Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
लोकमानस

आरक्षणाबाबत सुधारणावादी दृष्टी हवी
मराठा आरक्षणाचा वाद केवळ निवडणुकीत गठ्ठा मते मिळवण्यासाठी चालू आहे. जातीजातींमध्ये भांडणे लावून सत्तेची पोळी भाजणाऱ्या या प्रवृत्तीनेच आपल्या देशाचे, समाजाचे मोठे नुकसान केले आहे. आरक्षणाबाबत खरे तर आधुनिक सुधारणावादी दृष्टिकोनाची गरज आहे.

 


मराठय़ांना आरक्षण द्यायचेच असेल तर मराठा समाजातल्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल व सुधारणांपासून वंचित राहिलेल्या वर्गालाच त्याचा लाभ झाला पाहिजे. मराठय़ांमध्ये ज्यांनी सत्तेची पदे उपभोगली (आमदार, खासदार, जि.प. सदस्य, राज्य व केंद्र शासनातले वर्ग १ व २ चे अधिकारी) त्यांच्या कुटुंबीयांना या सवलतींमधून वगळण्यात यावे. याच धर्तीवर ब्राह्मण, वैश्य यांच्यामध्येही आर्थिक दुर्बल घटक आहेत, त्यांच्याबाबतही शत्रुत्वाची भूमिका बाळगण्याचे कारण नाही. मराठा, ब्राह्मण, वैश्य या उच्चभ्रू समाजांतल्या दुर्बल घटकांसाठीच स्वतंत्र आरक्षण द्यावे. त्याचा कालावधी मात्र निश्चित करण्यात यावा.
हाच निकष कायम ठेवत जातीनिहाय आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या वर्गात ज्यांनी सत्तेची पदे उपभोगली (आमदार, खासदार, जि.प. सदस्य, राज्य व केंद्र शासनातले वर्ग १ व २ चे अधिकारी) त्यांच्या कुटुंबियांना या सवलतींमधून वगळले जावे. ‘आरक्षण’ हे त्या त्या जातीतल्या दुर्बल घटकांसाठीच फक्त असावे. असे झाले तरच मागासलेल्या समाजाच्या उद्धाराची प्रक्रिया सुरू होईल.
दुर्दैवाने आरक्षणाचे समर्थक व विरोधकही केवळ राजकीय स्वार्थासाठी बोलताना दिसतात. त्यातून समाजाला धोकाच अधिक. जातीय अहंकाराचा उन्माद पसरवून आपल्या अवतीभवती खुशामतखोरांची गर्दी जमवणाऱ्या, कर्तृत्वशून्य नेत्यांनी समाजाचे व देशाचे आतापर्यंत मोठे नुकसान केले आहे. आरक्षणाच्या नावाखाली संधिसाधू नेत्यांना रान मोकळे सोडू नये. सामाजिक सलोखा, न्याय व राष्ट्रहित पाहूनच याबाबत सुज्ञांनी निर्णय घ्यावा.
दिनेशचंद्र हुलवळे, घाटकोपर, मुंबई

मोलाचा सल्ला
‘स्टेजवर जाण्यासाठी योग्य वेळ निवडा’- लतादीदी.. या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातमी वाचली. ‘लिटिल चॅम्पस्’ना दिलेला हा मोलाचा सल्ला केवळ त्या बालकलाकारांनाच नाही तर ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या आकर्षणाला भुलणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी मार्गदर्शक आहे. झटपट प्रसिद्धी व पैसा मिळवण्याच्या हव्यासापायी असे कित्येक होतकरू कलाकार ‘रिअ‍ॅलिटी शो’च्या मायाजालात अडकतात. त्यांना प्रसिद्धी आणि पैसाही मिळतो पण ते क्षणिक असते. नंतर तेच ते चेहरे या कार्यक्रमातून त्या कार्यक्रमात दिसू लागतात.
वाहिन्यांच्या स्पर्धेत कलाकारांची फरपट होते. अशाच एका कार्यक्रमात सलमान खान ‘मान्यवर परीक्षक’ असताना त्याने कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि परीक्षकांना प्रश्न केला की, ‘यापूर्वी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांचं काय झालं? त्यांना संधी मिळाल्या की ते इथून तिथे भटकत आहेत?’ या अनाहूत प्रश्नाने सूत्रसंचालक आणि परीक्षक काहीसे भांबावले. असे कित्येक ‘रिअ‍ॅलिटी शो’ आणि ते दाखवणाऱ्या वाहिन्या यांना कलाकारांच्या भवितव्याशी काही देणे-घेणे नसते.
अशात गरज आहे ती प्रत्येक कलाकाराने आत्मपरीक्षण करण्याची. आणि त्याला जोड हवी कठोर परीश्रम आणि अभ्यासाची! आज ना उद्या या ‘रिअ‍ॅलिटी शो’ची सद्दी संपेल पण ‘दीदीं’चा सल्ला या ताऱ्यांना अढळपदाच्या जवळ नेतो.
चैताली रेवंडकर, घाटकोपर, मुंबई

