Leading International Marathi News Daily                                  मंगळवार, १३ जानेवारी २००९

ए. आर. रेहमानला ‘ गोल्डन ग्लोब ’ ‘ स्लमडॉग मिलियनर ’ ला चार पुरस्कार
न्यूयॉर्क , १२ जानेवारी/पी.टी.आय.

फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या ‘ ऑस्कर ’ पारितोषिकाचे चित्र स्पष्ट करणाऱ्या , ऑस्करइतकेच महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ‘ हॉलीवूड फॉरिन प्रेस असोसिएशन ’ चे ‘ गोल्डन ग्लोब ’ पारितोषिक भारताकडे आणण्याचा इतिहास पश्चिमेत ‘ मोझार्ट ऑफ मद्रास ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगीतकार ए.आर. रेहमान यांनी आज घडवला. ‘ स्लमडॉग मिलियनर ’ या चित्रपटासाठी दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नावांना मागे टाकत रेहमान यांनी ‘ गोल्डन ग्लोब ’ वर पहिल्यांदा भारतीय पताका फडकविण्याचा मान मिळविला. गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी ‘ स्लमडॉग मिलियनर ’ या चित्रपटाला रेहमान यांच्यासह चार नामांकने जाहीर झाल्यापासून , सर्व भारतीयांची या पारितोषिकाबाबतची उत्सुकता वाढली होती. पुढील महिन्यात होणाऱ्या ‘ ऑस्कर ’ साठी दावेदार मानले जाणारे रेहमान यांचे ‘ जय हो ’ हे गाणे ‘ गोल्डन ग्लोब ’ मध्ये आपला ठसा उमटवील की नाही , याचा निकाल जाणून घेण्यासाठी भारतीयांनी पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यात सोमवारची सकाळ खर्च केली होती. पण त्यांची अर्थातच यावेळी निराशा झाली नाही.

‘पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही’
जयपूर, १२ जानेवारी/पी.टी.आय
.
प्रकृती व्यवस्थित राहिल्यास आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार बोलून दाखवणारे माजी उपराष्ट्रपती व भाजप नेते भैरोसिंह शेखावत यांनी आपण पंतप्रधानपदासाठी इच्छुक नसल्याचे आज जाहीर केले. शेखावत यांनी निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली होती. पंतप्रधानपदासाठी इच्छुक असल्याचे आपण कधीही म्हणालो नव्हतो असे सांगून ते म्हणाले की, हे सगळे प्रसारमाध्यमांनी रचलेले वक्तव्य आहे. शेखावत यांनी कोटा येथे नुकतीच भेट दिली असताना असे म्हटले होते की, अनेक लोकांनी मला लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी गळ घातली आहे पण प्रकृती ठीक राहिली तर मी ही निवडणूक लढवीन. वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे यात शंकाच नाही कारण लोकांची तशी इच्छा आहे. त्यांच्या इच्छेचा मान राखणे माझे कर्तव्य आहे, असे असले तरी माझ्या तंदुरुस्तीवर बरेच काही अवलंबून आहे. निवडणुकीसाठी मी कुणाकडे तिकीट मागायला जाणार नाही. लोक सांगतील तेथून उभा राहीन. प्रकृती व्यवस्थित राहिल्यास लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा करून शेखावत यांनी खळबळ उडवून दिली. भाजप नेते व पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांना आव्हान देण्याच्या इराद्याने त्यांनी हे वक्तव्य केले असा अर्थ त्यातून काढण्यात आला होता.
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत विचारले असता शेखावत म्हणाले की, मी याबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र पाठवले असून काँग्रेसने निवडणूक प्रचाराच्या वेळी राजे यांच्यावर जो २२ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे त्याची तातडीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. शेखावत म्हणाले की, सत्तेवर आल्यानंतर गेहलोत यांचे सरकार या भ्रष्टाचाराच्या आरोपावर शांत झाले आहे, त्यामुळे भ्रष्टाचाराचे हे आरोप तातडीने सिद्ध करा कुठला आयोग नेमण्याच्या भानगडीत पडू नका कारण त्याला फार वेळ लागतो असे गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला कळवले असल्याचे ते म्हणाले.

