Leading International Marathi News Daily                                  सोमवार, १२ जानेवारी २००९


गतवर्षी महाराष्ट्र केसरी किताब पटकाविणारा सांगलीचा चंद्रहार पाटील (लाल जर्सी) व अहमदनगरचा संदीप बारगुजे यांच्यातील डावपेच. चंद्रहारने अखेर ही कुस्ती जिंकून पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी किताबावर मोहोर उमटविली.

अखेर राज्यातील मालवाहतूकदारांचा संप मिटला
मुंबई, ११ जानेवारी / प्रतिनिधी
गेला आठवडाभर सुरू असलेला राज्यातील मालवाहतूकदारांचा संप आज अखेर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मिटला आहे. एक महिन्यात मालवाहतूकदारांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. मात्र ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने आपला संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, वाहतूक आयुक्त संगीतराव आणि ट्रक, टेम्पो, टँकर वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी आणि इतर नेत्यांसोबत चर्चा झाली. मालहावतूकदार आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून संपावर गेले होते.

सत्यमचे नवे संचालक मंडळ जाहीर
नवी दिल्ली, ११ जानेवारी/पीटीआय
घोटाळ्याची कबुली देण्याच्या अगोदर राजूने वटवले १२३० कोटींचे शेअर्स
सत्यम कंपनीवर अमेरिकेतही अब्जावधी डॉलरच्या फसवणुकीचे खटले
राजू बंधू झोपले इतर कैद्यांप्रमाणे जमिनीवर
सत्यम कॉम्प्युटर्स या भारतातील चौथ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीत ७८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्यानंतर आज सरकारने या कंपनीवर नवीन संचालक मंडळाची नियुक्ती केली असून त्यात ख्यातनाम बँकर दीपक पारेख, आयटी तज्ज्ञ किरण कर्णिक व सेबीचे माजी सदस्य सी.अच्युतन यांचा समावेश आहे. नवनियुक्त संचालक मंडळाची बैठक उद्या हैदराबाद येथे होत असून त्यात आगामी धोरण निश्चित करण्यात येणार आहे. नवनियुक्त सदस्य व एचडीएफसी बँकेचे चेअरमन दीपक पारेख यांनी सांगितले की, उद्या संचालक मंडळाची बैठक हैदराबाद येथे होणार आहे.आर्थिक घोटाळ्यामुळे डबाघाईस आलेल्या सत्यम कंपनीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी पारेख यांच्याबरोबरच नॅसकॉमचे माजी अध्यक्ष किरण कर्णिक व सेबीचे माजी सदस्य सी.अच्युतन यांना नेमण्यात आले आहे. कर्णिक यांचे नाव अगोदरपासून चर्चेत होते. तुम्ही संचालक मंडळाचे नेतृत्व करणार काय, असे विचारले असता पारेख यांनी सांगितले की, याबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या उद्या होणाऱ्या पहिल्या बैठकीत घेतला जाईल. नवनियुक्त सदस्य आज रात्रीच हैदराबादला रवाना होत आहेत. दरम्यान कंपनी कामकाज मंत्री प्रेमचंद गुप्ता यांनी सांगितले की, येत्या २४ तासात नवनियुक्त संचालक मंडळाची बैठक होणार आहे व त्यात पुढील दिशा ठरवली जाईल. कंपनी कायदा मंडळाच्या आदेशानुसार नवनियुक्त संचालक मंडळात जास्तीत जास्त दहा सदस्य असू शकतील. सरकारने शुक्रवारी सत्यम कंपनीचे अगोदरचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. तत्पूर्वी कंपनीचे संस्थापक बी.रामलिंग राजू यांनी सत्यम कंपनीत ७८०० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचे मान्य केले होते. सत्यम कॉम्प्युटर्स सव्‍‌र्हिसेस या कंपनीने आज नवीन संचालक मंडळ नेमण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून त्यामुळे कंपनीत हळूहळू पुन्हा एकदा स्थिरता येईल, असे मत कंपनीच्या प्रवक्तयाने व्यक्त केले आहे. एलआयसी व लॅझार्ड या गुंतवणूकदार संस्थांनी संचालक मंडळावर प्रतिनिधित्व मागितले आहे याकडे लक्ष वेधले असता श्री. गुप्ता यांनी सांगितले की, कंपनीच्या हितासाठी आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत. संचालक मंडळावर अर्थ, कायदा, आयटी, प्रशासन या क्षेत्रातील तज्ञांना स्थान दिले जाईल असे गुप्ता यांनी सांगितले. गरज भासल्यास संचालक मंडळावर आणखी नेमणुका करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारताच्या ताब्यात देणार नाही’
कराची ११ जानेवारी/पीटीआय

