Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
अग्रलेख

‘सारेगमप’चे पंचप्राण

 

झी मराठी वाहिनीवरील ‘आयडिया सारेगमप’ मधील ‘लिटल् चॅम्पस्’च्या गोड मुलांनी अवघ्या महाराष्ट्रावर इतकी मोहिनी घातली आहे, की त्यातील प्रत्येक स्पर्धक हे तमाम मराठी माणसांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. केवळ मराठीच नव्हे तर सर्वभाषिक संगीतप्रेमींना त्यांच्याबद्दल विलक्षण जिव्हाळा वाटू लागला आहे. आजपर्यंत कोणत्याही टी. व्ही. कार्यक्रमाने अशा रीतीने सर्वाना झपाटून टाकले नव्हते. ‘स्पर्धा’ आणि ‘सवरेत्कृष्ट’ मुलाची वा मुलीची निवड या दोन्ही बाबींची रुक्ष (आणि क्रूर!) सीमा या कार्यक्रमाने केव्हाच ओलांडली आहे. ‘सापशिडी’तील गंमत तर बहुसंख्य प्रेक्षकांना जाचक वाटू लागली आहे. या ‘स्पर्धेतील’ सातांमधून पाच जण महाअंतिम फेरीत आले आणि आता तर त्या पाचांमधूनही सवरेत्कृष्ट कलाकाराची निवड होणार, हे जाहीर होऊ लागल्यापासून असंख्य रसिकांच्या जिवाचे पाणी पाणी होऊ लागले आहे. आता ही ‘स्पर्धा’ केवळ ‘झी वाहिनी’च्या संयोजकांच्या कक्षेतील बाब राहिलेली नसून ती सर्व प्रेक्षकांच्या प्रांगणात आली आहे. म्हणूनच आम्ही रसिकांचा अनभिषिक्त अधिकार वापरून संयोजकांना असे सुचवू इच्छितो, की त्यांनी या कार्यक्रमातील स्पर्धात्मकता पूर्णपणे झुगारून देऊन कुणालाही ‘बाहेर’ न पाठविता सर्वाना महाअंतिम फेरीतील ‘विजेते’ म्हणून जाहीर करावे. खरे तर ‘विजेते’ ही संज्ञाही या मुलांनी घराघरात आणलेल्या चैतन्याला छेद देणारी आहे. ‘सारेगमप’ लिटल् चॅम्पस् हा फक्त ‘रिअॅलिटी शो’ राहिलेला नाही. ‘कौन बनेगा करोडपती’तील करमणूक आणि पैशाचा खेळ किंवा ‘वन डे’ वा ‘ट्वेंटी २०’चे क्रिकेट सामने यात विजेता निवडणे आणि या ‘लिटल् चॅम्पस्’मधून काहींना बाहेर पाठवून विजेता / विजेती घोषित करणे वेगळे. प्रश्न ५० टक्के एसएमएस आणि ५० टक्के परीक्षक या मर्यादेपुरताही उरलेला नाही. त्याचप्रमाणे आणखी काही ज्येष्ठ परीक्षक नेमून त्यांना ‘निवड’ करायला सांगूनही रसिकांचे समाधान होणार नाही. कारण जवळजवळ सर्वानाच असे वाटू लागले आहे, की यापैकी कुणालाही एसएमएसच्या आधारे वा परीक्षकांच्या मतानुसार बाद करणे, ही या कलेची आणि या मुलांच्या अक्षरश: अचाट कलागुणांची क्रूर थट्टा ठरणार आहे. ही भावना अर्थातच सुरुवातीला नव्हती. कार्यक्रम या टप्प्यापर्यंत येईस्तोवर अनेक रसिकांनी त्याचे ‘स्पर्धात्मक’ स्वरूप गृहीत धरले होते, परंतु सात जण उरले आणि त्यातूनही काही स्पर्धेच्या बाहेर पडू लागले, तेव्हा बहुतेकांच्या हृदयाचा ठोका चुकायला सुरुवात झाली. ‘लोकसत्ता’कडे येणाऱ्या हजारोंच्या प्रतिक्रिया विचारात घेऊन मगच आम्ही हे आवाहन, या कार्यक्रमाच्या संयोजकांना सर्व रसिकांच्या वतीने करायचे ठरविले. अंतिम निर्णय ‘झी’च्या संयोजकांचा असला तरी तो औपचारिक आहे आणि त्या निर्णयाला ‘एसएमएस’चे व्यापारी वळण आहे. शिवाय हे ‘एसएमएस’ रसिकांचा कौल दर्शवत नाहीत तर ‘संघटित’ शक्तीचे