शिबू सोरेन यांचा अखेर राजीनामा
रांची, १२ जानेवारी/पी.टी.आय.

झारखंडमधील पाच दिवस चाललेले राजकीय नाटय़ अखेर आज शिबू सोरेन यांच्या राजीनाम्याने संपुष्टात आले. सोरेन यांचे सहकारी व उपमुख्यमंत्री स्टीफन मरांडी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तमार विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सोरेन यांचा पराभव झाल्यावर राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर सर्व बाजूने दबाव येत होता. शिबू सोरेन यांचा व मरांडी यांचा राजीनामा आज राज्यपालाकडे सादर झाला असून सोरेन यांचा राजीनामा स्वीकारल्याचे राज्यपाल सईद सिले रिझवी यांनी सांगितले. मरांडी यांनी सोरेन यांच्या राजीनाम्यासाठी आग्रह धरला होता. राज्यपाल रिझवी यांनी सोरेन यांचा राजीनामा मंजूर केला, असला तरी राज्यात कोणता निर्णय घेणार हे स्पष्ट केलेले नाही. घटनात्मक तरतुदी आणि अन्य बाबी विचारात घेऊन यासंबंधीचा निर्णय आपण घेऊ असे त्यांनी सांगितले. राजीनामा सादर केल्यावर पत्रकारांशी बोलताना श्री सोरेन म्हणाले, की झारखंड मुक्ती मोर्चाने मुख्यमंत्रिपदासाठी चंपाई सोरेन यांचे नाव निश्चित केले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेत्यांना आपण या निर्णयाची माहिती दिली असून आता निर्णय घेण्याची त्यांची जबाबदारी आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आपल्या निर्णयात बदल करणार नाही जर चम्पाई सोरेन यांचे नाव संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेत्यांना मान्य झाले नाही तर आमच्या पक्षाची निवडणुकांना सामोरे जायची तयारी आहे.
सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने त्यांची पाच महिन्यांची अल्पकाळाची सत्ता संपुष्टात आली आहे. केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून सोरेन यांना सलगपणे त्या पदावर राहता आलेले नाही. २००० मध्ये झारखंड राज्याची निर्मिती झाल्यापासून मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न होते. २००५ मध्ये मार्च महिन्यात त्यांना अवघ्या नऊ दिवसांसाठी मुख्यमंत्रिपद मिळाले होते. केंद्रीय मंत्रिमंडळात दोनदा त्यांना वेगवेगळ्या कारणासाठी राजीनामा द्यावा लागला होता. शशीनाथ झा यांच्या खूनप्रकरणी त्यांना एक वर्ष तुरुंगात काढावे लागले होते. त्यानंतर या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यावर २७ ऑगस्ट २००७ मध्ये त्यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली होती.

विधानसभेला भाजप एकही जागा वाढवून मागणार नाही
मुंबई, १२ जानेवारी/प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप एकही जागा शिवसेनेकडे वाढवून मागणार नाही. तसेच त्यांच्या विद्यमान आमदारांपैकी एकाचीही जागा द्यावी याकरिता आग्रह धरणार नाही, अशी स्पष्टोक्ती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली व लोकसभा निवडणुकीत ‘फिफ्टी-फिफ्टी’ जागावाटप करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. शिवसेना-भाजप युतीमध्ये एकमेकांच्या ताकदीचे मोजमाप करण्याची पद्धत नाही. जी काही ताकद आहे ती युतीची ताकद असून एकमेकांना सांभाळून घेतले पाहिजे, असा टोलाही मुंडे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना लगावला.

महापूर, दुष्काळाचे तडाखे अन् प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट!
सातारा जिल्ह्य़ात पश्चिमेला कोयना धरणाच्या विस्तीर्ण जलाशयामुळे दुर्गम भागात दळणवळणाच्या गंभीर समस्या आहेत. पावसाळ्यात लाँच बंद असतात, तेव्हा लोकांना औषधोपचाराविना मरणयातना सोसाव्या लागतात. दुसरीकडे पूर्व भागात नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण होत नसल्याने प्रकल्प खर्चात वाढ होत आहे. येथील पाण्याचे दुर्भिक्ष संपवून पाण्याचे समान वाटप कधी होणार, याची वाट पाहात तेथील जनता दुष्काळात होरपळत आहे.

