Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीलाही अटकपूर्व जामीन
मुंबई, १३ जानेवारी/प्रतिनिधी

 
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याच्या गुन्ह्याचा आरोप असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम ३६६(ए) अन्वये आरोप असलेल्या आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे वकिलांचे म्हणणे आहे.
जयसिंगपूर येथील योगेश रामचंद्र बलदवा या तुरुणास न्या. विद्यासागर कानडे यांनी गेल्या शुक्रवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. योगेशला या गुन्ह्याच्या संदर्भात अटक झाल्यास पाच हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका व तेवढय़ाच रकमेचे दोन जामीन घेऊन त्याची सुटका केली जावी, असा आदेश न्यायालयाने दिला.
आपल्या मुलीला आरोपी योगेश याने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद श्रीमती सुषमा वायचाळ या महिलेने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात केली असून त्यावरून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात कलम ३६६(ए) अन्वये गुन्हा नोंदविला गेला आहे. अर्जदार योगेशचे वकील अॅड. नितीन गांगल यांनी सांगितले की, ज्या दिवशी फिर्याद नोंदविली गेली तेव्हा फिर्यादीची मुलगी १७ वर्षे तीन महिने ११ दिवसांची होती. तिचे व योगेशचे प्रेम असून दोघे लग्न करणार आहेत. परंतु दोघे वेगळ्या जातीचे असल्याने मुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध आहे. अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायमूर्तीनी याची दखल घेतली की, फिर्याद नोंदविली गेली तेव्हा या मुलीचे वय १६ वर्षांहून जास्त होते. अर्जदार १८ वर्षांहून मोठा आहे व ही मुलगी स्वत:हून अर्जदाराबरोबर निघून गेली आहे.