Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

स्टार-स्क्रीन पुरस्कार सोहळ्यासाठी बॉलिवूड तारकांची मांदियाळी!
अमिताभ, शाहरूख, अमिर, अक्षयकुमार, अभिषेक, हृृतिक, नसिर, रणबीर यांच्यात चुरस
मुंबई, १३ जानेवारी / प्रतिनिधी

 
सुपरस्टार अमिताभ बच्चन, शाहरूख खान, अमिर खान, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, हृतिक रोशन, रणबीर कपूर आणि नासीरुद्दीन शहा अशा आठ अभिनेत्यांपैकी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मुकूट कोण परिधान करणार हे उद्या बुधवारी सायंकाळी वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर रंगणाऱ्या १५ व्या स्टार - स्क्रीन पुरस्कार वितरण सोहळ्यात स्पष्ट होणार आहे. बॉलीवूड कलाकारांच्या मांदियाळीत रंगणाऱ्या या सोहळ्यात दीपिका पदुकोन, कतरिना कैफ, बिपाशा बसू, अनुष्का शर्मा यांनी सादर केलेली बहारदार नृत्ये खास आकर्षण ठरणार आहेत.
चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकार, तंत्रज्ञांना १९९५ सालापासून स्टार-स्क्रीन पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सवरेत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, चित्रपट इत्यादी विभागांमध्ये अत्यंत चुरशीची स्पर्धा आहे. जुन्या पिढीतील अमिताभ, नसीरुद्दीन, मधल्या पिढीतील आमीर, शाहरूख, अक्षय, त्यानंतरच्या पिढीतील हृतिक, अभिषेक आणि नव्या पिढीतील रणबीर यांच्यात सवरेत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी चुरस आहे तर ऐश्वर्या राय-बच्चन, जेनेलिया डिसूझा, काजोल, असीन आणि प्रियांका चोप्रा यांच्यापैकी कोणाचे नाव सवरेत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर कोरले जाईल, याविषयी सर्वानाच उत्सुकता आहे.
स्टार-स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात आतापर्यंत शाहरुख खानला सहाय्यक अभिनेता किंवा सर्वोत्कृष्ट खलनायकाचे मानांकन मिळत होते. यंदा मात्र प्रथमच शाहरुखला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन मिळाले आहे. याशिवाय यंदा प्रथमच सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी तब्बल आठ अभिनेत्यांना मानांकन मिळाले आहे. याशिवाय अनेक नव्या-जुन्या अभिनेत्यांना विविध गटांत नामांकन मिळाल्याने चुरस आणि उत्सुकता वाढली आहे. उत्तरोत्तर अधिकच रंगत जाणाऱ्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.