विप्रो, मेगासॉफ्टला वर्ल्ड बँकेची चपराक
नवी दिल्ली, १२ जानेवारी/पी.टी.आय.

सत्यम या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने केलेल्या महाघोटाळ्याची धुळवड अजून खाली बसलेली नसतानाच जागतिक बँकेने आज विप्रो टेक्नॉलॉजीज्सह पाच भारतीय कंपन्या आणि एका भारतीय उद्योजकावर कारवाई करून बँकेसमवेत त्यांनी व्यवहार करणाऱ्यावर बंदी लागू केली आहे. या सर्व कंपन्यांनी कन्सलन्सी मार्गदर्शक तत्वांचा भंग करून घोटाळ्याचे व्यवहार चालविल्याने तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांना गैरमार्गाने सवलती देण्याचे प्रकारही या कंपन्यांनी चालविल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांच्यासमवेत व्यवहार करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे जागतिक बँकेने नमूद केले आहे.

बलाढय़ ‘इस्पात इण्डस्ट्रिज’ची वडखळ ग्रामपंचायतीपुढे माघार
मुंबई, १३ जानेवारी/प्रतिनिधी

वर्ष १९९४-९५ ते २००४-०५ या काळासाठीच्या थकित घरपट्टीपोटी १६.५४ लाख रुपयांची रक्कम भरण्याच्या बाबतीत ‘इस्पात इन्डस्ट्रिज लि.’ या बलाढय़ उद्योग समूहाने रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील वडखळ ग्रुप ग्रामपंचायतीपुढे अखेर माघार घेतली असून ग्रामपंचायतीच्या करवसुलीच्या विरोधात उच्च न्यायालयात केलेली रिट याचिका मागे घेतली आहे.

अ. भा. मराठी साहित्य संमेलन २० ते २२ मार्चला
मुंबई - यंदाचे ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २० ते २२ मार्च या कालावधीत महाबळेश्वर येथील पोलीस ग्राऊंड मैदानात होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आज दिली. महाबळेश्वर सारख्या छोटय़ा गावात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा हा ‘प्रयोग’ असल्याचेही ते म्हणाले.

वाहतूकदारांचा देशव्यापी संप मागे
नवी दिल्ली, १२ जानेवारी/पीटीआय

ऑल इंडिया मोटर्स ट्रान्स्पोर्ट काँग्रेसचे प्रतिनिधी आणि सरकारदरम्यान आज झालेल्या वाटाघाटीनंतर गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला मालवाहतूकदारांचा संप अखेर मागे घेण्यात आला. डिझेलवरील विक्रीकर रद्द करावा या व अशा अनेक मागण्यांसाठी गेल्या आठवडय़ाभरापासून संपूर्ण देशभर मालवाहतूकदारांचा संप चालू होता. या संपामुळे जीवनावश्यक वस्तू तसेच सिमेंट, लोखंड, रेती यांच्या पुरवठय़ावर विलक्षण परिणाम झाला होता. भाज्या, कांदे-बटाटे यांचे भाव गगनाला भिडले होते. अशा परिस्थितीत काल महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक अशा काही राज्यांतील वाहतूकदारांच्या संघटनांच्या प्रतिनिधींची आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा होऊन या राज्यांतील वाहतूकदारांनी संप मागे घेतला होता. आज केंद्र सरकारशी देशव्यापी संपाच्या वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी दोनवेळा चर्चा केली. दुसऱ्या फेरीअखेर ‘देशव्यापी संप मागे घेण्यात आला आहे’, अशी घोषणा वाहतूक सचिव ब्रह्मदत्त यांनी केली. मात्र सरकार आणि मालवाहतूक संघटनेच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत नेमक्या कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या याची सविस्तर माहिती ते देऊ शकले नाहीत. दरम्यान, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत अडथळे निर्माण केल्याच्या आरोपावरून रासुकाखाली अटक करण्यात आलेल्या वाहतूकदार संघटनेच्या नेत्यांसह सहाजणांना आज दिल्लीच्या न्यायालयाने जामीन नाकारला. दिल्ली पोलिसांनी शनिवारी ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष चरणसिंग लोहारा यांच्यासह पाचजणांना रासुका लावला होता. त्यांना आज महानगर दंडाधिकारी दीपक दाबास यांच्यासमोर उभे करण्यात आले असता त्या सहा जणांना जामीन नाकारण्यात आला.

