Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

बहुभाषिक ब्राह्मण महाअधिवेशनात रक्तदानाचा महायज्ञ!
मुंबई, १३ जानेवारी / खास प्रतिनिधी

 
महाराष्ट्र ब्राह्मण सभेतर्फे येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी पुणे येथे पाचवे बहुभाषिक ब्राह्मण महाअधिवेशन आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनासाठी देशभरातून विविध भाषिक सुमारे पाच लाख ब्राह्मण प्रतिनिधी उपस्थित राहतील. संमेलनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून एक लाख बाटल्या रक्त गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे अध्यक्ष वेदाचार्य मोरेश्वरशास्त्री घैसास गुरुजी यांनी आज दादर येथे पत्रकार परिषदेत दिली.
प्रभादेवी येथील हॉटेल कोहिनूरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेस महाअधिवेशन समितीचे विनित कुबेर, मोहन मुंगळे, काका धर्मावत, मोहन भावे, स्मिता पुराणीक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या संमेलनास कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे, पद्ये, देवरुखे, गौड सारस्वत, सारस्वत, दक्षिणी, गुजराथी, राजस्थानी, उत्तर भारतीय, काश्मिरी पंडित अशा विविध ब्राह्मण ज्ञातीतील प्रतिनिधी हजर राहणार असल्याचे सांगून घैसास गुरुजी म्हणाले की, अधिवेशनाच्या निमित्ताने शासनाकडे आरक्षण देण्याची किंवा अन्य कोणतीही मागणी केली जाणार नाही. प्रांत, भाषा आणि ज्ञाती शाखा आदी भेद विसरून बहुभाषिक ब्राह्मण समाजाने संघटित व्हावे आणि समाजहिताच्या कामातून राष्टहिताचा विचार व्हावा हा उद्देश या महाअधिवेशनाचा आहे. पुणे येथील पौड रस्त्यावरील भूगाव येथे १७५ एकर जागेवर हे महाअधिवेशन होणार आहे.
भारतातील विविध पीठांचे शंकराचार्य, योगप्रसारक स्वामी रामदेव महाराज, योगाचार्य बी. एस. अय्यंगार, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत आदींच्या उपस्थितीत २४ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता महाअधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. २३ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता शनिवारवाडय़ापासून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून अधिवेशनात ब्राह्मण समाजाने उद्योग-व्यवसायात शिरावे, मतदानाचा हक्क शंभर बजावावा आदी ठराव करण्यात येणार आहेत. विविध क्षेत्रातील काही मान्यवर ब्राह्मण व्यक्तींचा ‘ब्रह्मकिर्ती’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. परशुराम एज्युकेशन ट्रस्टतर्फे चाणक्य विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असून तेथे ब्राह्मण ज्ञातीसह सर्वाना गुणवत्तेवर देणगी न घेता शैक्षणिक शुल्क आकारून प्रवेश देण्याचा विचार आहे. महाअधिवेशनासाठी अनिरुद्ध बापू अकादमीचे तीन हजार स्वयंसेवक संमेलनस्थळी व्यवस्थापन पाहणार असल्याचेही घैसास गुरुजी यांनी सांगितले.