Leading International Marathi News Daily
सोमवार १२ जानेवारी २००९

सत्यमच्या रामलिंग राजू यांची लबाडी वर्षांनुवर्षे चालली होती. पण लबाडी जास्त दिवस चालू शकत नाही. कधीतरी पापाचा घडा भरतोच. पण कंपनीच्या ५३,००० कर्मचारी व सामान्य भागधारकांचे हितरक्षण म्हणून कंपनीवरील संकटाच्या निवारणासाठी आपल्याला किंमत मोजावीच लागेल..
सत्यम कॉम्प्युटर सव्र्हिसेसच्या शेअरचा, ७ जानेवारी ०९ रोजीचा, सकाळी १० वाजताचा बाजारभाव १८१.६५ रु. होता. दुपारी पावणेचारला अचानक कोसळून तो ३९.९५ रु. पर्यंत गडगडला. तर सेन्सेक्स ७४९ पॉइंटनी उतरला, कारण भारतातल्या भांडवलदारी खासगी कंपन्यात होणाऱ्या भ्रष्टाचारातला आजपर्यंतचा सर्वात मोठा भ्रष्टाचार, फक्त नावातच सत्य असलेल्या या कंपनीत घडला.
७ जानेवारीलाच सकाळी ९.४५ ला सेबीचे अध्यक्ष सी. बी. भावे यांच्या टेबलावर एक बंद पाकीट आले. पाकीट उघडताच सर्व ऑफिसच नव्हे तर पूर्ण शेअर बाजार अवाक झाला. सत्यमचे सर्वेसर्वा रामलिंगम राजू यांनी आतापर्यंत या कार्पोरेट क्षेत्रात केलेल्या आपल्या गुन्हेगारीचा कबुलीजबाब पाकिटात घालून पाठविला होता. तसे पाहता डिसेंबर २००८ पासूनच नावात राम असलेल्या राजू यांच्या काळ्या कारवाया उजेडात येत होत्या. १६ डिसेंबरला मेटास प्रॉपर्टीज व मेटास इन्फ्रा या राजू कुटुंबियांच्याच मालकीच्या कंपनीचे शेअर्स राजू यांच्याच सत्यमने अव्वाच्या सव्वा भावात खरेदी करण्याची सूचना मांडली होती. त्यानिमित्त सुमारे १.६ बिलियन डॉलर म्हणजे सुमारे सात हजार कोटी रुपयांपेक्षाही जादा रक्कम सत्यमने राजू कुटुंबियांच्या घशात जाणार होती. या काळ्या व्यवहाराला सर्वानीच विरोध केल्यामुळे ते बारगळले. तर दुसऱ्या एका लबाडीच्या प्रकरणी (माहिती-चौर्य) २४ डिसेंबरला जागतिक बँकेने सत्यमशी व्यावसायिक संबंधांवर आठ वर्षांसाठी बहिष्कार घातला.

 