म्हाडाची घरे शंभर टक्के मराठी माणसांसाठीच हवी; राज ठाकरे यांचा इशारा
मुंबई, १२ जानेवारी/ खास प्रतिनिधी

मुंबईतील म्हाडाच्या नव्या सोडतीतील ऐंशी टक्के घरे मराठी माणसांनाच मिळाली पाहिजेत, अशी भूमिका आज शिवसेनेने घेतलेली असतानाच म्हाडाची शंभर टक्के घरे मराठी माणसांसाठीच हवीत, अशी जोरदार मागणी करीत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. शिवाजी पार्कवर आयोजित प्रतिकोल्हापूर महोत्सवात बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबतची घोषणा येत्या २४ जानेवारी रोजी ठाणे येथील सेंट्रल मैदानावर करू, असेही जाहीर केले. या मुंबईत उत्तर प्रदेश भवन होते, बिहार भवन उभे राहते मात्र कोल्हापूर भवन उभे करण्यासाठी राज्यकर्ते जमीन देत नाहीत, असे टीकास्त्र सोडत राज म्हणाले की, या मुंबईवर बाहेरून येणाऱ्यांपेक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांचा हक्क आहे. या प्रत्येक जिल्ह्याचे भवन येथे उभे राहिले पाहिजे असे राज म्हणाले. मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर काही जणांनी ‘व्हेअर इज राज ठाकरे’ असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांना मी सांगू इच्छितो की, हियर इज राज ठाकरे, असे उद्गार राज यांनी काढले. येत्या २४ जानेवारी रोजी ठाणे येथील सेंट्रल मैदानावर मनसेची जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी माझी भूमिका मी विस्ताराने सांगेन.

सत्यम वगळता सर्व आय.टी. कंपन्यांच्या समभागांची घसरण
व्यापार प्रतिनिधी - जागतिक बँकेने देशातील पाच आय.टी. कंपन्यांवर बंदी घातल्याने मुंबई शेअर बाजारात आज आय.टी. कंपन्यांच्या समभागांची मोठी घसरण झाली. सेन्सक्सची आज ३०० अंशांनी घसरण झाली असताना सत्यम मात्र ४४ टक्क्यांनी वधारला. आज बंदी घातलेल्या आय.टी. कंपन्यांच्या समभागांची मोठी घसरण झाली. त्यात विप्रोची आघाडी होती. हा समभाग ९.३० टक्क्यांनी घसरुन २२७ रुपयांवर स्थिरावला. तर मेगासॉफ्टचा समभाग १३ टक्क्यांनी घसरला. आय.टी. कंपन्यांतील ही घसरण सुरुच राहील, असा अंदाज आहे. सत्यमच्या संचालक मंडळावर नव्या सदस्यांची नियुक्ती झाल्याने या समभागांना मागणी होती. त्यामुळे हा समभाग तब्बल ४४ टक्क्यांनी वाढला. सध्याच्या आर्थिक स्थितीचे दीर्घकालीन परिणाम भोगावे लागणार असून विकासाचा वेग झपाटय़ाने उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात निराशेचे वातावरण होते.

नांदेड आयुक्तालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान
औरंगाबाद, १२ जानेवारी/खास प्रतिनिधी

औरंगाबाद विभागीय महसूल आयुक्तालयाचे विभाजन करून नांदेड विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर उद्या (मंगळवारी) न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास व न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. एकूण तीन याचिका सादर करण्यात आल्या आहेत. लातूरचे वकील समद रज्जाक पटेल व उदय गोविंद गवारे, परभणीचे आमदार सुरेश देशमुख आणि स्वातंत्र्यसैनिक आर. डी. देशमुख यांनी याचिका केल्या आहेत. त्यामध्ये राज्याचे मुख्य सचिव, मुख्यमंत्री, महसूल व वन विभागाचे प्रधान सचिव आणि विभागीय आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. पटेल व गवारे यांच्या याचिकेत म्हटले आहे की, औरंगाबाद महसूल आयुक्तालयात आठ जिल्ह्य़ांचा समावेश होता. विभागीय आयुक्तालय स्थापन करणे गरजेचे होते. सरकारने विभागीय आयुक्त कार्यालय स्थापण्याच्या दृष्टीने पावले उचलली होती. काही विभागांची कार्यालये लातूर आणि नांदेड या जिल्ह्य़ांमध्ये कार्यान्वित झाली आहेत. लातूरमध्ये तर २२ खात्यांची कार्यालये एकाच इमारतीत असावीत यासाठी विभागीय कार्यालयाच्या इमारतीचे बांधकामही सुरू झाले आहे. त्यावर कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आला आहे.

