Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

‘उत्तर प्रदेश दिन’विरोधात मनसेची आक्रमक भूमिका
संदीप आचार्य
मुंबई, १३ जानेवारी

 
संयुक्त महाराष्ट्र मिळविण्यासाठी १०६ हुतात्मांनी बलिदान केले होते. त्यांच्या बलिदानामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र उभा राहिला. त्याचे स्मरण म्हणून १ मे हा महाराष्ट्रदिन साजरा केला जातो. उत्तर प्रदेश दिन हा खुद्द उत्तर प्रदेशातही साजरा होत नाही. मग मुंबईत ही नौंटकी कशासाठी, असा सवाल राज ठाकरे यांनी केल्याने
येत्या २४ जानेवारी रोजी महाराष्ट्रात या संदर्भात मनसे कार्यकर्ते विरुद्ध उत्तर प्रदेश दिन संयोजक, अशा चकमकी घडण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. याच पाश्र्वभूमीवर येत्या २४ जानेवारी रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाणे येथील जाहीर सभेत लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.
शिवाजी पार्कवर आयोजित प्रतिकोल्हापूर महोत्सवात बोलताना राज यांनी उत्तर भारतीय व बिहारींच्या विरोधात आपल्या
तोफा पुन्हा धडाडणार असल्याचे स्पष्ट केले. मुंबईसह महाराष्ट्रात केवळ मराठी माणसाचाच ‘आवाज’ चालेल, अशी स्पष्ट भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांच्या ठाणे येथील भाषणाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मुंबईवरील अतिरेकी हल्ला, राज यांचे गेले महिनाभर असलेले मौन, राज्याच्या सुरक्षेचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राज्यावरील कर्जाचा वाढता बोजा, मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांची लागलेली वाट आणि राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढय़ांमुळे निर्माण झालेली असुरक्षितता आदी मुद्दय़ांवरून राज ठाकरे सरकारवर तुटून पडणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते. या सभेत महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी माणसांचे हक्क यावरूनही राज हल्लाबोल करतील, अशी शक्यता आहे.
निवडणूक लढवायची ती जिंकण्यासाठीच अशी भूमिका घेत लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा लढविण्याचा मानस मनसेच्या वर्धापनदिनी राज यांनी व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुखांच्या भेटीवरून जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेल्या तर्क वितर्काना पूर्णविराम देताना शिवसेनाप्रमुखांना जेवढी शिवसेना प्रिय आहे तेवढीच मला माझी मनसे प्रिय
असल्याचे राज यांनी स्पष्ट केले होते. मतांच्या लाचारीसाठी मराठी माणसांशी कोणत्याही परिस्थितीत दगाबाजी केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मनसेने घेतली असून मुंबईतील म्हाडाची घरे शंभर टक्के मराठी माणसांनाच मिळाली पाहिजे, अशी ‘रोखठोक’ मागणी करणारे राज ठाकरे पुन्हा एकदा वादळ निर्माण करणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. गेली नऊ वर्षे राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रसे-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मुंबईची सुरक्षितता जपता आली नाही. येथे वसलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करता आलेली नाही. उत्तर प्रदेश व बिहारमधून रोज लोंढे येत असून मुंबईतह राज्यातील दरोडय़ांच्या बहुतेक प्रकरणात पकडय़ात आलेले आरोपी हे याच राज्यातीत आहेत. अशावेळी मतांसाठी परप्रांतीयांना कुरवाळत राहिल्यास मुंबई ही कायमच असुरक्षित राहणार आहे, असा मुद्दाही राज यांच्याकडून मांडण्यात येईल. या पाश्र्वभूमीवर येत्या राज यांच्या सभेच्या दिवशीच उत्तर प्रदेश दिन येत असल्यामुळे पुन्हा परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलनाचा धुरळा उडतो का, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहीले आहे.