लिटल् चॅम्पच्या ‘बिग’ त्रुटी
‘झी मराठी’ वाहिनीवर ‘आयडिया सारेगमप लिटल् चॅम्पस्’ हा प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम. या कार्यक्रमाचे छोटे गायक, सर्वच वादक, परीक्षक व सूत्र-संचालक पल्लवी जोशी-सारेच कौतुकास पात्र आहेत. पण या कार्यक्रमाबाबत सहज लक्षात न येणाऱ्या काही त्रुटी नमूद कराव्याशा वाटतात.
भरभरून एसएमएस करण्याचे आवाहन करून एसएमएसचे दर एवढे जलद दाखवतात की ते दर कुणाही प्रेक्षकाला कळू नयेत. खरे तर एकेका स्पर्धकाचे कोडनंबर व मोबाइल कंपन्याचे नाव दाखवतात तेव्हा त्याच पाटीवर एसएमएसचे दर व लॅण्डलाइनचे दर दाखवता येतील. हे दर रु. २/- ते रु. ६/- आहेत. घराघरातील लिटल् मास्टर्स त्यांच्या आईबाबांचे मोबाइल घेऊन एसएमएस पाठवतात व त्याचे पडसाद नंतर येणाऱ्या बिलात उमटतात!
सापशिडीवरून स्पर्धक पुढे जाताना गुण- प ध नी वगैरे सांगितले जातात. पण लगेच एक प्लस किंवा मायनस साइन-असल्याचे सांगून स्पर्धकाला (व प्रेक्षकांनाही)धक्का देऊन मागे किंवा पुढे ढकलले जाते, हे खरोखरच गूढ वाटते. हे प्लस किंवा मायनस चिन्ह गुणदानाच्या वेळी स्पष्ट करावे.
प्रेक्षकांकडून आलेले एस.एम.एस. नेमके किती हे प्रेक्षकांना (व स्पर्धकालाही) कळतच नाही! पल्लवी सांगेल त्याप्रमाणे स्पर्धक पुढे-पुढे. आणखी पुढे. जात राहतो व ती ‘बास्स’ म्हणाली की स्पर्धक थांबतो! हे काय आहे? हे ‘लिटल् बिग’ दोष सोडल्यास कार्यक्रमाला हॅट्स ऑफ!
सुहास वैद्य, डोंबिवली

बेलसरे सरांची रसाळ वाणी
कॉलेजात चतुर्थ श्रेणी कर्मचारीवर्ग रांगेत उभा आहे. पंचासारखं धोतर नेसलेल्या प्रोफेसरांची यायची वेळ झालेली आहे. ते येतात. रांगेतले त्यांना नमस्कार करतात. तेही हसतमुखाने त्यांना उलट नमस्कार करतात. या प्रोफेसरांचे नाव के. वि. बेलसरे आणि कॉलेजचे नाव सिद्धार्थ कॉलेज.
६०-६२ वर्षांपूर्वीची ही आठवण. आज त्या जागी आयकर भवनाची इमारत आहे. तिथे १९४६ च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नुकतेच स्थापन केलेले सिद्धार्थ कॉलेज बराकीत भरत असे.
चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांत दलितांचा भरणा असूनही हा सर्व वर्ग बेलसरे प्रोफेसरांच्या यायच्या वेळी नित्य नेमाने रांगेत उभा राहायचा. इतरांना असूया वाटावी, असे हे भाग्य फक्त बेलसरे सरांनाच लाभले होते. के. वि. बेलसरे ऊर्फ बाबा बेलसरे यांच्या जन्मशताब्दीविषयी वाचल्यानंतर (२ जानेवारी) हे दृश्य डोळ्यांपुढे तरळून गेले.
प्रोफेसर बेलसरे ज्ञानेश्वरी शिकवायचे. ‘अमृतातेही पैजा जिंके’, अशी ज्ञानेश्वरी आणि प्रो. बेलसरे यांची रसाळ वाणी असा अपूर्व मधुकल्लोळच साधला होता.
प्रोफेसर बेलसरे लॉजिक आणि सायकॉलॉजी हे विषयही शिकवायचे. हे दोन्ही तसे रुक्ष विषय. पण बेलसरे सरांचे शिकवणे असे असायचे की एखाद्या हुशार शेतकऱ्याने उजाड माळ फळा-फुलांनी सजवावा! साहजिकच त्यांच्या तासाला वर्ग विद्यार्थ्यांनी तुडुंब भरलेले असायचे. जागा मिळेल तिथे विद्यार्थी बसत. अगदी खिडक्यांतही!
श्रीपाद नाडकर्णी, ठाकूरद्वार, मुंबई

डोमिसाइल प्रमाणपत्र आवश्यकच
जयंत देशमुख यांचा ‘डोमिसाइलची सक्ती हवी’ हा लेख (१ डिसेंबर) वाचण्यात आला. सध्याच्या बिघडत चाललेल्या सामाजिक परिस्थितीत हे प्रमाणपत्र अत्यावश्यक असल्याचे जाणवते. अन्य भाषक व शहराबाहेरून येणारे परप्रांतीयांचे लोंढे यामुळे स्थानिकांना डावलले जाते. त्यांच्यामधला परस्पर वाद मिटवण्याकरिता, शिवाय अन्य महत्त्वाच्या अशा शासकीय कामकाजाच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र शासनाने ‘डोमिसाइल सर्टिफिकेट’ सादर करणे सक्तीचे करण्याचा आदेश काढला होता; परंतु याकडे सध्या दुर्लक्ष केले जात आहे. देशाचा व राज्याचा एक जबाबदार नागरिक म्हणून सर्वानी स्वत:चे डोमिसाइल सर्टिफिकेट काढणे आवश्यक आहे असे मला वाटते. आपल्या राहत्या ठिकाणाहून जवळ जेथे ही सोय उपलब्ध आहे, तेथून हे सर्टिफिकेट मिळवण्याची त्वरा प्रत्येकाने करावी. सध्या हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बराच कालावधी लागत आहे. तरीही हे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
शरद गडकरी, डोंबिवली