Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

‘गजनी’, ‘जाने तू. या जाने ना’ ‘वेनस्डे’, आघाडीवर
१५ वा स्टार-स्क्रीन पुरस्कार सोहळा
मुंबई, १३ जानेवारी / प्रतिनिधी

 
दरवर्षीप्रमाणे यंदाही स्टार-स्क्रीन पुरस्कार संध्येच्या निमित्ताने नववर्षांचे स्वागत करण्यासाठी अवघी चित्रपटसृष्टी सज्ज झाली असून उद्या बुधवारी संध्याकाळी वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर बॉलीवूडमधील तारकांची मांदियाळी उतरणार आहे. नामांकनांच्या यादीकडे पाहूनच या रंगतदार सोहळ्याची कल्पना येते. २००८ हे वर्ष गाजविणारे चित्रपट, चित्रपट तारकांची उपस्थिती, ग्लॅमर आणि भरपूर गमती-जमतींनी यंदाचा पुरस्कार सोहळा रंगणार आहे.
‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटासाठी सवरेत्कृष्ट नायकाचे नामांकन मिळालेला शाहरूख खान सध्या खूपच खुशीत असून तो म्हणतो की, नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच पुरस्कारासाठी नामांकन मिळणे ही खूप चांगली बाब आहे आणि त्यामुळे मी सध्या खूपच थ्रिल्ड आहे. सवरेत्कृष्ट चित्रपट आणि सवरेत्कृष्ट दिग्दर्शक या दोन पुरस्कारांच्या शर्यतीत ‘ए वेनस्डे’, ‘गजनी’, ‘जाने तू.. या जाने ना’, ‘जोधा अकबर’, ‘रॉक ऑन’ आणि ‘सरकार राज’ या चित्रपटांचा समावेश आहे आणि हा प्रत्येक चित्रपट वेगळ्या धाटणीचा आहे.
प्रेक्षकांवर खूप प्रभाव पाडणारा ‘ए वेनस्डे’ हा कमी खर्चात तयार झालेला चित्रपट आहे तर जोधा अकबर या चित्रपटाने बॉलीवूडच्या श्रीमंतीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. ‘जाने तू..’ आणि ‘रॉक ऑन’ने तरुणाईचे दर्शन घडविले. ‘गजनी’मधील अॅक्शन आणि ‘सरकार राज’मधील नाटय़ही खूप परिणामकारक ठरले. सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाचे नामांकन मिळालेला ‘रॉक ऑन’चा दिग्दर्शक अभिषेक कपूर म्हणाला की, नामांकन मिळाल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. रॉक संगीतकार आणि त्यांच्या प्रेरणांचे चित्रीकरण असणारा हा एक चौकटीबाहेरचा चित्रपट आहे. ‘आमीर’ आणि ‘मुंबई मेरी जान’ या चाकोरीबाहेरच्या चित्रपटांनाही स्क्रीन पुरस्कारांमध्ये अनुक्रमे चार व तीन विभागांमध्ये नामांकन जाहीर झाले आहे.
सवरेत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी ऐश्वर्या राय-बच्चन (सरकार राज), असीन थोट्टुंकल (गजनी), जेनेलिया डिसूझा (जाने तू.), काजोल (यू, मी और हम) आणि प्रियंका चोप्रा (फॅशन) यांच्यात चुरस होणार आहे. सवरेत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी या वर्षी तब्बल आठ नामांकने आहेत. आमीर खान (गजनी), अभिषेक बच्चन (दोस्ताना आणि सरकार राजसाठी सहाय्यक अभिनेता पुरस्काराचे नामांकन), अक्षय कुमार (सिंग इज किंग), अमिताभ बच्चन (सरकार राज), हृतिक रोशन (जोधा अकबर), नसीरुद्दीन शहा (ए वेन्सडे), रणबीर कपूर (बचना ए हसीनो) आणि शाहरूख खान (रब ने बना दी जोडी) यांच्यात स्पर्धा आहे. सहाय्यक अभिनेता किंवा सवरेत्कृष्ट खलनायकाच्या पुरस्कारासाठी शाहरूख खानला स्क्रीन पुरस्कारांमध्ये नेहमीच नामांकन मिळत असले तरी सवरेत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी प्रथमच त्याला नामांकन मिळाले आहे. दोन विभागांमध्ये नामांकन मिळाल्यामुळे अभिषेक बच्चनही खूप आनंदी आहे. तो म्हणतो, ‘‘माझ्या कामाची प्रशंसा झाल्यामुळे मला खरेच खूप आनंद झाला आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठीही बराच उत्सुक आहे.
पहिला स्क्रीन पुरस्कार सोहळा १९९५ साली फिल्म सिटी हॅलिपॅडवर रंगला होता. अर्जुन रामपाल, इरफान खान, पंकज कपूर, जिमी शेरगील यांच्यातून सवरेत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि बिपाशा बासू, इला अरूण, कंगना राणावत, मुग्धा गोडसे, रत्ना पाठक शहा आणि शहाना गोस्वामी यांच्यातू सवरेत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीची निवड करणे हे खूप कठीण आहे, असे जुरींचे म्हणणे आहे.
गोल्डन ग्लोब पुरस्कारविजेता ए. आर. रेहमान याला ‘जोधा अकबर’ चित्रपटासाठी पाश्र्वसंगीत, पाश्र्वगायक या विभागांत तर ‘जाने तू’साठी संगीत दिग्दर्शन विभागात नामांकन मिळाले आहे. गेल्या वर्षांत काही चांगले नवोदित कलाकार पाहायला मिळाले. फरहान अख्तर (रॉक ऑन), राजीव खंडेलवाल (आमीर), आणि असीन (गजनी) हे अभिनेते तर नवोदित दिग्दर्शकांची एक फौजच यंदाच्या नवोदित दिग्दर्शक पुरस्काराच्या शर्यतीत आहे.
यात ए. मुरुगादोस (गजनी), अब्बास टायरवाला (जाने तू), नीरज पांडे (ए वेन्सडे), निशिकांत कामत (मुंबई मेरी जान), राजकुमार गुप्ता (आमीर), तरूण मनसुखानी (दोस्ताना) हे सर्वजण सवरेत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाच्या स्पर्धेत आहेत.
या सोहळ्याची सुरुवात दीपीका पदुकोणच्या दिलखेचक नृत्याने होणार बिपाश बासू, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या सादरीकरणाने ही संध्याकाळ उत्तरोत्तर रंगत जाणार आहे. प्रियांका चोप्राच्या नृत्याने या बहारदार संध्येची सांगता होणार आहे. रमेश सिप्पी यांच्या नेतृत्वाखाली अमोल पालेकर, फरिदा जलाल, राजकुमार हिरानी, श्याम श्रॉफ, सुजॉय घोष आणि उदय सिंग या सहा परीक्षकांच्या मंडळाने नि:पक्षपातीपणे उत्कृष्ट चित्रपट, कलाकाराची निवड केली आहे.