प्रदर्शन करतात. या संघटितपणाचा बाज कधी प्रांताच्या तर कधी जिल्ह्य़ाच्या, कधी जातीच्या तर कधी आणखी कुठच्या तरी संकुचित अस्मितेच्या दिशेने जातो. हे वळण तर विशेष घातक आहे. हरिप्रसाद चौरसिया यांनी म्हटल्याप्रमाणे, फुलांच्या बहारदार बगीचामध्ये त्या फुलांची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून ‘स्पर्धा’ घेता येणार नाही आणि ‘क्रमवारी’ ठरविता येणार नाही. तसा प्रयत्नही करणे त्या निसर्गावर, त्या फुलांवर अन्याय करणारे ठरेल. शंकर महादेवन आणि हरिहरन यांनीही अशाच प्रकारचे मत व्यक्त केले आहे. हे ‘लिटल् चॅम्पस्’ अजून व्यावहारिक जगाच्या कठोर स्पर्धेत यायचे आहेत. त्यांचे शालेय जीवन संपले, की त्या (अपरिहार्य आणि दुर्दैवी) संघर्षांत त्यांना उतरावेच लागेल, परंतु आजच त्यांच्यावर ते ‘अॅडल्टहूड’ लादून त्यांना त्या तथाकथित ‘वास्तव’ जीवनाची ओळख करून द्यायचे कारण नाही. त्या ‘वास्तवा’चीही तशी ओळख, त्या मुलांना या सर्व कार्यक्रमाच्या प्रसिद्धीमुळे आणि त्याबद्दलच्या अटीतटीच्या चर्चामुळे झाली आहेच. कला आविष्कारातून मिळणारा निखळ आनंद आणि स्पर्धेत प्रथम आल्यामुळे मिळणारा आनंद या दोन वेगळ्या बाबी आहेत. प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून तर निखळ कलानंदाचे ते अवमूल्यन आहे. हे सर्व ‘लिटल् चॅम्पस्’ सर्वसामान्य माणसांमधून आलेले आहेत. त्यांच्यापैकी कुणालाही पैशाचे, कौटुंबिक प्रतिष्ठेचे, मेट्रोपोलिटन सेलेब्रिटी वर्तुळाचे, सत्तेचे वलय नव्हते. (आता मात्र भल्या भल्या सेलेब्रिटीज्ना या लहान चॅम्पियन्सनी मागे टाकले आहे. हल्ली तर लोक एखादा पत्ता सांगताना आम्ही ‘मुग्धा वैशंपायनच्या गावात’ वा ‘कार्तिकी गायकवाडच्या तालुक्यात’ राहतो, असे सांगू लागले आहेत. त्यांच्या शाळा, शेजारी, नातेवाईक, गाव, जिल्हा असे सर्व काही त्या सेलेब्रिटीच्या झगमगाटात आले आहेत.) या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे जे मान्यवर अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्याबरोबर आले, ते सर्वजण या मुलांच्या आवाजाने, सूर जाणिवांमुळे, निरागसपणामुळे आणि पाठांतरामुळे इतके स्तिमित झाले, की त्यांनाही ही स्पर्धात्मकता जीवघेणी वाटत आहे. ही मुलं-मुली इतकी उत्तम गातात, इतके परिश्रम घेतात, इतका रियाझ आणि पाठांतर करतात, याचे श्रेय अर्थातच त्यांच्या पालकांना आणि गुरूंनाही आहेच. यात भाग घेतलेल्या सर्व मुलांच्या पालकांमध्येही, ते स्तंभित झाल्याची भावना आहे. विशेष म्हणजे कोणत्याही पालकांनी फक्त आपल्याच मुलाच्या वा मुलीच्या गाण्याची प्रशंसा, खासगीत वा जाहीरपणे केलेली नाही; परंतु जसजशी ही तथाकथित स्पर्धा महा-महाअंतिम टप्प्यात जाईल, तसतशी आपल्या मुलावर, गावावर वा जिल्ह्य़ावर ‘अन्याय’ झाल्याची भावना बळावू लागेल. त्यामुळे या चैतन्यमयी आनंद सोहळ्यानंतर सार्वत्रिक गोडवा आणि समरसतेचा सुगंध मागे राहण्याऐवजी कटुता आणि ‘तू तू-मैं मैं’चे वातावरण निर्माण होईल. झी वाहिनीच्या