Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९

(सविस्तर वृत्त)

‘लार्सन’ व्यवस्थापनाच्या आतबट्टय़ाच्या गुंतवणूक निर्णयाचा भरुदड भागधारकांच्याच माथी?
मुंबई, १३ जानेवारी/व्यापार प्रतिनिधी

 
सत्यम कॉम्प्युटरमधील उघडकीस आलेल्या महाघोटाळ्याने ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’चा मुद्दा ऐरणीवर आणला असला तरी, या घोटाळ्याचे पडसाद अन्य कंपन्यांतही येत्या काळात उमटत राहतील. ‘सत्यम’ वादंगाचा धुरळा उठला असतानाच, उद्या होत असलेली लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो लिमिटेड या कंपनीची विशेष सर्वसाधारण सभाही याला अपवाद ठरणार नाही. विशिष्ट ‘व्यूहरचने’तून लार्सन व्यवस्थापनाने सत्यमच्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक आज या सत्यमच्या समभागांचा शेअर बाजारात झालेला पालापाचोळा पाहता आतबट्टय़ाची ठरली आहे आणि या आतबट्टय़ाच्या निर्णयावर लार्सनच्या विशेष सर्वसाधारण सभेत ठराव पारित करून परस्पर शिक्कामोर्तबही केले जाणार आहे. म्हणजे वरिष्ठ व्यवस्थापकांच्या चुकीच्या निर्णयाचा भरुदड अखेर लार्सनच्या सामान्य भागधारकांच्याच माथी मारला जाईल असे संकेत मिळत आहेत.
महिन्याच्या सुरुवातीपासून खुल्या बाजारातून ‘सत्यम’च्या समभागांची खरेदी करीत कंपनीतील भांडवली हिस्सा चार टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा व्यूहात्मक निर्णय लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोच्या व्यवस्थापनाने परस्पर घेतला. भारतातील इंजिनीयरिंग व बांधकाम क्षेत्रातील या सर्वात बडय़ा व नामांकित कंपनीने यासाठी आपली उपकंपनी ‘एल अ‍ॅण्ड टी कॅपिटल’चा वापर केला. सत्यमच्या समभागात गुंतवणुकीचा निर्णय ‘आपणच व्यक्तिगत क्षमतेत घेतला’ असे लार्सनचे अध्यक्ष ए. एम. नाईक यांनी दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. पण आज या गुंतवणूक निर्णयावर झालेल्या तब्बल ३८० कोटी रुपयांच्या तोटय़ाचे दायित्व मात्र व्यक्तिगत असणार नाही, हे स्पष्टच दिसत आहे. आजच्या सभेत या गुंतवणुकीसंबंधाने पारित होत असलेला विशेष ठराव असेच संकेत देणारा आहे.
एकंदर ४.०४ टक्के भांडवली हिस्सा होईल इतक्या म्हणजे सत्यमच्या जवळपास अडीच कोटी समभागांची खरेदी १ जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने खुल्या बाजारातून लार्सनने केली, असे हाती आलेल्या माहितीतून स्पष्ट होते. रामलिंग राजू यांच्या कबुलीजबाबाने ‘सत्यम’वरील कलंक जगजाहीर झाला नसता, तर खरेदीचे प्रमाण आणखी वाढले असते, असेही आता स्पष्ट होत आहे. खुल्या बाजारातील या खरेदीचा सरासरी भाव प्रति समभाग १८२.३५ रुपयांच्या घरात जाणारा होता. म्हणजे या गुंतवणूक निर्णयावर लार्सनच्या गंगाजळीतील तब्बल ४५५ कोटी रुपये खर्ची पडले. आज (मंगळवारी) सत्यमच्या समभागाचा बाजारभाव ३१.२५ रुपये होता आणि तो नजीकच्या काळात वाढणेही शक्य दिसत नाही. म्हणजे या आतबट्टय़ाच्या व्यवहारात लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोच्या सत्यममधील गुंतवणुकीचे मूल्य केवळ रु. ७६ कोटींच्या घरात जाणारे, तर तोटा सध्याच्या घडीला तरी ३८० कोटी रुपयांचा आहे. लार्सनचे मुख्य वित्तीय अधिकारी वाय. एम. देवस्थळी यांनी यासंबंधीची भूमिका स्पष्ट करताना, ‘यापुढे सत्यममधील भांडवली हिस्सा आणखी वाढविण्याचा प्रयत्न होणार नाही’, असे म्हटले आहे. लार्सनला सत्यमच्या व्यवसायात, तिच्या विस्तारीत ग्राहकवर्गात आणि मुख्य म्हणजे ५० हजारांच्या घरात जाणाऱ्या ज्ञानाधारीत मनुष्यबळात स्वारस्य होते. या शिवाय सत्यमशी संलग्न असलेल्या मेटास इन्फ्राकडे असलेली प्रचंड मोठी जमीन आणि मोठमोठी बांधकामाची कंत्राटे हे सुद्धा लार्सनच्या आकर्षणाचे वैशिष्टय़ होते. आय.टी. क्षेत्रातील या नावाजलेल्या कंपनीत एरव्ही प्रति समभाग २०० रुपयांपेक्षा कमी किमतीत गुंतवणूक करणे शक्य झाले नसते. सत्यमचा पडता भाव हा कोणत्याही धोरणी व महत्त्वाकांक्षी उद्योग समूहाच्या तोंडाला पाणी आणणाराच होता, असे आता कंपनीच्या सूत्रांकडून सांगितले जात आहे.
सत्यममध्ये प्रमुख भांडवली हिस्सा असलेल्या लार्सन (४.०४ टक्के)सह आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ (२.४७ टक्के), लॅझार्ड अ‍ॅसेट मॅनेजमेंट (२.१५ टक्के) आणि एलआयसी (१.४८ टक्के) या अन्य भागीदारांना सरकारकडून नव्याने स्थापल्या जाणाऱ्या नामनिर्देशित संचालक मंडळात प्रतिनिधित्व दिले जाईल, अशी अपेक्षा केली जात आहे. लार्सननेही सत्यमच्या संचालक मंडळात प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या संबंधीचा निर्णय सरकारकडून आज होत असलेल्या सभेपूर्वी यावा, असाही प्रयत्न झाल्याचे सूत्रांकडून समजते. सत्यमच्या समभागातील गुंतवणुकीतील भरमसाट तोटय़ाची भरपाई या माध्यमातून तरी का प्रमाणात व्हावी असाच यामागे हेतू आहे, हे स्पष्टच आहे.