Leading International Marathi News Daily                                  बुधवार, १४ जानेवारी २००९

सत्यम घोटाळ्याची एसएफआयओतर्फे चौकशी
चार्टर्ड अकौंटंटच्या कार्यालयावर आंध्र प्रदेश पोलिसांचा छापा

हैदराबाद, १३ जानेवारी/पीटीआय

कोटय़वधींचा आर्थिक घोटाळा झालेल्या सत्यम कॉम्प्युटर या कंपनीचे ऑडिट करणाऱ्या प्राईसवॉटरहाऊस कूपर्स या चार्टर्ड अकौंटंट फर्मच्या कार्यालयावर आज आंध्र प्रदेश पोलिसांनी छापा टाकला व तेथे केलेल्या कसून तपासणीत काही कागदपत्रेही ताब्यात घेतली. दरम्यान सत्यममध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस (एसएफआयओ)तर्फे करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. गंभीर आर्थिक गुन्ह्यांचा तपास या यंत्रणेमार्फत केला जातो. यासंदर्भात केंद्रीय कॉर्पोरेट अफेअर्स विभागाचे मंत्री प्रेमचंद गुप्ता यांनी सांगितले की, एसएफआयओ आपला चौकशी अहवाल येत्या तीन महिन्यांत केंद्र सरकारला सादर करील. सत्यम कॉम्प्युटरमधील आर्थिक घोटाळ्याचा तपास आंध्र प्रदेश पोलिसांच्या सीआयडी विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

ग्लोबल ‘शिववडा’ झाला थंडगार!
संदीप प्रधान
मुंबई, १३ जानेवारी

फ्रेंचाची वाईन, स्कॉटलंडची स्कॉच, इटलीतील स्पॅगेट्टी या वैश्विक लोकप्रियता लाभलेल्या खानपान खजिन्यात शिवसेनेचा मराठमोळा ‘शिववडा’ दाखल होण्याकरिता नोव्हेंबरअखेरीस जंगी सोहळा झाला. २७ नामांकित वडापाववाले स्पर्धेत उतरले होते. त्यातून ‘ग्लोबल शिववडा’ ठरणार होता. परिक्षकांचा निकाल सीलबंद झालेला आहे. परंतु अजून तो लिफाफा उघडला गेला नसल्याने ‘शिववडा’च्या चवीकरिता आतूर जिव्हा कोरडय़ा पडल्या आहेत, प्रशांत दामलेंपासून मनोज तिवारीपर्यंतचे वडापावचे फॅन भुकेने कासावीस झाले आहेत आणि ‘ग्लोबल शिववडा’चा धसका घेतलेल्या तारांकित हॉटेलांचा जीव भांडय़ात पडला आहे. मॅकडोनाल्डच्या बर्गरशी शिवसेनेच्या वडापावची स्पर्धा करण्याकरिता सिद्ध करण्याची जबाबदारी ठाकरे यांनी खासदार संजय राऊत व अन्य सहकाऱ्यांवर सोपविली.

स्टार-स्क्रीन पुरस्कार सोहळ्यासाठी बॉलिवूड तारकांची मांदियाळी!
अमिताभ, शाहरूख, अमिर, अक्षयकुमार, अभिषेक, हृृतिक, नसिर, रणबीर यांच्यात चुरस

मुंबई, १३ जानेवारी / प्रतिनिधी

सुपरस्टार अमिताभ बच्चन, शाहरूख खान, अमिर खान, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन, रणबीर कपूर आणि नासीरुद्दीन शहा अशा आठ अभिनेत्यांपैकी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मुकूट कोण परिधान करणार हे उद्या बुधवारी सायंकाळी वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर रंगणाऱ्या १५ व्या स्टार - स्क्रीन पुरस्कार वितरण सोहळ्यात स्पष्ट होणार आहे. बॉलीवूड कलाकारांच्या मांदियाळीत रंगणाऱ्या या सोहळ्यात दीपिका पदुकोन, कतरिना कैफ, बिपाशा बसू, अनुष्का शर्मा यांनी सादर केलेली बहारदार नृत्ये खास आकर्षण ठरणार आहेत.

‘लार्सन’ व्यवस्थापनाच्या आतबट्टय़ाच्या गुंतवणूक निर्णयाचा भरुदड भागधारकांच्याच माथी?
मुंबई, १३ जानेवारी/व्यापार प्रतिनिधी

सत्यम कॉम्प्युटरमधील उघडकीस आलेल्या महाघोटाळ्याने ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’चा मुद्दा ऐरणीवर आणला असला तरी, या घोटाळ्याचे पडसाद अन्य कंपन्यांतही येत्या काळात उमटत राहतील. ‘सत्यम’ वादंगाचा धुरळा उठला असतानाच, उद्या होत असलेली लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लिमिटेड या कंपनीची विशेष सर्वसाधारण सभाही याला अपवाद ठरणार नाही. विशिष्ट ‘व्यूहरचने’तून लार्सन व्यवस्थापनाने सत्यमच्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक आज या सत्यमच्या समभागांचा शेअर बाजारात झालेला पालापाचोळा पाहता आतबट्टय़ाची ठरली आहे आणि या आतबट्टय़ाच्या निर्णयावर लार्सनच्या विशेष सर्वसाधारण सभेत ठराव पारित करून परस्पर शिक्कामोर्तबही केले जाणार आहे. म्हणजे वरिष्ठ व्यवस्थापकांच्या चुकीच्या निर्णयाचा भरुदड अखेर लार्सनच्या सामान्य भागधारकांच्याच माथी मारला जाईल असे संकेत मिळत आहेत.