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात सामील असल्याचे आढळलेल्या कुठल्याही पाकिस्तानी नागरिकाला भारताच्या हवाली करण्यात येणार नाही. याप्रकरणी भारताने जे पुरावे सादर केले आहेत त्याची स्वतंत्र चौकशी आम्ही करीत आहोत, असे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी आज सांगितले. ते म्हणाले की, आम्ही चौकशी करीत आहोत, ती पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यातील निष्कर्ष जनतेसमोर मांडू. आमचे काही कायदे आहेत व त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल. आमच्या भूमीचा वापर दहशतवादाच्या कारवायांसाठी करू देणार नाही याची खात्री देत आहोत. दक्षिण सिंध प्रांतातील सुकुर जिल्ह्य़ात एका कार्यक्रमाच्यावेळी गिलानी पत्रकारांशी बोलत होते. मुंबई हल्ल्यात कुणी पाकिस्तानी नागरिक सामील असेल तर त्याला भारताच्या हवाली केले जाणार नाही. पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करीत आहे व ती चालू राहील. भारतीय नेते वेगवेगळी वक्तव्ये करून तणाव निर्माण करीत आहेत त्यामुळे त्यांनी स्वत:ला आवर घालावा. सांगी कॅडेट कॉलेज येथे बोलताना त्यांनी सांगितले की, दक्षिण आशियात पाकिस्तानला तणाव नको आहे. कुठल्याही आव्हानात्मक परिस्थितीत देशाचे संरक्षण करण्यास आमची संरक्षण दले, सरकार व जनता एकजुटीने सिद्ध आहे. कुणीही वाकडय़ा नजरेने आमच्या देशाकडे पाहू शकणार नाही इतके आमचे सामथ्र्य आहे. आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करील व देशाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करील असेही त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांच्याशी गिलानी यांचे मतभेद झाल्याच्या बातम्या होत्या त्या पाश्र्वभूमीवर गिलानी यांच्या विधानाला महत्त्व आहे.

मुख्यमंत्र्यांची दिल्लीत काँग्रेसश्रेष्ठींशी चर्चा राणेंविषयी भाष्य टाळले
नवी दिल्ली, ११ जानेवारी/खास प्रतिनिधी

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सकाळी दिल्लीत दाखल होऊन संरक्षण मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी ए. के. अँटनी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांच्याशी दीर्घ चर्चा केली. काँग्रेसश्रेष्ठींना राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीची माहिती देताना त्यांनी पक्षातून निलंबित करण्यात आलेले माजी महसूल मंत्री नारायण राणे यांच्या पुनरागमनाविषयीही चर्चा केल्याचे समजते. मात्र, राणे यांच्याविषयी चर्चा करण्यासाठी आपण आलो नव्हतो आणि त्यांच्याविषयी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, अशी भूमिका घेत चव्हाण यांनी भाष्य करण्याचे टाळले.

शारीरिकदृष्टय़ा अक्षम ठरलात तरी नोकरी शाबूत!
मुंबई, ११ जानेवारी/प्रतिनिधी

सरकारी नोकरी करीत असताना एखादा कर्मचारी शारीरिक व्याधीमुळे त्याचे कर्तव्य बजावण्यास अक्षम ठरला तर त्याला सक्तीने सेवानिवृत्त न करता त्याच पगारावर पण कमी श्रमाचे हलके काम देऊन सरकारने नोकरीत ठेवायला हवे. असे हलके काम देणे शक्य नसेल अशा कर्मचाऱ्यास तसे काम उपलब्ध होईपर्यंत किंवा सेवानिवृत्त होईपर्यंत त्यास ‘सुपरनेयुमेरेरी’ पदावर ठेवून सरकारने त्याचा पगार सुरू ठेवायला हवा, असा निकाल महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिला आहे.

वांद्रे कॉलनीच्या मलिद्यावर तिघांचा डोळा!
संदीप प्रधान
मुंबई, ११ जानेवारी

गेली ५० वर्षे वांद्रे येथील शासकीय वसाहत उभी असलेल्या ९६ एकर भूखंडाचा पुनर्विकास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने करायचा, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करायचा की गव्हर्नमेंट क्वार्टर्स रेसिडन्टस असोसिएशनने करायचा असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कारकिर्दीत गती प्राप्त झालेल्या या योजनेतील सुमारे १० हजार कोटी रुपयांचा हा मलिदा कुणाच्या खिशात पडणार याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.

