Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

शोध भारतीय रंगतत्त्वांचा!
प्रेमानंद गज्वी हे नाव १९८० च्या दशकात ‘घोटभर पाणी’ या नाटय़कृतीमुळं गाजू लागलं होतं. मराठी रंगभूमीवर अपूर्व असं काही घडलं होतं! मराठीबरोबरच हिंदी, गुजराती, कन्नड, तेलगू, सिंधी, कोंकणी भाषेतही या एकांकिकेनं आपला ठसा उमटविला होता. तो काळ माझ्यासाठी प्रचंड उत्साहाचा होता. मराठी रंगभूमीवर प्रेमानंद गज्वी हे नाव स्थिर होत असतानाच एक नवाच शब्द कानी आदळत होता. तो म्हणजे- ‘भारतीय रंगभूमी!’
काय बरं असते ही भारतीय रंगभूमी? खरं तर ‘भारतीय रंगभूमी’ अशी एखादी वेगळी रंगभूमी अस्तित्वातच नाही. आपल्याकडं आहे ती निव्वळ प्रादेशिक (भाषावादी) रंगभूमी!! मराठी, कन्नड, बंगाली, गुजराती, हिंदी, आसामी वगैरे. आणि तरीही भारतीय रंगभूमीचा विचार करताना विजय तेंडुलकर (मराठी), गिरीश कर्नाड (कन्नड), बादल सरकार (बंगाली), मोहन राकेश (हिंदी) या नावांचा विचार केला जातो. कारण या नाटककारांची नाटकं वेगवेगळ्या भारतीय भाषांतून- विशेषत: हिंदीत अनुवादित झालेली आहेत. त्यांचे त्या- त्या रंगभूमीवर सातत्यानं प्रयोगही झालेले आहेत. आणि मग हळूहळू ही नावं भारतीय रंगभूमीवर प्रस्थापित झाली. असं स्थिरत्व प्रेमानंद गज्वी या नावाला कधी मिळेल काय? मिळेल! पण त्यासाठी माझी नाटकं कुणीतरी अनुवादित करायला हवीत. आणि अनुवाद करणाऱ्याला आधी ती नाटकं महत्त्वाची वाटायला हवीत. त्या अनुवादांचे नंतर नाटय़प्रयोग व्हायला हवेत! या प्रयोगांची नाटय़समीक्षकांनी दखल घ्यायला हवी. आणि मुख्य म्हणजे ते नाटक भारतीय रंगभूमीवरील महत्त्वाचे नाटक म्हणून सर्वमान्य व्हायला हवं! बाप रे! म्हणजे एकूण अवघडच! तसं ‘घोटभर पाणी’ अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालं.

सायबर सुरक्षा
एक नवे आव्हान

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता ‘सायबर वॉर’ होण्याची भीती सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. डिसेंबर महिन्यात पाकिस्तानी हॅकर्सकडून भारताची पूर्व रेल्वेची बेबसाइट हॅक करण्यात आली होती. यानंतर सर्वत्र ‘सायबर वॉर’ची चर्चा सुरु झाली. मात्र या ‘सायबर वॉर’ला गेल्या काही महिन्यांपासूनच सुरुवात झाली आहे. यामुळे आता देशापुढे सायबर सुरक्षेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आयटी क्षेत्राच्या विकासाबरोबरच देशाला आता सायबर सुरक्षेतही मोठय़ाप्रमाणावर गुंतवणूक करण्याची गरज भासणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशा-देशांमध्ये ‘सायबर वॉर’ला सुरुवात झाल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. पाकिस्तानातील हॅकर्सकडून आंध्र प्रदेशमधील गुन्हे अन्वेषण विभागाची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर भारतीय हॅकर्सकडून पाकिस्तान आइल अ‍ॅण्ड गॅस रेग्युलॅरिटी प्राधिकरणाची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानी हॅकर्सनी कुरघोडी करुन भातातील ओएनजीसी, इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ रिमोट संन्सिंग, सेटर फॉर ट्रान्सपोर्टटेशन रिसर्च अ‍ॅण्ड मॅनेजमेंट आणि केंद्रीय विद्यालय, रतलाम यांच्या वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व वेळी करण्यात आलेले हॅकिंग एकदम प्राथमिक पातळीवरचे असल्याने त्यापासून दोनही देशांना मोठी हानी न झाल्याचे समजते. मात्र येणाऱ्या काळात होणाऱ्या ‘सायबर वॉर’ची ही झलक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोणतीही बंधने नसलेले हे युद्ध प्रत्यक्षात आणणे कठीण नसल्याने येणाऱ्या काळत उभय देशांना मोठा धोका असणार आहे तो ‘सायबर वॉर’चा. आज जगातील प्रत्येक देश हा तंत्रज्ञानप्रधान झालेला आहे.

उंबरठा स्पर्धेत महर्षी दयानंदची ‘गाडा’ सवरेत्कृष्ट
उत्कर्ष सेवा मंडळाने स्व. श्रीकांतजी ठाकरे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या उंबरठा एकांकिका स्पर्धेत महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या ‘गाडा’ने सवरेत्कृष्ट एकांकिकेचा बहुमान पटकावला. तर ‘अजातशत्रू, सायन’ संस्थेच्या ‘सहर- एक पहाट’ला द्वितीय आणि ‘आर्टीव्हिटीज, ठाणे’ या संस्थेच्या ‘पाऊस, छत्री आणि ती’ला तृतीय पुरस्कार मिळाला. अन्य पुरस्कारविजेते असे : स्वप्नील हिंगडे (अभिनेता- ‘गाडा’), स्वप्ना जोशी (अभिनेत्री- ‘पाऊस, छत्री आणि ती’), विजय पगारे (लक्षवेधी अभिनेता- ‘सहर- एक पहाट’), वर्षां दांदळे (लक्षवेधी अभिनेत्री- ‘बाप हा बापच असतो’), अमोल भोर (दिग्दर्शक- ‘गाडा’), सचिन गोताड (नेपथ्य- ‘सहर- एक पहाट’), रवि करमरकर (प्रकाशयोजना- ‘सहर- एक पहाट’), सचिन भांगरे (संगीत- ‘गाडा’), सचिन गावकर (लेखक- ‘पाऊस, छत्री आणि ती’). स्पर्धेचे परीक्षक म्हणून जयंत सावरकर, मुकुंद सावंत आणि प्रतिभा पाटील यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण मनसेचे उपाध्यक्ष संजय जामदार आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे उद्घाटन मनसेचे विभाग अध्यक्ष विनायक म्हशीलकर यांच्या हस्ते व माजी महापौर महादेव देवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी प्रभाग समिती अध्यक्ष सुनील शिंदे, भाजपा नेते दत्ताजी राणे, दादा गावकर आदी उपस्थित होते.