Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
व्यापार - उद्योग
एअरटेलचे ‘लाइफटाइम प्रीपेड’ आता केवळ ९९ रुपयांत
 
व्यापार प्रतिनिधी: मोबाईल फोनची वाढत्या लोकप्रियतेबरोबरच किफातयशीरताही वाढत चालली असल्याचा प्रत्यय देणारी घोषणा ‘एअरटेल’ या सेवा पुरवठादारांनी केली आहे. एअरटेलची आजीवन प्रीपेड जोडणी आता केवळ ९९ रुपयांमध्ये उपलब्ध झाली आहे. प्रारंभी केवळ ९९ रुपये खर्च केल्यानंतर, दर १८० दिवसांनी २०० रुपयांचे किमान रिचार्जिग करून मोबाईलधारकांना आजीवन वैधता मिळविता येणार आहे. प्रीपेड क्षेत्रात एअरटेलने टाकलेल्या या नव्या पावलाचे अन्य मोबाईल सेवा पुरवठादारांकडून अनुकरण केले जाणे अपेक्षित आहे.
प्रारंभी केवळ ९९ रु. खर्च करून आजीवन मोबाईल वैधता मिळवून देणारी ही योजना एअरटेलच्या ग्रामीण भागातील विस्तारावर भर देणाऱ्या धोरणासाठी खूपच पूरक ठरेल, असा विश्वास भारती एअरटेलचे महाराष्ट्राचे सीईओ मनू तलवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात बीएसएनएलपाठोपाठ मुंबईव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळात विस्तार असणारी ही एअरटेल ही दुसरी मोठी सेवा आहे. मोबाईलची व्याप्ती ग्रामीण भागात जशी वाढत आहे, तसे नव्या ग्राहकांना सुरुवात करताना अत्यंत परवडणारा दर मिळावा, असा या योजनेमागील एअरटेलचा हेतू असल्याचे तलवार यांनी स्पष्ट केले. या दरयोजनेत प्रति कॉल्स दर व एसएमएसच्या शुल्कात मात्र कोणतेही बदल केले गेलेले नाहीत.

व्होक्सवॅगन इंडियाचे २००९ मध्ये ४० डीलरशिपचे लक्ष्य
व्यापार प्रतिनिधी: भारतात नव्याने प्रवेश करणाऱ्या व्होक्सव्ॉगन इंडियाने सरलेल्या २००८ सालात १५ डिलरशिप्सचे उद्दिष्ट पूर्ण केले असून, २००९ सालाचा प्रारंभ पुणे शहरात आपल्या अधिकृत डीलरच्या नियुक्तीने केला आहे. या व्यतिरिक्त व्होक्सव्ॉगनच्या सध्या दिल्ली, एनसीआर, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चंदिगड, लुधियाना, जयपूर, कोचीन, चेन्नई, अहमदाबाद, लखनऊ, गोवा आणि कोलकाता येथे डिलरशिप्स आहेत. चालू वर्षांच्या अखेपर्यंत आणखी २५ म्हणझे एकंदर ४० डिलर्सच्या नियुक्तीची कंपनीची योजना आहे, अशी माहिती व्होक्सव्ॉगन ग्रुप इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जोअर्ग म्युलर यांनी दिली. व्होक्सव्ॉगनची पुण्यातील डिलरशिप वाघोली येथील नगर रोड येथे आलिशान शोरूमद्वारे सुरू झाली आहे.

फॅशन ज्वेलरीचे गोरेगावमध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शन
व्यापार प्रतिनिधी: फॅशन्सच्या चमकदार दुनियेतील देशातील व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित ब्रॅण्ड्सचा मेळा येत्या २२ ते २५ जानेवारी २००९ दरम्यान आयोजित होत असलेल्या ‘इंडिया इंटरनॅशनल फॅशन ज्वेलरी अ‍ॅण्ड अ‍ॅक्सेसरीज् शो २००९’ प्रदर्शनात एकत्र येत आहे. हे चार दिवसांचे प्रदर्शन गोरेगाव (पूर्व) येथील मुंबई एक्झिबिशन सेंटरच्या हॉल क्रमांक पाचमध्ये सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुले असेल.
सलग तिसऱ्या वर्षी आयोजित होत असलेले आणि सुमारे १०० हून अधिक स्टॉल्स असणारे हे देशातील आभूषण क्षेत्रातील सर्वात मोठे ‘बी टू बी’ धाटणीचे व्यापार प्रदर्शन आहे. स्वारावोस्की, सिया, एस्टील, आर्ट ग्रुप, माही, अ‍ॅलेक्स इंटरनॅशनल या भारतातील ब्रॅण्ड्ससह, दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, कोरिया, बँकॉक आणि श्रीलंका या देशातील अनेक नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. रॅडियन्ट इव्हेन्ट्झकडून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून, या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक देवराज जैन यांनी सांगितल्याप्रमाणे, भारतात इमिटेशन ज्वेलरीचे उत्पादन व बाजारपेठ जगात सर्वात मोठी असून, नव्या कंपन्यांनाही संधीही मोठी आहे. नव्या कंपन्यांच्या प्रवेशासाठी हे प्रदर्शन म्हणजे उत्तम व्यासपीठ ठरेल. मंदीसदृश्य वातावरण असताना आर्थिक वर्ष २००९ मध्ये भारतातील इमिटेशन ज्वेलरी व्यवसायातील उलाढाल आधीच्या वर्षांतील ६०० कोटींच्या तुलनेत रु. १५०० कोटींवर जाणे अपेक्षित आहे.