राष्ट्रवादीबरोबर वाटाघाटींसाठी काँग्रेसची आक्रमक भूमिका
मुंबई, १३ जानेवारी / खास प्रतिनिधी

लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दबावाचे राजकारण सुरू केल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने जागावाटपाच्या चर्चेत आक्रमक भूमिका घेण्याचे ठरविले असून, चर्चेसाठी नवी दिल्लीच्या पातळीवर केंद्रीय नेत्यांची समिती स्थापन केली जाणार आहे. जागांची अदलाबदल करण्याची काँग्रेसची तयारी असली तरी संख्येवर मात्र तडजोड करायची नाही, असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. राष्ट्रवादीबरोबर जागावाटपात कोणती भूमिका घ्यायची या संदर्भात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यापूर्वीच नवी दिल्लीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. राज्यातील एकूण राजकीय परिस्थितीबाबत चव्हाण यांनी राज्याचे प्रभारी ए. के. अ‍ॅन्टोनी यांना सविस्तर माहिती दिली आहे. राष्ट्रवादीकडून दबावाचे राजकारण केले जाणार याची पूर्वकल्पना असल्यानेच काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच सविस्तर चर्चा केल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीला २६ जागा मिळाल्या पाहिजेत, असा दावा केला आहे. हा राष्ट्रवादीच्या दबावाच्या राजकारणाचा भाग असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री चव्हाण व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गेले दोन दिवस राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. प्रत्येक मतदारसंघांमधील पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री चव्हाण हे लवकरच राज्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय मंत्री व खासदारांची बैठक बोलाविणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीबरोबर जागावाटपाची चर्चा सुरू होईल. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर काही जागांची आदलाबदल होऊ शकते, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. अंतिम जागावाटप हे नवी दिल्लीतच होईल, असेही त्यांनी सूचित केले.
राष्ट्रवादीबरोबर जागावाटपाची चर्चा करण्याकरिता केंद्रीय नेत्यांची समिती नियुक्त केली जाणार आहे.

बसपा महाराष्ट्रात स्वबळावरच लढणार
मुंबईतून शबाना आझमीही इच्छुक?
समर खडस
मुंबई, १३ जानेवारी

बहुजन समाज पार्टी राज्यात व देशपातळीवर कुणाही बरोबर युती करणार नसल्याचे नक्की झाले आहे. महाराष्ट्रात तर शिवसेनेबरोबर युती करण्याचा काही प्रश्नच येत नसल्याचे आज पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विलास गरुड यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांकरिता उमेदवारांची निवडही जवळपास निश्चित झाली आहे. राज्यातील ४८ जागांपैकी ३५ ते ४० जागांसाठीचे उमेदवार पक्षाने नक्की केले असून उर्वरित आठ ते दहा उमेदवारांची निवड येत्या आठवडय़ाभरात पूर्ण होणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षाने दक्षिण मुंबईतून महंमद अली, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अतहर सिद्दिकी, ईशान्य मुंबईतून अशोक सिंग हे उमेदवार नक्की केले आहेत. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून विख्यात सिनेअभिनेत्री शबाना आझमी बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास इच्छूक असून त्यांचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी बोलणे सुरू असल्याचे समजते. तसेच उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून प्रिया दत्त यांच्यासमोर डॉ. अख्तर रिझवी यांना बसपाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यात रस आहे. पक्षाने मुंबईसाठी दलित-मुस्लिम-उत्तर भारतीय अशी व्होट बँक पक्की बांधली असून मुंबईतील सहाच्या सहा जागांवर थेट लढत होणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मार्क्‍सवादी कम्युनिस्टच पक्षाच्या कोची येथे झालेल्या केंद्रीय समितीच्या बैठकीत बसपा निवडणूकपूर्व युती करणार नाही. मात्र तरीही बसपा व डाव्या आघाडीची भूमिका काँग्रेस व भाजपबाबत एकच असल्याने बसपाबरोबर संबंध चांगलेच ठेवायचे असल्याचे पक्ष नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, त्रिपुरा या राज्यांमध्ये डावी आघाडी व बसपा यांच्यात समझोता असणार आहे.

सपाला मुंबईत लोकसभेच्या चार जागा हव्यात
मुंबई, १३ जानेवारी / प्रतिनिधी

समाजवादी पार्टीला आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईत चार तर संपूर्ण महाराष्ट्रात एकूण १० जागा हव्या आहेत. येत्या १५ जानेवारीपर्यंत काँग्रेसकडून काही प्रतिसाद मिळाला तर ठीक अन्यथा आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू, असे समाजवादी पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अबु आसीम आझमी यांनी स्पष्ट केले. मुंबईत आपण स्वत: उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचेही आझमी यांनी सांगितले. मुंबईतील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य, उत्तर पश्चिम या मतदारसंघावर समाजवादी पार्टीने दावा सांगितला आहे.

पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीत उद्या कपात
नवी दिल्ली १३ जानेवारी/पी.टी.आय.

केंद्र सरकार गुरुवारी पेट्रोल, डिझेल व घरगुती वापराच्या एलपीजी गॅसच्या किंमतीत कपात जाहीर करण्याची शक्यता असून, इंधनांच्या किंमतीवरील प्रशासकीय नियंत्रण काढून घेण्याचा निर्णयही घेतला जाण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक होत असून त्यात पेट्रोल ५ रुपये, डिझेल ३ रुपये व गॅस २५ रुपये या प्रमाणे दर कमी केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य लोकांना दिलासा मिळणार असून चलनवाढही कमी होण्याचे संकेत आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरकारी तेल कंपन्या पेट्रोलला लिटरमागे ९.७० रु. डिझेल ३.७० रु. या प्रमाणे नफा मिळवत आहेत पण गॅस सििलडरला नगामागे ३१.७० रु. तोटा होत आहे. केरोसिनच्या विक्रीत लिटरमागे ११.६९ रु. तोटा होत आहे.
केरोसिन व एलपीजी विक्रीतील तोटा भरून काढण्यासाठीची व्यवस्था झाल्यानंतर इंधनांच्या किरकोळ विक्रीत दरांचे प्रशासकीय नियंत्रण काढून घेण्याचा सरकार विचार करीत आहे. सरकारला पेट्रोल व डिझेलवर किमान लिटरमागे एक रु. अबकारी कर लावल्याने अतिरिक्त महसूल मिळणार आहे. एलपीजी व केरोसिन या दोन्हींच्या विक्रीतील तोटा भरून काढण्यासाठी ३० हजार कोटी रुपयांचे तेल रोखे जारी करण्याचा निर्णयही घेतला जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे पाच रु. व दोन रुपयांनी कमी करण्यात आले होते. कारण त्यावेळी खनिज तेलाचा दर चार वर्षांतील नीचांकी होता.

अण्वस्त्र तंत्रज्ञान तस्करीवरून खान यांच्यासह १२ जणांवर अमेरिकेचे र्निबध
वॉशिंग्टन, १३ जानेवारी / पी.टी.आय.

अण्वस्त्र निर्मितीसाठीची साधने व तंत्रज्ञानाची उत्तर कोरिया, इराण, लिबियाला तस्करी केल्याबद्दल अमेरिकेने पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ ए. क्यू. खान यांच्यासह तेरा व्यक्ती आणि तीन खासगी कंपन्यांवर र्निबध लादले आहेत. अण्वस्त्र तंत्रज्ञानाची जागतिक पातळीवर तस्करी करणाऱ्या यंत्रणेचे नेतृत्व खान यांनी केले. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या चौकशीद्वारे खान यांच्या या यंत्रणेचा आढावा घेण्यात आल्यानंतर र्निबध लादण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे भविष्यात अशा प्रकारे अण्वस्त्र निर्मितीसाठीची साधने व तंत्रज्ञानाची चोरून विक्री होणार नाही असा विश्वासही परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला आहे. खान यांच्यासह तेरा व्यक्ती व तुर्कस्तानमधील दोन व दक्षिण आफ्रिकेतील एक अशा तीन कंपन्यांवर र्निबध लादले आहेत. पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाणारे खान यांनी २००४ मध्ये अण्वस्त्र निर्मितीसाठीची साधने व तंत्रज्ञान चोरून विकल्याचे कबूल केले होते. त्यावेळी अध्यक्षपदावर असणाऱ्या परवेझ मुशर्रफ यांनी त्यांना माफ केले असले तरी तेव्हांपासून ते नजरकैदेत आहेत. मुशर्रफ गेल्या वर्षी सत्तेवरून पायउतार झाल्यावर मात्र खान यांनी, ‘आपल्याला बळीचा बकरा बनविल्याचा व दबावाखाली कबुली दिल्याचा’ दावा केला होता.

भारताने दिली ती माहिती; पुरावे नव्हेत - गिलानी
इस्लामाबाद -मुंबईतील हल्ल्यांबाबत भारताने पाकिस्तानला सादर केली ती माहिती होती, पुरावे नव्हेत असे सांगून पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ अली गिलानी यांनी आज मुंबई हल्ल्याची संयुक्तपणे चौकशी करण्याची पुन्हा एकदा तयारी दाखविली. गिलानी म्हणाले, ‘भारताने माहिती पुरविली आहे, पुरावे नव्हेत!’ अतिरेकी हल्ल्यांचे प्रकार गंभीर आहेत. त्यासाठी भारत-पाकिस्तानने संयुक्तपणे चौकशी करायला हवी.

 

लोकसत्ता दिवाळी अंक २००८


प्रत्येक शुक्रवारी


दिवाळी २००८