Leading International Marathi News Daily                                  बुधवार , १४ जानेवारी २००९
प्रादेशिक

(सविस्तर वृत्त)

अनिता उड्डियाला पोलिसांनीच सुरक्षितस्थळी हलविले?
मुंबई, १३ जानेवारी / प्रतिनिधी

 
मुंबईवर हल्ला चढविण्यासाठी समुद्रमार्गे बधवार पार्क येथे आलेल्या दहा दहशतवाद्यांना सर्वात प्रथम पाहणारी आणि त्यांना हटकणारी अनिता उड्डिया रविवारपासून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आठवडाभर आधी तिने आपल्याला ‘कोणीतरी न्यायला येणार असून त्यांच्यासोबत मला जावेच लागेल’, असे सांगितल्याचा दावा तिच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. या घटनेविषयी पोलिसांनी मौन बाळगल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून या वादाच्या पाश्र्वभूमीवर अनिताबाबत ‘नेमके झाले तरी काय?’या चर्चेलाही उधाण आले आहे.
बधवार पार्क येथे राहणाऱ्या ४७ वर्षांच्या उड्डिया या रविवारी पहाटे सहा वाजता कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडल्या. तेथून त्या सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेत असलेले पती राजेंद्रला भेटायला गेल्या. आपण चार दिवसांसाठी बाहेर जात असून तुम्ही माझी काळजी करू नका, असेही त्यांनी राजेंद्र यांना सांगितले. राजेंद्रने तू कुठे जात आहेस, असे विचारता मात्र काहीच न सांगता घाईघाईने त्या निघून गेल्या. त्यानंतर तिच्या मुलीने सायंकाळी आई बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्याचे कफ परेड पोलिसांचे म्हणणे आहे. अनिताच्या कुटुंबियांचे मात्र वेगळेच म्हणणे आहे. आठवडाभर आधीपासूनच ती, आपल्याला कोणीतरी न्यायला येणार आहे आणि जावेच लागेल, असे सांगत होती. त्यामुळे आम्ही सतत तिच्यासोबत असायचो. पण रविवारी शौचाला जाते सांगून जाणारी अनिता घरी परतलीच नाही, असे तिच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे.
कफ परेड पोलिसांनी मात्र अनिताचा तपास आम्ही आमच्या पद्धतीने करीत आहोत आणि तिच्या सुरक्षेबाबत माहिती हवी असेल तर गुन्हे अन्वेषण विभागाकडे चौकशी करा, असे सांगितले. त्यानंतर अनेकदा प्रयत्न करूनही सहआयुक्त राकेश मारिया यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. गुन्हे अन्वेषण विभागाच्या अन्य कुणीही दूरध्वनी उचलला नाही. पोलिसांच्या या पवित्र्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पोलिसांनीच अनिताला सुरक्षित जागी हलविल्याचे एकीकडे मानले जाते तर दुसरीकडे अनिता प्रमुख साक्षीदार असतानाही पोलिसांकडून तिला योग्य ती सुरक्षा पुरवली न गेल्याने ती बेपत्ता झाल्याचे बोलले जात आहे. यामागील सत्य अनिताचा शोध लागल्यानंतरच पुढे येईल. मात्र अनिताच्या बेपत्ता होण्याने या प्रश्नांसोबतच तपासाविषयीचे अनेक अनुत्तरीत प्रश्नही पुढे आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे २६ नोव्हेंबरच्या रात्री मुंबईवर हल्ला करणारे दहा पैकी सहा दहशतवादी बधवार पार्क येथे उतरल्याचे अनिताने पाहिले होते. पण ज्या वेळी ते बधवार पार्क येथे उतरले आणि अनिताने त्यांना पाहिले त्या वेळी तेथे अंधार होता. असे असतानाही महिन्यानंतर अनिताने त्यांची ओळख पटवली. मात्र याविषयी आता शंका उपस्थित करण्यात येत आहे.