व्यावसायिकतेलाही ते परवडण्यासारखे नाहीच. (म्हणजेच अगदी धंद्याच्या दृष्टिकोनातूनही विजेता / विजेती जाहीर करणे ‘झी’च्या प्रतिमेला पूरक असणार नाही.) या मुलांच्या सुरेल आवाजाचे व इतक्या गाण्यांचे / पाठांतराचे तसेच ठेक्याचे कौतुक होते आहेच. परंतु तितकेच महत्त्वाचे आहे ते त्यांचे धाष्टर्य़, हिंमत आणि निर्लेप बिनधास्तपणा! या मुलांपैकी कुणीही दिसणारा (वा न दिसणारा कोटय़वधींचा) प्रेक्षक समोर असूनही कधीही दबून गेला नाही, ओळी चुकला नाही, ‘मायक्रोफोन फिअर’ने ग्रासला गेला नाही. बडे बडे संगीतकार, ज्यांची नावेच लेजंडरी आहेत, समोर बसलेले असूनही त्याचे ‘टेन्शन’ त्यांच्यावर आले नाही. (तसे टेन्शन आल्याचे कधी कधी ते सांगत- पण श्रोत्यांना ते जाणवले नाही. त्यांच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा तणाव मात्र जाणवत असे, आणि तो स्वाभाविकच होता.) मोठमोठय़ा नामवंत कलाकारांना, वक्त्यांना वा टी. व्ही. अॅंकर्सनाही इतका सभाधीटपणा नसतो. अवधूत आणि वैशाली यांनी कधीही त्या निरागसतेला आणि धिटाईला छेद जाऊ दिला नाही. त्या मुलांच्या वयाला साजेसा दिलखुलासपणा आणि खेळकर मिश्कील वृत्ती तशीच ठेवली आणि म्हणूनच मुलांनाही मुक्तपणे खुलणे शक्य झाले. पालकांवरही परीक्षकांचे दडपण आले नाही. पल्लवी जोशी तर या सर्व सोहळ्याच्या मुख्य उत्सवमूर्ती होत्या, पण त्यांनीही मुलांच्या कोवळेपणावर कधीही, कुठेही ओरखडाही येऊ दिला नाही. स्वत: सेलिब्रिटी असूनही त्यांनीही त्या मुला-मुलींच्या अंगभूत आविष्काराला उत्स्फूर्तता प्राप्त करून दिली. ‘लिटल् चॅम्पस्’ने ‘झी’ला अपार व्यावसायिक यश प्राप्त करून दिले आहे. त्यात सर्व वाद्यवृंदाने जीव ओतून व कौशल्याने केलेला सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. त्या वाद्यवृंदातील प्रत्येक जण या मुला-मुलींच्या विलक्षण गुणांकडे पाहून अचंबित होत असे. असे ‘रिअॅलिटी शो’ आयोजित करणे आणि ते वेळेनुसार शूट, एडिट आणि प्रेझेंट करणे हे किती जिकीरीचे काम असते, हे लक्षात येत नाही. कार्यक्रमाच्या शेवटी एकापाठोपाठ एक नाव जप म्हटल्याप्रमाणे पडद्यावरून जाते तेव्हा प्रेक्षक टी. व्ही.समोरून उठू लागलेले असतात. पण ही सर्व ‘सर्कस’ परिणामकारकरीत्या उभी केल्याशिवाय असे कार्यक्रम सादर होत नाहीत. बघणाऱ्यांची करमणूक असते, सर्कशीतल्यांचा जीव टांगणीला असतो. हे पंचक ‘झी’ने विजेता / विजती घोषित केल्यास ते व त्यांचे पालक, चाहते या सर्वानी या महा-आयोजनालाही कृतज्ञ राहायला हवे. कोणत्याही यशाच्या मागे असे अनेकांचे श्रम व प्रयत्न असतात. सुदैवाने या ‘लिटल् चॅम्पस्’च्या डोक्यात हवा गेलेली नाही आणि त्यांनी व त्यांच्या पालकांनी ‘झी’च्या प्रयत्नांची तशी नोंद घेतली आहे. या आनंद सोहळ्याला निष्कारण व्यापारी रूप येऊन त्या निरागसतेला गालबोट लागू नये म्हणूनच आम्ही प्रथा व पारंपरिक संकेत मोडून त्या पाचही जणांना महाअंतिम विजेते घोषित करावे, असे रसिकांच्या वतीने आयोजकांना सुचवीत आहोत!