तालिबान्यांच्या हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ४६ ठार
इस्लामाबाद, ११ जानेवारी / पीटीआय
अफगाणिस्तान सीमेनजीकच्या आदिवासींचे प्राबल्य असलेल्या बजौर भागात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या तळावर तसेच चेक पोस्टवर तालिबानी अतिरेक्यांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात सहा सैनिकांसह ४६ जण ठार झाले. या भागात तालिबान्यांविरूद्ध सैन्याने नुकतीच मोहीम हाती घेतली होती. अतिरेक्यांत बहुसंख्य परदेशी होते व त्यांनी अग्निबाण, तोफगोळ्यांनी जोरदार हल्ला चढविला. प्रदीर्घकाळ ही धुमश्चक्री झडली आणि त्यात ४० अतिरेकी आणि सहा सैनिक ठार झाल्याची माहिती जिओ न्यूजने दिली. जखमी सैनिकांना हेलीकॉप्टरने पेशावरला हलविण्यात आले. लाकारो येथील चेक पोस्टवरील चकमक तीन तासांहून अधिक काळ सुरू होती. लाकारो हा तालिबान्यांचा बालेकिल्ला मानला जातो.

चिमुरडय़ाला पळवणाऱ्या महिलेला अटक
मुंबई, ११ जानेवारी / प्रतिनिधी

सायन रुग्णालयातून अर्भक चोरीला जाण्याच्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच शुक्रवारी बोरिवली स्थानकातून तीन महिन्याच्या मुलाला भर दिवसा पळविल्याची घटना घडली. रेशम जाना (३२) या महिलेने स्वत:ला मुलगा नाही म्हणून दहिसर येथून तीन महिन्याच्या चिमुरडय़ाला भरदिवसा बोरिवली स्थानकातून पळविले. मात्र तिला परळच्या वाडिया रुग्णालयातून राज्य रेल्वे पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्यामराव गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे निर्मला खरे या सासूसोबत त्याला बोरिवली येथील भगवती रुग्णालयात उपचारासाठी घेऊन यायच्या. पाच-सहा दिवसांपूर्वी निर्मला अशाच प्रेमला घेऊन रुग्णालयात गेल्या असता रेशमशी त्यांची भेट झाली. गप्पा मारताना रेशमने निर्मला यांना आपण सामाजिक कार्यकर्ती असल्याचे सांगितले. तसेच भगवती रुग्णालयात चांगले उपचार केले जात नसल्याचे सांगून प्रेमला विरार येथील माझ्या ओळखीच्या डॉक्टरकडे घेऊन जाऊया, असे सांगितले. त्यानंतर निर्मला या प्रेमला घेऊन विरारला रेशमच्या ओळखीच्या डॉक्टरकडे घेऊन गेल्या. मात्र हा डॉक्टरही चांगला नसून प्रेमवर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात चांगले उपचार होतील असे सांगून रेशमने निर्मला यांना ९ जानेवारी रोजी बोरिवली स्थानकात भेटण्यास सांगितले. ठरल्यानुसार निर्मला या सासू कमल, प्रेम आणि आठ वर्षांच्या मुलीसह ९ जानेवारी रोजी रेशमला बोरिवली स्थानकात भेटल्या. त्यानंतर दादर येथे येण्यासाठी त्या लोकलची वाट पाहत होत्या. तेवढय़ात निर्मला या आठ वर्षांच्या मुलीला तहान लागल्याने तिला पाणी पिण्यासाठी घेऊन गेल्या. त्यानंतर रेशमने गाडी आल्याचे निमित्त करून निर्मला यांच्या सासूकडून तीन महिन्याच्या प्रेमला घेतले आणि त्यांना निर्मला बोलावण्यासाठी पाठवले आणि तिने प्रेमला घेऊन तेथून पळ काढला. स्थानकात रेशम आणि प्रेमला शोधूनही ते न सापडल्याने खरे सासू-सुनेने बोरिवली रेल्वे पोलिसांत प्रेमला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास घेतला आणि शनिवारी रात्री अखेर रेशमला वाडिया रुग्णालयातून अटक करण्यात आली. सहा मुलींची आई असलेली रेशम आठ महिन्यांची गर्भवती होती. मात्र गेल्याच आठवडय़ात भगवती रुग्णालयात तिचा गर्भपात झाला आणि मुलगा होण्याचे तिचे स्वप्न भंगले. त्याचवेळी तिची खरे यांच्याशी भेट झाली आणि त्यांची फसवणूक करून प्रेमला पळविण्याचा निर्णय घेतल्याचे चौकशीतून उघड झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८