Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

म्हाडा आणखी पाच लाख अर्ज छापणार
मुंबई, १३ जानेवारी / प्रतिनिधी

 

मुंबईतील म्हाडाच्या सुमारे तीन हजार ८६३ घरांसाठी आज दुसऱ्या दिवशी आणखी एक लाख अर्जांची विक्री झाली. अर्जविक्रीचा हा वेग पाहता म्हाडाने छापलेले पाच लाख अर्ज पुरेसे पडण्याची शक्यता नाही हे लक्षात घेऊन आणखी पाच लाख अर्जांची तातडीने छपाई केली जाणार आहे. त्यामुळे अर्जविक्रीच्या शेवटच्या दिवशीही अर्ज उपलब्ध होतील, असा दावा मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी एच. के. जावळे यांनी पुन्हा केला. घरांसाठी सोडत काढताना कुठलेही आरोप होऊ नयेत, यासाठी ही पद्धत अधिक पारदर्शक केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
म्हाडा घरांसाठी कालपासून अर्जविक्री सुरू झाल्यानंतर काल पहिल्या दिवशी ८८ हजार २२२ अर्जांची विक्री झाली होती. आज एचडीएफसीच्या २२ शाखांतून सुमारे एक लाख एक हजार ७४० अर्जांची विक्री झाली. या विक्रमी अर्जविक्रीने म्हाडाचे अधिकारीही चक्रावले असून अशा पद्धतीने पाच लाख अर्जांची विक्री आरामात होईल आणि त्यानंतरही अर्जांचा तुटवडा भासू नये म्हणून आणखी पाच लाख अर्ज तातडीने छापण्यात येणार आहेत. येत्या एक-दोन दिवसांत हे अर्जही उपलब्ध होतील, असेही जावळे यांनी सांगितले. एचडीएफसी बँकेच्या मुंबई, ठाणे, वाशी येथील २२ शाखांबाहेर आजही इच्छुकांची तोबा गर्दी होती. अंधेरी पश्चिम येथील शाखेत सर्वाधिक म्हणजे साडेसहा हजार तर भाईंदर येथील शाखेत सर्वात कमी म्हणजे दोन हजार ४७६ अर्जांची आज विक्री झाली. गेल्या दोन दिवसांत फोर्ट, माटुंगा, अंधेरी पश्चिम, बोरिवली पश्चिम या शाखांमध्ये दहा हजारांपेक्षा अधिक तर परळ आयटीसी, वांद्रे पूर्व, अंधेरी लोखंडवाला, जोगेश्वरी पूर्व, कुर्ला, चांदिवली या शाखांमध्ये नऊ हजारांपेक्षा अधिक आणि उर्वरित शाखांमध्ये चार ते पाच हजार अर्जांची विक्री झाली आहे.
अर्जविक्रीला मिळालेला प्रतिसाद पाहता अर्ज सादर करण्यासाठी मुंबईकरांची होणारी गर्दी लक्षात घेऊन एचडीएफसी बँकेला दोन ते तीन काऊंटर खुले करण्यास सांगण्यात आले आहे, असेही जावळे यांनी सांगितले. काही शाखांबाहेर अर्जाचा काळाबाजार केला जात होता. कुणीही अशा पद्धतीने अर्ज विकत घेऊ नयेत. प्रत्येक शाखेत मुबलक अर्ज पाठविण्यात आले आहेत, असेही जावळे यांनी स्पष्ट केले.

सोडत अधिक पारदर्शक करणार!
घरांसाठी नशीब अजमावणाऱ्या मुंबईकरांना पारदर्शक सोडत उपलब्ध करून देण्याचे म्हाडाने ठरविले आहे. सोडतीसाठी जे सॉफ्टवेअर वापरण्यात येणार आहे ते चार पद्धतीचे असून त्या सर्वांची टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, व्हीजेटिआय या मान्यताप्राप्त संस्थांकडून चाचणी करून घेण्यात येणार आहे. याशिवाय हे सॉफ्टवेअर नागरिकांसाठी एक-दोन दिवस खुले ठेवण्यात येणार असून जेणेकरून कुणीही संगणकतज्ज्ञाने त्याच्यातील दोष शोधून काढावेत, असे आवाहनही जावळे यांनी केले आहे. अर्जविक्री आणि स्वीकृती संपल्यानंतर याबाबतच्या तारखा जाहीर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.