राजूनी आपल्या कबुलीजबाबाच्या पत्रात, गेली पाच-सहा वर्षे सत्यमच्या बॅलन्स शीटमध्ये खोटय़ा नोंदी होत आल्या असल्याची कबुली दिली आहे. यामुळे ३० सप्टेंबर २००८ च्या बॅलन्स शीटमध्ये दाखवण्यात आलेली ५,०४० कोटी रुपयांची नकद व बँकेतली शिल्लक मुळातच खोटी आहे.
भारतातली ही चौथ्या क्रमांकाची नावाजलेली सॉफ्टवेअर कंपनी २१ वर्षांपूर्वी रामलिंग राजू यांनी छोटय़ा प्रमाणावर सुरू केली होती. नवीन आर्थिक धोरणाच्या कालावधीत सरकारी बंधने सैल होताच राजूंनी अनेक शक्कली लढवून कंपनीचा विस्तार केला. आज जवळपास ६६ देशांत या कंपनीचे व्यावसायिक संबंध असून सुमारे ५३,००० कामगारांना रोजीरोटी मिळते. एका कामगाराने म्हटले आहे, कालपर्यंत सत्यमचा कामगार म्हणून समाजात मानाचे स्थान होते. कामगाराला लगेच नवरी मिळायची, पण आजपासून सत्यमच्या कामगाराचा भावी वर म्हणून कुणी विचारही करणार नाही.
रामलिंग राजूंनी हे सर्व का केले? यात साधारणपणे दोन कारणे संभवतात. ही खोटी आकडेवारी दिल्यामुळे कंपनीच्या शेअर्सचे भाव सुजले व त्याचा पुरेपूर फायदा राजू कुटुंबीयांनी घेतला असणार. कारण जास्तीत जास्त शेअर्स राजू कुटुंबीयांकडेच होते. दुसरे कारण असे की, कंपनी अत्यंत सुस्थितीत आहे हे दाखविल्यामुळे हजारो कोटी रुपयांचे परकीय भांडवल राजूंना गोळा करता आले. त्याचे आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण झाले की, अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन जेव्हा भारतभेटीवर आले, तेव्हा हैद्राबादमधील सभेत व्यासपीठावर क्लिंटनसोबत बसण्याचा मान एकाच भांडवलदाराला मिळाला व तो म्हणजे रामलिंग राजू यांना..
उत्पादन क्षेत्रातील सर्वसाधारण कंपनीचे बॅलन्स शीट तयार करताना मशिनरीची किंमत, मालाची किंमत, निर्मितीच्या निरनिराळ्या टप्प्यांत असलेल्या मालांची किंमत, निरनिराळ्या ठिकाणी पडून असलेला माल (इन्व्हेंटरी), निरनिराळ्या व्यय तरतुदी अशा कित्येक बाबींत हिशेबाची मोठी तडजोड करता येते. पण सत्यम ही सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी आहे व तिच्या कामाच्या स्वरूपावरून अशी तडजोड अशक्य वाटते तरीही बॅलन्स शीटमध्येच अशी अफरातफर आहे. कंपनीचे एकूण उत्पन्न, एकूण नफा, एकूण गंगाजळी फार मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे भ्रामक चित्र उभे केले गेले. ही लबाडी वर्षांनुवर्षे चालली होती, पण लबाडी जास्त दिवस चालू शकत नाही. एखाद दिवशी पापाचा घडा भरतोच. स्वत: रामलिंग राजू याबाबतीत आपल्या
वरील पत्रात लिहितात, ‘‘मी या लबाडीच्या वाघावर स्वार तर झालोय, पण या वाघावरून उतरायचे कसे ते समजत नाही; त्यामुळे हा वाघ मला आता खाऊन टाकेल.’’ राजूंना या वाघाने खायलाच हवे. कारण या सर्व भ्रष्टाचारात लाखो मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. कित्येकांची आयुष्याची कमाई यात बुडाली आहे तर ५३००० कामगारांचे भवितव्य अधांतरी आहे. या कंपनीला या संकटातून बाहेर काढावे लागेल व त्यासाठी भारत सरकारला हजारो कोटी रुपयांचा भरुदड सहन करावा लागेल. त्याचा परिणाम सर्वसामान्य भारतीय जनतेला भोगावा लागणार आहे. अंदाजपत्रकात समाजोपयोगी योजनांवर होणाऱ्या खर्चावर कात्री लावावी लागते. गावोगावी वीज, रस्ता, पाणी याची सोय व्हायला हवी. अशा भांडवलदारांच्या लबाडीमुळे ती करता येत नाही. या एकूण प्रकारामुळे सर्व जगात भारतीय कंपन्यांबाबतची विश्वासार्हता कमी होईल.
रामलिंगम राजूंना या बाबतीत मदत करणाऱ्या ऑडिटर व अकाऊंटंटना मोकळे सोडता कामा नये. या सर्व प्रकरणात अकाऊंटंट व ऑडिटर यांना निरपराध समजणे म्हणजे शुद्ध दूधखुळेपणा आहे. प्राइस वॉटर हाऊस कूपर्स ही कंपनी हिशेब तपासनीस आहे. कंपन्यांची बॅलन्स शीटस् अकाऊंटंट ऑडिटर अशा प्रकारे दाखवतात की मोठय़ा प्रमाणावर कर बुडवेगिरी करायला मोठय़ा प्रमाणात भांडवलदारांना संधी मिळते. देशाला मिळू शकणारा महसूल मोठय़ा प्रमाणात बुडतो. त्यामुळे या अकाऊंटंट ऑडिटरवर्गाला फौजदारी गुन्ह्यात ओढले पाहिजे.
असा अंदाज आहे की, राजूंवर खटला दाखल झाला तर जास्तीत जास्त १० वर्षे सजा होईल व फक्त २५ कोटी रुपये दंड होईल. काही दिवसांपूर्वी हजारो कोटी रुपयांचा टेलिफोन महसूल बुडविल्याबद्दल अंबानीला फक्त १८० कोटी रुपये दंड सुप्रीम कोर्टाने केला होता. राजूच्या सत्यम कंपनीच्या अमेरिकेत डिपॉझिटरी रिसिटस्, न्यूयॉर्कच्या शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत. या एडीआरच्या किमती ढासळून खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे अमेरिकन सरकार राजूंवर खटला दाखल करायच्या विचारात आहे. या खटल्यात मात्र राजूंना २५ वर्षे कैद व हजारो कोटी रुपयांचा दंड होईल; परंतु सत्यम कंपनीने डायरेक्टर्स व ऑफिसर्स यांना कोर्टाच्या खटल्यासाठी विम्याचे संरक्षण पुरवले आहे. टाटा ए.आय.जी. या विमा कंपनीने हे संरक्षण दिले आहे. सुमारे ३००० (तीन हजार) कोटी रुपयांपर्यंत हे संरक्षण पुरवले जाईल. म्हणजे एका भांडवलदाराने भानगड करायची व दुसऱ्या भांडवलदाराने जनतेकडून जमविलेल्या पैशाने त्यांची सुटका करायची. दोन्हीकडून जनतेची लुबाडणूक. भांडवलशाहीचे हे नावीन्यपूर्ण नमुने आहेत.
राजू कुटुंबीयांनी हा सर्व पैसा दक्षिण भारतात जमिनी घेण्यासाठी वापरला आहे. त्यांच्या मालकीची ६५०० हेक्टर जमीन आहे, तसेच राजकारणी माणसांनाही त्यांनी मोठय़ा प्रमाणात मदत केली आहे. आजच्या दहशतवादी वातावरणात आर्थिक घोटाळ्यांना आता दुसरेही अंग प्राप्त झाले आहे. या दहशतवाद्यांना आर्थिक घोटाळ्यातून आर्थिक मदत होत असते. त्यामुळे आर्थिक घोटाळे देशाच्या दृष्टीने जास्तच घातक आहेत. श्रीलंकेतल्या लिट्टेला दक्षिण भारतातून पैसा पुरवला जातो हे उघड गुपित आहे.
खासगीकरणाच्या गोडव्याचे तुणतुणे वाजवणारे अर्थतज्ज्ञ अमेरिकेत मंदी आल्यापासून चूपच आहेत. त्यांना राजूनेही चपराकच दिली आहे. नवीन आर्थिक धोरणाने राष्ट्राची खरोखरच प्रगती झाली आहे की ही प्रगतीची आकडेवारीही अशीच सत्यमसारखी असत्यम आहे, अशा शंकेची पाल मनात चुकचुकते.
एस. एस. यादव