Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

‘काँग्रेसने दिलेली कर्जमाफी राष्ट्रवादीने घातली खिशात’
मुंबई, १३ जानेवारी/प्रतिनिधी

 

मागील अर्थसंकल्पात केंद्रातील काँग्रेसप्रणीत सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आठ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. त्या कर्जमाफीच्या पहिल्या हप्त्यापोटी नाबार्डमार्फत ३१०० कोटी रुपये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे जमा झाले. परंतु जिल्हा सहकारी बँकांच्या थकित रकमेपोटी ही रक्कम राज्य सहकारी बँकेने वळती करून घेतल्याने रबीच्या हंगामात मागील कर्ज माफ होऊन शेतकऱ्यांना नवी कर्ज मिळाली नाहीत, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी केला.
मुंडे म्हणाले की, शेतकऱ्यांना रबीच्या हंगामापूर्वी यावर्षी जेमतेम २५ टक्के कर्जाचे वाटप झाले. दरवर्षी पिक कर्जापोटी राज्यात सुमारे ८०० कोटी रुपयांचे वाटप केले जाते. यावर्षी केवळ २०० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. राज्यातील सरकार, सहकार खाते व राज्य सहकारी बँक यांच्या संगनमाताने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. याबाबत राज्य सहकारी बँकेचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक यांची भेट घेण्याकरिता वेळ मागूनही त्यांनी दिली नाही. महाराष्ट्रातील एका चुलत्या व पुतण्याचा दबाव असल्यामुळे या दोघांनी भेट दिली नाही. त्यामुळे आता नाबार्डच्या व्यवस्थापकीय संचालकांना येत्या आठवडाभरात भेटून ही परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणणार असल्याचे व राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने कापसाला तीन हजार रुपयांचा हमीभाव देण्याची घोषणा केली असतानाही राज्यातील सरकारने कापूस खरेदी सुरू न केल्याने विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर घोर अन्याय सुरू असल्याचे मुंडे यांनी सांगितले. राज्यात दोन लाख क्विंटल कापसाचे उत्पादन होते. कापूस खरेदीकरिता दरवर्षी सुमारे ६०० ते ७०० केंद्र सुरू केली जातात. परंतु यावर्षी २४० केंद्र सुरू केली आहेत. यामुळे महिनाभर कापसाचे मोजमाप होत नाही. कापसाचे पैसे चोवीस तासांत देण्याचे आश्वासन दिले असले तरी दीड महिना शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाहीत. तात्काळ ५०० नवी खरेदी केंद्र सुरू करा व केंद्राप्रमाणे तीन हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी मुंडे यांनी केली.
सात दिवसांत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारी भूमिका घेतली नाही तर रस्त्यावर उतरू, असा इशारा मुंडे यांनी दिला.

‘भारनियमन कमी झाल्याचा दावा दिशाभूल करणारा’
वीज उत्पादनात ८६० मेगाव्ॉटची वाढ झाल्याने भारनियमन तीन तासांनी कमी करीत असल्याची ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांची घोषणा दिशाभूल करणारी असल्याची टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे. वीज उत्पादनात एक मे.व्ॉ.चीही भर पडली नसताना उत्तरेतून मिळणाऱ्या विजेच्या प्रमाणात झालेली वाढ, आर्थिक मंदीमुळे औद्योगिक क्षेत्रातील विजेच्या मागणीतील घट याचा आधार घेऊन भारनियमन कमी झाल्याचा डिंडोरा तटकरे पिटत आहेत,असे भांडारी म्हणाले.