सलमानच्या ‘शेरा’मुळे हृतिक, करिश्माभोवती कारवाईचा फेरा!
समर खडस, मुंबई, १२ जानेवारी

शांततामय आणि वादातीत आयुष्य सलमान खानच्या नशिबीच नसावे बहुदा! आता तो सगळ्यांशी नीट वागतोय, कुणाशीही भांडण, तंटे न करता जगतोय. सल्लू बराच सुधारलाय, असे वाटत असतानाच आता त्याचा शेरे बब्बर अंगरक्षक शेरामुळे सलमान स्वत: तर अडचणीत येणारच आहे पण त्याच्या बरोबरच हृतिक, करिश्मा कपूर, साजीद नाडियादवाला आदी बडय़ा बडय़ा आसामीही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शेरा गेली अनेक वर्षे टायगर सिक्युरिटी या आपल्या एजन्सीमार्फत बॉलीवूडमधील अनेक बडय़ा सिताऱ्यांना सुरक्षा पुरवित आहे. मात्र महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण कायदा १९८१ कायद्यानुसार खाजगी सुरक्षा रक्षक सेवा सुरू करायची असल्यास त्याला सरकारची परवानगी लागते. या कायद्याच्या कलम २३ नुसार ही परवानगी देण्याचे अधिकार सरकारला आहेत. मात्र कायद्याचा मूळ उद्देश हा ज्यांचे वेतन सरकारच्या सुरक्षा रक्षक बोर्डापेक्षा अधिक आहे, अशांसाठीच कलम २३ची सोय ठेवण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा घेऊन महाराष्ट्रात ३०० ते ४०० खाजगी सुरक्षा रक्षक सेवा पुरविणाऱ्या कंपन्या सुरू असून त्यांनी कामगारांना अत्यंत तुटपुंजे वेतन देऊन भरपूर कमाई केली आहे. त्यामुळे सध्या ३०० ते ४०० नवे अर्ज सरकारकडे पडून असूनदेखील नव्या सुरक्षा रक्षक एजन्सींना परवानगी मिळत नाही. शेरा याने त्याच्या टायगर एजन्सीसाठी सरकारकडे अर्ज केला आहे. या अर्जात त्याचा उत्तर प्रदेश येथील जो पत्ता दिला आहे तोदेखील चुकीचा असल्याचे सुरक्षा रक्षक बोर्डातील अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले. मुख्य म्हणजे कायदेशीर परवानगी नसताना सुरक्षा पुरविता येत नाही. मात्र कायद्यानुसार अशी सुरक्षा एजन्सी चालविणाऱ्याला कोणतीही शिक्षा करता येत नाही. हे सुरक्षा रक्षक भाडय़ाने घेणाऱ्याला म्हणजे मुख्य मालकावरच कारवाई होऊ शकते. कायद्यानुसार बेकायदा एजन्सीचे सुरक्षा रक्षक घेतल्यास मूळ मालकाला जितके दिवस ते रक्षक ठेवले असतील तितक्या दिवसांचा म्हणजे प्रत्येक दिवसाला ५०० रुपये प्रमाणे दंड वसूल करता येतो अथवा सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास वा दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात. शेराच्या टायगर एजन्सीचे रक्षक हृतिक रोशन, करिश्मा कपूर, साजीद नाडियादवाला यांना सुरक्षा पुरवतात, याचे बोर्डाकडे पुरावे आहेत. त्यामुळे सलमानसकट या सगळ्या बडय़ा सिताऱ्यांवर कारवाईची तयारी सुरक्षा रक्षक बोर्डातर्फे केली जात आहे.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८