Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

ठेकेदारांकडून होणाऱ्या लुटीच्या चौकशीचे आदेश
लोकसत्ता इफेक्ट
मुंबई, १३ जानेवारी / प्रतिनिधी

 
पालिकेतील ठेकेदार पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने मुंबईकरांची रोजरोस लूट करीत असल्याच्या प्रकरणी आज पालिका आयुक्त डॉ. जयराज फाटक यांनी चौकशीचे आदेश दिले. गेल्या शुक्रवारी ‘मुंबई वृत्तान्त’ मध्ये ‘पालिका ठेकेदारांडून कोटय़वधींची राजरोस लूट’ हे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. पर्जन्य जलवाहिन्यांच्या निविदांमध्ये गेल्या सहा महिन्यांपूर्वी अंदाजित करण्यात आलेल्या रक्कमेपेक्षा आता कितीतरी अधिक पटीने निविदा काढण्यात आल्या आहेत. ‘मुंबई वृत्तान्त’ने अशा ६२ कामांची यादीच प्रसिद्ध केली होती. या कामांत पालिकेने ठेकेदारांना राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खाते, ठाणे पालिका आणि ‘एमएमआरडीए’च्या दरापेक्षा कितीतरी पट अधिक रक्कम दिलेली आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीतून सुमारे पाचशे कोटी रुपये ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहेत. वर्षेभरातील कामांचा हिशेब गृहित धरल्यास ही रक्कम सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्यावर जाते.
याप्रकरणी आज पालिका आयुक्त जयराज फाटक यांनी तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
पालिकेचे दर राज्य सरकारने ठरवून दिलेल्या जिल्हा दरसूची पेक्षा किती तरी अधिक आहेत, हे लक्षात येताच आयुक्तांनी आश्चर्य व्यक्त केले. अतिरिक्त आयुक्त आर. ए. राजीव यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी करावी आणि अहवाल सादर करावा, असे आयुक्तांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. हे आदेश मिळताच आर. ए. राजीव यांनी दक्षता विभागाच्या उपायुक्तांना या प्रकरणी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. तसेच प्रकल्प संचालकांकडे त्यांनी या प्रकरणी विचारणा केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका शिष्टमंडळाने या प्रकरणी आयुक्तांना आधीच एक निवेदन दिले होते