Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

‘गतिमंदांच्या समस्यांबाबत जनतेनेच सरकारला जागे करावे’
रेड स्वस्तिक सोसायटीचा आठवा वर्धापनदिन
मुंबई, १३ जानेवारी/प्रतिनिधी

 
शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून मिरविणारे राज्य सरकार गेल्या ५० वर्षांपासून गतिमंदांच्या समस्यांबाबत, त्यांच्या पुनर्वसनाबाबत गप्प कसे बसू शकते, असा प्रश्न उपस्थित करीत ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक सुधीर जोगळेकर यांनी या प्रश्नासाठी आता लोकांनीच पुढे येऊन राज्य सरकारला जागे करण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच असे झाल्यास ही समस्या सुटण्यास फारसा वेळ लागणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला.
रेड स्वस्तिक सोसायटी या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त नेहरू केंद्र येथे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जोगळेकर बोलत होते. या कार्यक्रमाला मुंबईच्या नगरपाल डॉ. इंदु सहानी, व्यावसायिक दीपक तन्ना आणि रेड स्वस्तिक सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संस्थेतर्फे सामाजिक क्षेत्रात विशेषत: रुग्णसेवेच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर मेळघाटामध्ये गतिमंद मुलांसाठी कार्य करणाऱ्या शंकरबाबा पापळकर यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. या वेळेस पापळकर यांच्या संस्थेला एका दानशूर व्यक्तीने दिलेल्या देणगीतून रुग्णवाहिका देण्यात येईल, अशी घोषणा रेड स्वस्तिकचे व्यवस्थापक संचालक टी. एस. भाल यांनी केली.
याशिवाय २६/११च्या हल्ल्याच्या वेळी जीवाची पर्वा न करता दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहोचविणाऱ्या ‘१२९८’ या रुग्णवाहिकेच्या चालकांनाही गौरविण्यात आले.शंकरबाबा पापळकर यांनी सन्मानानंतर केलेल्या हृदयस्पर्शी मनोगताने तर उपस्थित सर्वच सद्गदीत झाले. हा सत्कार पापळकर यांनी स्वत: न स्वीकारता त्यांच्या वतीने त्यांच्या संस्थेतील रुपा नामक गतिमंद मुलीने स्वीकारला. या वेळी तिला व्हील चेअरही देण्यात आली. तिच्या दोन्ही पायांवर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यासाठी पुरस्काराची रक्कम वापरली जाईल, अशी घोषणा पापळकर यांनी केली.
भारतीय आणि पाश्चिमात्य वैद्यक क्षेत्रातील फरक विशद करताना भारतातील वैद्यक क्षेत्राला सध्या व्यावसायिकतेचे स्वरुप कसे प्राप्त झाले आहे हे जोगळेकर यांनी सोदाहरण स्पष्ट केले. आज भारतात वैद्यक क्षेत्राकडे व्रत म्हणून न पाहता व्यवसायाचे एक उत्तम साधन पाहिले जाते. अशा या मतलबी बनलेल्या जगात शंकरबाबा पापळकर यांच्यासारखी एक सामान्य व्यक्ती कुठल्याही मदतीची, अपेक्षेची वाट न पाहता आईवडिलांनी गतिमंद म्हणून उकीरडय़ावर सोडून दिलेल्या मुलांचा ‘बाप’ बनून त्यांच्या उद्धारासाठी झटत आहे. गतिमंद मुलांची समस्या ही अन्य लोकांपेक्षा फार वेगळी असून त्यांच्या पुनवर्सनासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. मात्र या मुलांच्या अवस्थेचे विदारक चित्र समोर असतानाही राज्य सरकार त्यासाठी गेल्या ५० वर्षांपासून काहीच करीत नाही, याहून दुसरे दुर्दैव काय, अशी खंत जोगळेकर यांनी व्यक्त केली. या कामासाठी आता लोकांनीच पुढाकार घ्यावा आणि सरकारला जागृत करावे, असे आवाहन त्यांनी केले. रुग्णांमध्ये परमेश्वराची छबी पाहून त्यांची सेवा करणारे पापडकर आणि त्यांच्यासारखी मंडळी ही सध्याच्या काळात अबू बेन आदमचे प्रतिनिधीत्त्व करीत असल्याचे सांगून रेड स्वस्तिकतर्फे करण्यात आलेल्या सन्मानाला ते पात्र असल्याचे जोगळेकर म्हणाले.
लहानपणापासून मी विद्यादान हेच सर्वश्रेष्ठ दान असे ऐकत आले आहे. मात्र या कार्यक्रमात पापळकर आणि अन्य लोकांनी रुग्णांसाठी केलेल्या सेवेविषयी ऐकल्यावर माझ्यामते रुग्णसेवा हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, असे डॉ. इंदु सहानी यांनी आपले विचार मांडताना सांगितले. दीपक तन्ना यांनी आपण रुग्णांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या रेड स्वस्तिक या संस्थेला हरप्रकारची मदत करू, असे आश्वासन याप्रसंगी दिले. संस्कृतीने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. पण त्याचा योग्य वापर करून स्वत:चा उद्धार करण्याची सवय आपण अंगी बाणवलेली नाही. त्यामुळेच आपली स्थिती एखाद्या भिकाऱ्यासारखी असल्याचे बदलापूर येथील आश्रमाच्या स्वामींनी सांगितले व आतातरी स्वत:ची क्षमता पाहून जागरूक होण्याचे आवाहन त्यांनी केले.