Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

ग्लोबल ‘शिववडा’ झाला थंडगार!
संदीप प्रधान
मुंबई, १३ जानेवारी

 
फ्रेंचाची वाईन, स्कॉटलंडची स्कॉच, इटलीतील स्पॅगेट्टी या वैश्विक लोकप्रियता लाभलेल्या खानपान खजिन्यात शिवसेनेचा मराठमोळा ‘शिववडा’ दाखल होण्याकरिता नोव्हेंबरअखेरीस जंगी सोहळा झाला. २७ नामांकित वडापाववाले स्पर्धेत उतरले होते. त्यातून ‘ग्लोबल शिववडा’ ठरणार होता. परिक्षकांचा निकाल सीलबंद झालेला आहे. परंतु अजून तो लिफाफा उघडला गेला नसल्याने ‘शिववडा’च्या चवीकरिता आतूर जिव्हा कोरडय़ा पडल्या आहेत, प्रशांत दामलेंपासून मनोज तिवारीपर्यंतचे वडापावचे फॅन भुकेने कासावीस झाले आहेत आणि ‘ग्लोबल शिववडा’चा धसका घेतलेल्या तारांकित हॉटेलांचा जीव भांडय़ात पडला आहे.
मॅकडोनाल्डच्या बर्गरशी शिवसेनेच्या वडापावची स्पर्धा करण्याकरिता सिद्ध करण्याची जबाबदारी ठाकरे यांनी खासदार संजय राऊत व अन्य सहकाऱ्यांवर सोपविली. त्यातून ‘शिववडा’ संमेलनाकरिता २४ नोव्हेंबरचा मुहूर्त काढला गेला. महाराष्ट्रातील २७ नामांकित वडापाववाले स्पर्धेत सहभागी झाले. यामध्ये बारामतीचे नामांकित वडापाववालेही होते. राजकारणातील ठाकरे-बारामतीकर जॉइंट व्हेंचरची चर्चा सुरू असतानाच शिववडाच्या सोहळ्यात बारामतीकर दाखल झाल्याने राजकीय जॉइंट व्हेंचरचा मार्ग पोटातून जातो की काय, अशी चर्चा संमेलनात सुरू होती. त्यातच कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बालमोहनमधून पळत पळत येऊन खाल्लेल्या रवी वसईकर यांच्या वडापावची चव जिभेवर आजही असल्याचे जाहीर केल्यामुळे आणि वसईकरही स्पर्धेत असल्याने आयोजक निकाल जाहीर करण्याकरिता बुचकळ्यात पडल्याची चर्चा होती. २७ वडापाववाल्यांमधून निवड करण्याकरिता शेफ निलेश लिमये यांच्या अध्यक्षतेखालील परीक्षक मंडळात मोहसिना मुकादम, अलका फडणीस, अमित भारद्वाज अशा मान्यवरांचा समावेश होता. शिववडा संमेलन होऊन दोन दिवस झाले आणि मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला आणि राजकारणात मात्र जणू स्फोटांची मालिका सुरू झाली. विलासराव देशमुख यांचे मुख्यमंत्रीपद खालसा झाले. नारायण राणे मुख्यमंत्री झाले तर या कल्पनेने शिवसेनेतील अनेकांना अन्नाचा घास गोड लागेनासा झाला. चटकदार शिववडापावही तोंडात फिरू लागला. अखेर चव्हाण यांनी बाजी मारली आणि राणे यांनी तोफखाना सुरू केला. काँग्रेसपेक्षा शिवसेना चांगली असे राणे बोलू लागल्यावर हळूहळू अन्नावरची गेलेली वासना परत आल्याने शिववडापावचा घेतलेला घास शिवसेनेतील काहींच्या घशात अडकला. राणे काँग्रेसमध्ये राहणार की स्वगृही परत येणार याचे कवित्व अजून सुरू आहेच! काहीही असले तरी कार्याध्यक्षांच्या अस्मितेचा ‘ग्लोबल शिववडा’ आतापर्यंत जाहीर व्हायला हवा होता. निलेश लिमये यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शिववडाचा निकाल त्या कार्यक्रमानंतर राज्यातील परिस्थिती बदलल्याने जाहीर केलेला नाही. निकाल अजून माझ्याकडेच आहे. कामात व्यस्त असल्याने शिवसेनेच्या आयोजकांशी माझी भेट झाली नाही.