचा दर बॅरलमागे ४० रुपयांच्या स्तरावर राहिल्यास येत्या मार्चपासून तेल उत्पादक कंपन्या आजवरचा तोटा भरून काढून नफाही कमावू लागतील, अशी देवरा यांनी माहिती दिली. गेल्याच महिन्यांत, ५ डिसेंबरला पेट्रोलमध्ये पाच रुपयांची तर डिझेलमध्ये दोन रुपयांची घट सरकारने केली होती. पण घरगुती वापराच्या गॅससाठी (एलपीजी) सरकारवरील सबसिडीचा बोजा प्रचंड मोठा असला तरी एलपीजीच्या किमतीही २५ रुपयांनी घटविल्या जाव्यात, असे आपले मत असल्याचे त्यांनी सांगितले. या दरकपातीबाबत सरकारमध्ये सहमती निश्चितच बनेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

धान्य व मसाला बाजारपेठ ठप्प
बेलापूर, १० जानेवारी/वार्ताहर

मालवाहतूकदारांच्या देशव्यापी संपामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी मालाची बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य व मसाला बाजारपेठेतील वाहतूकदार काल मध्यरात्रीपासून सहभागी झाल्याने या बाजारपेठांचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. यामुळे नियमित होणाऱ्या लाखो रुपयांच्या उलाढालीला आज ‘ब्रेक’ लागला.
दरम्यान, केंद्र सरकारने या संपावर सोमवापर्यंत तोडगा न काढल्यास वाहतूकदारांना पाठिंबा दर्शविण्यासाठी संपूर्ण राज्यातील ७० हजार माथाडी कामगार एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे नेते नरेंद्र पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. वेळ पडल्यास सर्व व्यापारी घटकांशी चर्चा करून त्यांनाही या लाक्षणिक बंदमध्ये सहभागी करून घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे. शुक्रवार मध्यरात्रीपासून रिटेल मोटर ट्रान्सपोर्ट या बाजार समितीतील सर्वात मोठय़ा संघटनेने संपात उडी घेतल्याने शनिवारी धान्य व मसाला बाजारपेठ पूर्णत: बंद होती. कांदा-बटाटा बाजारपेठेवरही अंशत: याचा परिणाम झाला, मात्र भाजी व फळ बाजारपेठांवर याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. या बाजारपेठांतील वाहतूकदारांनीही सोमवापर्यंत निर्णय न झाल्यास संपात उतरण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली असून सर्वसामान्य यात नाहक भरडले जाणार आहेत.

मुंबईवरील हल्ल्यांसंदर्भात जागतिक समुदायाने इतका गहजब माजविण्याची गरज नाही - गिलानी
कराची, १० जानेवारी/पीटीआय

मुंबईमध्ये गेल्या २६ नोव्हेंबर रोजी झालेला हल्ला व पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी कारवाया यांच्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना साऱ्या जगाने कायम दुतोंडी भूमिका घेतली आहे असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी केला आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय समुदायाने इतका गहजब माजविण्याची काहीही आवश्यकता नाही असेही गिलानी यांनी शहाजोगपणे पुढे म्हटले आहे. गाझा पट्टीमध्ये इस्राएलने चढविलेले हल्ले व मुंबईमध्ये झालेला दहशतवादी हल्ला यांची तुलना होणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले. जम्मू-काश्मिरमध्ये निरपराध लोकांवर अनन्वित अत्याचार होत असल्याचा दावा करून गिलानी पुढे म्हणाले की, अशा विषयांबाबत जागतिक समुदाय मुग गिळून गप्प बसतो हे अनाकलनीय आहे. कोणत्याही प्रश्नाबाबत जगाने दुतोंडी भूमिका घेऊ नये.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८