Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

सत्यम घोटाळ्याची एसएफआयओतर्फे चौकशी
चार्टर्ड अकौंटंटच्या कार्यालयावर आंध्र प्रदेश पोलिसांचा छापा
हैदराबाद, १३ जानेवारी/पीटीआय

 
कोटय़वधींचा आर्थिक घोटाळा झालेल्या सत्यम कॉम्प्युटर या कंपनीचे ऑडिट करणाऱ्या प्राईसवॉटरहाऊस कूपर्स या चार्टर्ड अकौंटंट फर्मच्या कार्यालयावर आज आंध्र प्रदेश पोलिसांनी छापा टाकला व तेथे केलेल्या कसून तपासणीत काही कागदपत्रेही ताब्यात घेतली. दरम्यान सत्यममध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस (एसएफआयओ)तर्फे करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. गंभीर आर्थिक गुन्ह्यांचा तपास या यंत्रणेमार्फत केला जातो. यासंदर्भात केंद्रीय कॉर्पोरेट अफेअर्स विभागाचे मंत्री प्रेमचंद गुप्ता यांनी सांगितले की, एसएफआयओ आपला चौकशी अहवाल येत्या तीन महिन्यांत केंद्र सरकारला सादर करील.
सत्यम कॉम्प्युटरमधील आर्थिक घोटाळ्याचा तपास आंध्र प्रदेश पोलिसांच्या सीआयडी विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. आज घातलेल्या या छाप्यासंदर्भात पोलीस सूत्रांनी सांगितले की, या धाडपथकामध्ये आठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. प्राईसवॉटरहाऊस कूपर्सच्या कार्यालयातून पोलिसांनी काही कागदपत्रेही ताब्यात घेतली. सत्यम कॉम्प्युटरच्या आणखी एखाद्या माजी संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे का या प्रश्नावर आंध्र प्रदेशमधील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नकारार्थी उत्तर दिले. मात्र या कंपनीच्या आणखी काही माजी संचालकांची पोलीस चौकशी करण्याची शक्यता आहे असे त्याने सांगितले.
दरम्यान आमच्या कार्यालयावर पोलिसांनी छापे घातलेली नाही. आम्ही तपासकामात पोलिसांना संपूर्ण सहकार्य करीत आहोत असा दावा प्राईसवॉटरहाऊस कूपर्स या चार्टर्ड अकौंटंट फर्मच्या प्रवक्त्याने केला आहे.
गेल्या ११ जानेवारी रोजी आंध्र प्रदेशचे सीआयडी अधिकारी, सेबी, आर्थिक गुन्हे तपास शाखेचे अधिकारी, कंपनी रजिस्ट्रार यांनी संयुक्तपणे सत्यम कॉम्प्युटरचे माजी अध्यक्ष बी. रामलिंग राजू व त्यांचा भाऊ बी. रामलिंग राजू, कंपनीचे माजी संचालक बी. रामराजू, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी वदलमणी श्रीनिवास यांचे निवासस्थान व कार्यालयांमध्ये शोध मोहिम हाती घेतली होती.
दरम्यान सत्यम कंपनीचे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी राम म्यानमपती हे अमेरिकेला रवाना झाले आहेत. सत्यम कॉम्प्युटर ही पूर्वीच्याच कार्यक्षमतेने काम करेल याची अमेरिकेतील ग्राहकांना खात्री पटवून देण्याकरिता म्यानमपती हे येथे आले आहेत. या कंपनीचे ग्लोबल मार्केटिंग व कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख हरी थलपल्ली यांनी यासंदर्भात सांगितले की, केंद्र सरकारने नेमलेले सत्यम कॉम्प्युटर कंपनीसाठी तिघा जणांचे हंगामी संचालक मंडळ नेमले आहे. जोपर्यंत नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करीत नाही तोपर्यंत हे हंगामी संचालक मंडळच कंपनीचा दैनंदिन कारभार पाहाणार आहे.
सत्यम कॉम्प्युटर या कंपनीला याआधी सुपूर्द केलेले अनेक प्रकल्प आता टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसकडे (टीसीएस) सोपविण्यात येत असल्याची घोषणा जागतिक बँकेने केली आहे. सत्यमशी आगामी आठ वर्षे कोणतेही व्यवहार करण्यास जागतिक बँकेने बंदी घातली आहे. सप्टेंबर २००८ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही बंदी लागू करण्यात आली आहे.